कृतार्थ जीवन जगलेले गोपाळ प्रभू ऊर्फ पंढरीमास्तर

0
135
  •  डॉ. सोमनाथ कोमरपंत

 

ते काणकोणच्या सुपुत्रांपैकी अग्रगण्य होते; पण त्यांच्या कार्यामुळे गोमंतकाच्या कानाकोपर्‍यात त्यांची कीर्ती पसरली होती. त्यांची कार्यैकनिष्ठा, शालीनता आणि ध्येयवादी वृत्ती सर्वज्ञात होती. माणसांना जवळ करण्याचे चुंबकीयत्व त्यांच्या लोभसवाण्या व्यक्तिमत्त्वात होते.

 

निष्ठावंत शिक्षक, गोव्याच्या स्वातंत्र्यसंग्रामात समर्पित भावनेने सहभागी झालेले स्वातंत्र्यसेनानी आणि सामाजिक क्षेत्रात हिरिरीने भाग घेणारे ज्येष्ठ समाजकार्यकर्ते गोपाळ प्रभू यांचे ९०व्या वर्षी नुकतेच ६ ऑक्टोबर २०१९ रोजी निधन झाले. ‘पंढरीमास्तर’ या नावाने ते सर्वत्र ओळखले जात असत. जिथे जिथे विधायक कार्य होत असे तिथे तिथे चैतन्यशील वृत्तीने वावरणे आणि स्वतःला झोकून देऊन कार्य करणे हा त्यांचा स्थायिभाव होता; तेही निरिच्छ भावनेने. ‘एका हाताने दिलेले दान दुसर्‍या हाताला कळू देता कामा नये’ अशा अबोल वृत्तीने कोवळ्या तरुण वयापासून आयुष्याच्या शेवटच्या श्‍वासापर्यंत ते सार्वजनिक क्षेत्रात वावरले आणि आपली निष्कलंक प्रतिमा समाजमानसात त्यांनी निर्माण केली. ते काणकोणच्या सुपुत्रांपैकी अग्रगण्य होते; पण त्यांच्या कार्यामुळे गोमंतकाच्या कानाकोपर्‍यात त्यांची कीर्ती पसरली होती. त्यांची कार्यैकनिष्ठा, शालीनता आणि ध्येयवादी वृत्ती सर्वज्ञात होती. माणसांना जवळ करण्याचे चुंबकीयत्व त्यांच्या लोभसवाण्या व्यक्तिमत्त्वात होते. दीर्घकालापासून माझ्यावर त्यांचा लोभ जडलेला होता. माझे भाग्य असे की माझ्यापेक्षा अठरा वर्षांनी ज्येष्ठ असलेल्या या सज्जन माणसाचे वात्सल्य मला सदैव मिळाले. गाठीभेटी विरळ झाल्या तरी त्यांचे अंतर्यामीचे प्रेम आणि जिव्हाळा निरंतर पूर्वीसारखाच राहिला. ते गेल्याचे कळल्यावर अंतःकरणात त्यांच्याविषयीच्या कृतज्ञतेच्या सार्‍या भावना दाटून आल्या आणि त्यांच्या पहिल्या भेटीपासूनची क्षणचित्रे मनःचक्षूंसमोर उभी राहिली.

वास्तविक पाहता पंढरीमास्तरांविषयी मी आमचे श्रीमल्लिकार्जुन विद्यालयातील आवडते सर यशवंत नाईक यांच्याकडून शालेय वयात ऐकले होते. हिंदू हायस्कूलमध्ये ते एकमेकांचे जिवलग मित्र होते. नाईकसर त्यांच्याविषयी ममत्वाने बोलायचे. त्यांनी नाईकसरांना काही पत्रे लिहिली होती, तीही त्यांनी दाखविली होती. साहजिकच नाईकसरांविषयीची जी उत्कटता, जी आदराची भावना वाटायची तितकीच पंढरीमास्तरांविषयी वाटायची.

