कूकची आठव्या स्थानी झेप

0
99

>> आयसीसी कसोटी क्रमवारी

>> विराट द्वितीय स्थानी जैसे थे

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने काल रविवारी जाहीर केलेल्या कॅलेंडर वर्षातील शेवटच्या कसोटी क्रमवारीत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (८९३ गुण) याने आपले दुसरे स्थान कायम राखले आहे. सध्या सुरू असलेल्या ऍशेस मालिकेत नाबाद द्विशतक ठोकलेल्या इंग्लंडच्या ऍलिस्टर कूक (७५९) याने नऊ क्रमांकांची मोठी उडी घेत आठव्या स्थानावर हक्क सांगितला आहे.

संपूर्ण वर्षभर धावा जमविण्यासाठी संघर्ष केल्यानंतर कूक याने आपल्या केवळ एका मोठ्या खेळीच्या बळावर वर्षअखेरीस ‘टॉप १०’ खेळाडूंत स्थान मिळविण्यात यश प्राप्त केले. मेेलबर्न व पोर्ट एलिझाबेथ कसोटी सामन्यांनंतर आयसीसीने ही ताजी क्रमवारी जाहीर केली. दक्षिण आफ्रिकेचा आघाडी फळीतील फलंदाज हाशिम आमला सातव्या स्थानावर असून कूक त्याच्यापेक्षा केवळ १७ गुणांनी मागे आहे. वर्षाच्या सुरुवातीला कूक १५व्या स्थानावर होता. तर ऍशेस मालिका सुरू होण्यापूर्वी दहाव्या स्थानापर्यंत त्याने मजल मारली होती.

दुसरीकडे मेलबर्न कसोटीत ७६ व नाबाद १०२ धावा जमवून ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव स्मिथ (९४७ गुण) याने आपले पहिले स्थान अधिक भक्कम केले आहे. इंग्लंडचा कर्णधार ज्यो रुट याने एका स्थानाने वर सरकताना न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनसह (प्रत्येक ८५५ गुण) संयुक्त चौथा क्रमांक मिळविला आहे. वर्षांरंभी रुट व विल्यमसन अनुक्रमे तिसर्‍या व चौथ्या स्थानी होते. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर सहाव्या क्रमांकावर आहे. चौथ्या कसोटीत १०३ व ८६ धावांची खेळी करत त्याने आपल्या खात्यात ३० गुण जमा केले.

गोलंदाजांमघ्ये पहिल्या नऊ खेळाडूंच्या स्थानात कोणताही बदल झालेला नाही. इंग्लंडचा जेम्स अँडरसन पहिल्या स्थानी कायम आहे. वर्षाच्या सुरुवातीला ८१० गुणांसह सहाव्या स्थानी असलेल्या अँडरसनकडे ८९२ गुण आहेत. रबाडा ८८३ गुण घेत दुसर्‍या क्रमांकावर आहे. कॅलेंडर वर्षारंभी पहिल्या तीन क्रमांकावर असलेल्या रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्‍विन व रंगना हेराथ या फिरकी त्रिकुटाने वर्षाचा शेवट तिसर्‍या, चौथ्या व सहाव्या स्थानासह केला. ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड पाचव्या स्थानी कायम राहिला. डेल स्टेन (७४१ गुण) याला टॉप १० बाहेर ढकलत मॉर्ने मॉर्कल (७५३ गुण) याने तीन क्रमांकांची सुधारणा करत पहिल्या दहांत स्थान मिळविले. ३३ वर्षीय मॉर्कलने झिंबाब्वेविरुद्धच्या कसोटीत २१ धावांत ५ गडी बाद केले होते. जवळपास दोन वर्षांच्या कालावधीनंतर मॉर्कलला आघाडीच्या खेळाडूंत स्थान मिळविण्यात यश प्राप्त झाले आहे. दक्षिण आफ्रिकेचा डावखुरा फिरकीपटू केशव महाराज (६९५ गुण) याने कारकिर्दीतील सर्वोत्तम सोळावा क्रमांक मिळविला आहे. झिंबाब्वेविरुद्धच्या दुसर्‍या डावात त्याने ५९ धावांच्या मोबदल्यात ५ गडी बाद केले होते. ‘टॉप २०’ बाहेरील खेळाडूंचा विचार केल्यास इंग्लंडचा ख्रिस वोक्स व ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी तीन स्थानांची प्रगती करत अनुक्रमे २८वे व ३६वे स्थान मिळविले आहे. अष्टपैलूंमध्ये शाकिब अल हसन पहिल्या तर अश्‍विन दुसर्‍या स्थानी कायम आहे.