कुष्ठ / महाकुष्ठ भाग – २

0
669
  • डॉ. स्वाती हे. अणवेकर,
    (म्हापसा )

    प्रत्यक्ष कुष्ठ हा व्याधी शरीरात उत्पन्न होण्याअगोदर काही पूर्वलक्षणे शरीरामध्ये दिसतात- जसे घाम फार येणे अथवा मुळीच न येणे, त्वचा अगदी गुळगुळीत किवा फार खरखरीत होणे, त्वचेचा वर्ण बदलणे, आग होणे, खाज येणे, सुन्नपणा असणे……

आयुर्वेदामध्ये सर्व प्रकारच्या त्वचारोगांचे संबोधन ‘कुष्ठ’ ह्या नावाने केले जाते. इथे कुष्ठ अर्थात कोणताही त्वचा रोग होय. ह्या मध्ये दुष्टी झालीच तर दोष शरीरातील त्वचा इ. धातूंचा नाश करून त्वचेच्या ठिकाणी विकृत वर्ण निर्माण करतात. तसेच गंभीर अवस्थेत ते त्या धातूंमध्ये कोठ अर्थात कुजण्याची प्रक्रिया निर्माण करतात- त्या व्याधीला कुष्ठ असे म्हणतात.

पण व्यवहारात मात्र कुष्ठ म्हटले की कुष्ठरोग अर्थात लेप्रसी हा व्याधीच गृहीत धरला जातो. पण आयुर्वेदाने ह्याच कुष्ठाचे महाकुष्ठ असे ७ प्रकार व क्षुद्र कुष्ठ असे ११ प्रकार ह्या प्रमाणे २ भेद केले आहेत, त्यामधील महाकुष्ठाचे जे ७ प्रकार आहेत त्यांचे साधर्म्य अर्वाचीन वैद्यक शास्त्रातील लेप्रसी ह्या व्याधीशी होऊ शकते.

त्याची सविस्तर माहिती आपण पुढे पाहणारच आहोत. पण त्याआधी आयुर्वेदामध्ये सांगितलेली कुष्ठ उत्पन्न होण्याची कारणे कोणकोणती आहेत ते आपण जाणून घेऊया.
– विरुद्ध गुणाचे अन्न वारंवार खाणे, शरीरातील नैसर्गिक वेगांचे धारण करणे, भरपूर जेवल्यावर व्यायाम करणे, शिळे अन्न खाणे, आगीच्या संपर्कात कायम राहणे, उन्हात काम करणे, कच्चे अर्धवट शिजवलेले अन्न खाणे, पिष्टमय पदार्थ खूप खाणे, दिवसा झोपणे, शारीरिक अस्वच्छता इ.
आता हे कुष्ठ कसे उत्पन्न होतात ते देखील पाहणे आवश्यक आहे.
– वरील सर्व कारणांमुळे शरीरात तिन्ही दोष प्रकुपित होतात. त्यातदेखील कफ दोष अधिक कुपीत होतो व हे प्रकोप पावलेले दोष सर्व शरीरात संचार करतात. पुढे ते त्वचेच्या आश्रयाने असणारे धातू रक्त, मांस, लसिका ह्यांना शिथिल करून त्यांना अधिक दुषित करतात व शरीरामध्ये क्लेदाची (चिखल स्वरूप द्रव) उत्पत्ती होते ज्यामुळे त्वचा कुजू लागते व कुष्ठ उत्पन्न होते.
आता प्रत्यक्ष कुष्ठ हा व्याधी शरीरात उत्पन्न होण्याअगोदर काही पूर्व लक्षणे शरीरामध्ये दिसतात- जसे घाम फार येणे अथवा मुळीच न येणे, त्वचा अगदी गुळगुळीत किवा फार खरखरीत होणे, त्वचेचा वर्ण बदलणे, आग होणे, खाज येणे, सुन्नपणा असणे, टोचल्याप्रमाणे वाटणे, त्वचेवर मंडले उठणे, चक्कर येणे, थोड्याशा कारणाने त्वचेवर जखमा होणे व त्या लवकर न भरता चिघळणे, रक्त साकळणे, अशक्तपणा इ.

आता आपण ह्या पुढे लेप्रसी ह्या व्याधीशी साधर्म्य असणारे महाकुष्ठाचे ७ प्रकार सविस्तर पाहणार आहोत.
१) कपाळ कुष्ठ :
ह्यात आरक्त वर्णाचे, खापराप्रमाणे रुक्ष, कठीण, ज्यात टोचल्याप्रमाणे वेदना होतात, कडा खरखरीत असणारे, ओबड धोबड, वर उठलेले, त्वचेचा बराच भाग व्यापणारे, कमी सतरावी ज्यात कृमी लवकर उत्पन्न होतात व व्रण देखील लवकर उत्पन्न होतात असे कुष्ठ.
२) औदुम्बर कुष्ठ :
ह्यात वेदना, आग, लालसर वर्ण, खाज अधिक असते. कुष्ठ त्वचेचा पुष्कळ भाग व्यापते, त्या मधून रक्त, पु, लसिका स्त्राव अधिक प्रमाणात होतो. ह्यात क्लेद उत्पन्न होणे व कुजण्याची प्रक्रियादेखील अधिक आढळून येते. ह्यात प्रसार लवकर होतो व रुग्णाला तापदेखील येतो.
३) मंडल कुष्ठ :
ह्यात पांढर्‍या अथवा रक्त वर्णाचे, जास्त न पसरणारे, ओलसर, स्निग्ध, व वर उचललेले मंडले असतात. ती एकमेकात मिसळलेली असतात. त्यांच्या कडा गोल, गुळगुळीत व जाडसर असतात. ते लवकर न वाढणारे व लवकर न पसरणारे तसेच लवकर बरे न होणारे असते.
४) ऋष्यजिव्हा कुष्ठ :
हे स्पर्शाला कठीण, कडेला तांबूस, व मध्यभागी काळसर असते. ह्यात वेदना असते. ह्याची मंडले गोल व मध्ये उन्नत व कडेला पातळ होत जातात. त्यावर बारीक खरखरीत पुरळ येतो. ह्यात खाज, क्लेद कमी असतो पण दाह, पाक, वेदना असतात. हे कुष्ठ फार लवकर वाढते व पसरते व त्यात कृमी होऊन कोठ देखील लवकर होतो.
(क्रमशः)
(कृपया वरील उपचार हे फक्त वाचकांच्या माहितीसाठी असून त्याचा उपयोग वैद्यांच्या सल्ल्‌यानेच करावा).