कूळ – मुंडकार संघर्ष समितीतर्फे पेडणे उपजिल्हाधिकारी, मामलेदार यांना निवेदन

0
96

पेडणे
कूळ-मुंडकार प्रश्‍न सोडविण्यासाठी कूळ-मुंडकार संघर्ष समितीच्यावतीने पेडणे तालुका उपजिल्हाधिकारी सुधीर केरकर आणि पेडणे तालुका मामलेदार यांना निवेदन सादर केले.
या निवेदनात एक चौदाचा जमीन उतारा याचे शुल्क १५ रुपयांवरून ते ४० रुपये केल्याने शेतकर्‍याला सरकारच्या वाढीव शुल्क आकारामुळे मोठ्या प्रमाणात भुर्दंड पडतो. जमिनीचे सर्वे प्लान रुपये ६० वरून त्याचे शुल्कही सरकारने १८० रुपये केले. तसेच माहिती हक्क कायद्याखाली मिळणारी माहिती प्रती पान २ होती. त्याचेही शुल्क रुपये ४० करत कूळ-मुंडकारांवर मोठा अन्याय केला असून हे वाढीव शुल्क सरकारने कमी करून गोरगरीब शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, असे म्हटले आहे.
पेडणे उपजिल्हाधिकारी सुधीर केरकर यांना निवेदन देताना कूळ-मुंडकार संघटनेचे संघटक दीपेश नाईक, बार्देश कूळ-मुंडकार संघटनेचे अध्यक्ष संजय बर्डे, पेडणे तालुका भंडारी समाज अध्यक्ष तथा पेडणे कॉंग्रेसचे गटाध्यक्ष उमेश तळवणेकर, कॉंग्रेसचे उत्तर गोवा सरचिटणीस सुभाष केरकर, आम आदमी पक्षाचे पदाधिकारी प्रदीप घाडी आमोणकर, मगोचे पदाधिकारी अमृत आगरवाडेकर, माजी अध्यक्ष नारायण मयेकर, ऍड. व्यंकटेश नाईक, गोपीचंद आपुले, उत्तम कशालकर, उदय मांद्रेकर, नारायण गडेकर, बुधाजी, सुदेश तळकटकर आदी उपस्थित होते.
यावेळी पेडणे तालुका मामलेदार राजेश आजगावकर यांनाही कूळ-मुंडकार तसेच अन्य पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी एकत्र येऊन निवेदन देऊन कूळाचे प्रश्‍न तसेच अन्य समस्यांची दखल घेण्याची विनंती केली.
यावेळी मोपा विमानतळ पठारावरील दोन कुटुंबीयांची सरकारने घरे मोडली त्यांना न्याय देण्याची मागणी यावेळी केली.
आम आदमीचे प्रदीप घाडी आमोणकर म्हणाले की, बहुजन समाजातील कुटुंबाची दोन घरे मोडली त्याला सरकार न्याय देत नाही. हे सरकार भांडवलदारांचे सरकार असून गरीब जनतेवर ते अन्याय करत असल्याचा आरोप आमोणकर यांनी केला.
यावेळी उदय मांद्रेकर म्हणाले की, सरकारने गरीब जनतेला फसविले आहे. त्यांच्या जमिनी हडप ते करत असून कूळ-मुंडकार यांचे शाप सरकारातील मंत्र्यांना लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ऍड. व्यंकटेश नाईक म्हणाले की, सर्वे प्लान तसेच माहिती अधिकारी कायद्याखाली तसेच एक चौदाचा उतारा घेण्यासाठी शुल्क भरमसाठ आहे. हे सर्वे गरीब, शेतकरी यांना लागतात. सर्वसामान्य लोकांसाठी जे दर शुल्क वाढविले ते लवकर कमी करावे, अशी मागणी केली.
उमेश तळवणेकर म्हणाले की, श्रीपाद नाईक व मंत्री आजगावकर हे दोघे गरीबांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी अपयशी ठरत आहेत. त्यांना गरीबांवर झालेल्या अन्यायाचे काहीच पडले नसेल तर त्यांना त्यांची जागा दाखवा, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
यावेळी पेडणे सरकारी संकुलाच्यासमोर कूळ-मुंडकार संघटनेच्या पदाधिकारी व अन्य पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी विविध घोषणा दिल्या.