आम्हाला त्यावेळी एस.एस.सी. परीक्षेसाठी मडगाव किंवा पणजी येथे परीक्षाकेंद्र स्वीकारावे लागायचे. मार्च १९६५ मध्ये मी मडगाव केंद्रात एस.एस.सी.च्या परीक्षेला बसलो होतो. यावेळी श्रीनिराकार विद्यालयाच्या बॅचची सर्व प्रकारची काळजी घेण्यासाठी पंढरीमास्तर तेथे जातीने हजर असत. पेपर होण्यापूर्वी लिंबू-सरबत देऊन ‘मल्टिपर्पज हायस्कूल’पर्यंत विद्यार्थ्यांची ते रवानगी करत. आपल्या विद्यार्थ्यांविषयी वाटणारा अपरंपार जिव्हाळा त्यांच्या प्रत्येक कृतीतून व्यक्त होत होता. येथून त्यांचा झालेला परिचय अधिकाधिक दृढ होत गेला.

कारवारच्या हिंदू हायस्कूलमध्ये शिकत असताना त्यांचे शिक्षक रामदास फेणे यांच्या प्रेरणेने त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला. ‘नॅशनल कॉंग्रेस गोवा’ या स्वातंत्र्यसंग्रामासाठी वाहून घेतलेल्या संघटनेचे ते सदस्य होते. डॉ. पुंडलिक गायतोंडे यांना १७ फेब्रुवारी १९५४ ला राजद्रोहाच्या आरोपाखाली पोर्तुगीज सरकारने अटक केली त्यावेळी संवेदनशील वृत्तीचे गोपाळ प्रभू अस्वस्थ झाले. पीटर आल्वारिस, टॉनी फर्नांडिस, श्रीरंग लोलयेकर, विठ्ठल लोलयेकर, मनोहर प्रभुदेसाई, दामोदर प्रभुदेसाई, शिवानंद गायतोंडे आणि रामचंद्र वारीक यांच्याबरोबर कार्य करीत असताना भूमिगत कार्यकर्ते म्हणून ते वावरले. त्यांंना १६ सप्टेंबर १९५४ ते ११ एप्रिल १९५५, २२ जुलै १९५६ ते १८ ऑक्टोबर १९५६ आणि २३ सप्टेंबर १९५७ ते २१ मे १९५८ अशी तीन वेळा अटक होऊन तुरुंगवास भोगावा लागला.

मुक्तीनंतरच्या काळात त्यांनी माशे येथील श्री निराकार विद्यालयात शिक्षक म्हणून आपली सेवा रूजू केली. काही काळ पैंगीण येथील श्री श्रद्धानंद विद्यालयात त्यांनी अध्यापनाचे कार्य केले. नंतर ते श्री निराकार विद्यालयात पुन्हा शिक्षक म्हणून रुजू झाले. येथूनच ते निवृत्त झाले. आपल्या शिक्षकी पेशाच्या दीर्घकाळात त्यांनी विधायक आणि रचनात्मक कार्याचा आदर्श निर्माण केला. शिस्तप्रिय आणि विद्यार्थिप्रिय शिक्षक म्हणून नावलौकिक मिळविला.

त्यांच्या निकट सहवासातील काही आठवणी माझ्या मनात रुंजी घालताहेत. स्वातंत्र्यसंग्रामाच्या धामधुमीत त्यांना आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करता आले नव्हते. म्हणून त्यांनी चौगुले महाविद्यालयात ‘इंटरमिजिएट आर्टस्’साठी १९६६-६७ साली प्रवेश घेतला. ते ‘मॉर्निंग क्लासेस’ना हजर राहत आणि मडगावच्या एका हायस्कूलमध्ये शिकवीत असत. आके येथील तळसांझरीजवळच्या एका घरात आम्ही शेजारी राहत होतो. मी माझ्या मित्रांसह घारूआकाच्या घरात, तर पंढरीमास्तर पडियारबंधूच्या घरात. त्यांच्या सहवासात खूप गोष्टी शिकता आल्या. त्यांच्या अनुभवसंपन्नतेचा लाभ झाला. आम्ही दोघे पहाटे साडेपाच वाजता सुप्रसिद्ध ‘तळसांझरी’वर स्नानासाठी जात होतो. ते दिवस आनंदात गेले.
तेव्हा जुळलेले अनुबंध पुढेही कायम राहिले हे सांगताना मला अतिशय आनंद होतो. योगायोगाने मीही अध्यापनव्यवसाय निवडला. माझ्या शाळेतील शिक्षकांप्रमाणेच मला गोपाळ प्रभू ऊर्फ पंढरीमास्तर, बाळकृष्ण प्रभुगावकर ऊर्फ सच्चितमास्तर, फ. य. प्रभुगावकर, नारायण गावकर आदरणीय वाटत आलेले आहेत. काणकोण महालात सर्व प्रकारची प्रतिकूलता असताना आणि साधनसामग्रीचा अभाव असताना आपापल्या शिक्षणसंस्था त्यांनी नावारूपास आणल्या. काणकोणच्या शैक्षणिक परंपरेला साजेसे कार्य केले. या सर्वांकडे पाहताना त्यांच्याबद्दल सदैव अभिमान वाटत राहिला. या शैक्षणिक परंपरेचे एक प्रतीक म्हणून मी गोपाळ प्रभू ऊर्फ पंढरीमास्तर यांचा आवर्जून उल्लेख करीन.

पंढरीमास्तरांना लोकमान्यता मिळाली; तशीच राज्यमान्यता मिळाली. गोवा शासनाने ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार देऊन त्यांना गौरविले. त्यावेळी त्यांना पत्र लिहिले, तेव्हा यशाचे श्रेय स्वतःकडे न घेता आपल्या शाळेच्या ‘टीम वर्क’ला दिले. याला म्हणतात निःसंग वृत्ती! त्यांच्या स्वातंत्र्यसंग्रामातील अजोड कार्याबद्दलही गोवा शासनाने त्यांना ‘ताम्रपत्र’ देऊन सन्मानित केले. त्यांनी निरलस वृत्तीने केलेल्या समाजकार्याबद्दल ‘गोमंत विद्या निकेतन’सारख्या जुन्या-जाणत्या आणि मातब्बर संस्थेने ‘केशव अनंत नायक समाजसेवा’ पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. पंढरीमास्तरांची महत्ता ही की त्यांनी त्या रकमेत आपली थोडी भर घालून तो पुरस्कार संस्थेला परत केला. त्यांची पत्नी सौ. शरयूवहिनी यांच्या मृत्यूनंतर त्यांना उदासीनता आली आणि त्यांनी ‘स्नेहमंदिर’चा आश्रय घेतला. गेली बारा वर्षे ते स्नेहमंदिरात राहिले. तिथेही त्यांनी आपली पूर्वीची सेवाभावी वृत्ती कायम ठेवली. त्यांचा उत्साह तरुणालाही लाजविणारा होता. ‘स्नेहमंदिर’मध्ये जेव्हा जेव्हा मी जात असे त्यावेळी पंढरीमास्तरांची भेट व्हायचीच.

पंढरीमास्तर आपल्यामधून आता गेलेले आहेत. पण मधुर आठवणी ठेवून गेले आहेत. त्यांना आठवताना मला एकाच वेळी बा. भ. बोरकरांच्या ‘जीवन त्यांना कळले हो!’ आणि ‘लावण्यरेखा’ या दोन कविता आठवतात. विशेषतः ‘लावण्यरेखा’मधील खालील ओळी त्यांनाच लागू पडणार्‍या आहेत असे वाटते ः
देखणीं ती जीवनें जीं तृप्तिचीं तीर्थोदकें
चांदणें ज्यांतून फांके शुभ्र पार्‍यासारखें॥
देखणा देहान्त तो जो सागरी सूर्यास्तसा
अग्निचा पेरून जातो रात्रगर्भीं वारसा॥