कुष्ठरोग/लेप्रसी भाग – १

0
274
  •  डॉ. स्वाती हेमंत अणवेकर,
    (म्हापसा)

ज्या व्यक्ती कुष्ठरोग प्रभावित परिसरात राहतात त्यांचा अशा कुष्ठ रोग्यांशी सतत संपर्क आल्यास, तसेच ज्या व्यक्ती सतत चिम्पान्झी, माकड, गोरील्ला इ. सारख्या जनावरांच्या सतत संपर्कात असतात त्यांना हाताळतात त्यांना हा व्याधी होण्याचा धोका अधिक असतो.

अर्वाचीन भाषेत ‘लेप्रसी’ असे संबोधित केल्या जाणार्‍या व्याधीला बोली भाषेत ‘कुष्ठरोग’ असे म्हणतात. हा एक संक्रामक व्याधी असून ह्यामध्ये त्वचेवर विकृत दिसणारे वण निर्माण होतात. तसेच ह्या व्याधीमध्ये हात, पाय व त्वचेच्या सभोवतालच्या नसा नष्ट होतात. पूर्वापारपासून ह्या व्याधीने ग्रस्त लोकांना भयंकर अशा सामाजिक व भयंकर अवहेलनेला सामोरे जावे लागते. ह्या व्याधीचा प्रसार हा प्रामुख्याने अशा रुग्णांच्या शरीरातील स्रावांशी निरोगी व्यक्तीचा संपर्क आला तर होतो.. ज्या रुग्णावर कोणतेही उपचार झाले नाहीत. लहान मुलांमध्ये ह्याची लागण प्रौढ व्यक्तीपेक्षा लवकर होताना आढळते.

भारतामध्ये लेप्रसीच्या रुग्णांचे प्रमाण हे जगात सर्वात अधिक असून जगभरात लेप्रसीचे २००,००० नवीन रुग्ण दरवर्षी आढळून येतात आणि त्यातील अर्ध्यापेक्षा अधिक रुग्ण हे भारतामध्ये असतात. ‘मायकोबॅक्टेरियम लेप्री’ह्या जिवाणूपासून लेप्रसी हा व्याधी होतो. हँसन्स ह्या शास्त्रज्ञाने ह्या जीवाणूचा शोध लावला म्हणून ह्याला ‘हँन्सन्स डिसीझ’ असे देखील म्हणतात. हा जीवाणू शरीरात अगदी संथगतीने वाढतो.
आता आपण ह्या व्याधीमध्ये कोणकोणती लक्षणे आढळतात ते पाहूया :
ह्याचा सर्वप्रथम परिणाम त्वचेवर दिसून येतो, त्याचप्रमाणे काही नसा ज्या मेंदू व सुषुम्ना कांडा बाहेर आढळतात त्यांना ‘पेरिफेरल नर्व्हज’् असे म्हणतात त्यामध्ये देखील हा आढळतो. तसेच डोळे व नाकाची अंतस्त्वचा देखील ह्या व्याधीने प्रभावित होते. ह्याचे प्रमुख लक्षण म्हणजे त्वचेवर विकृती उत्पन्न करणारे व्रण, डाग अथवा उंचवटे येतात जे बरेच आठवडे व महिने उपचार घेऊन देखील जात नाही. त्वचेचा वर्णदेखील फिकट रंगाचा होतो.

आता आपण ह्याचे प्रकार कोणकोणते आहेत ते जाणून घेऊया:
१) इन्डिटरमिनेट लेप्रसी ः
ह्यात काहीच हलक्या फिक्या रंगाचे वण शरीरावर उत्पन्न होतात जे लवकर भरून येतात.
२) ट्युबरक्युलॉइड लेप्रसी ः
हा सौम्य प्रकार आहे. ह्याची लग्न झालेल्या व्यक्तीमध्ये त्वचेवर एखादा अथवा थोडे चपटे चट्टे दिसतात. तसेच ते फिकट रंगाचे असतात. जी जागा प्रभावित झालेली असते ती सुन्न वाटते कारण तिकडचा संज्ञावाहक नसा नष्ट झालेल्या असतात. हा प्रकार अन्य प्रकारांपेक्षा थोडा कमी संक्रामक असतो.
३) बॉर्डरलाईन ट्युबरक्युलॉइड लेप्रसी ः
ह्यात ट्युबरक्युलॉइड लेप्रसी प्रमाणेच वण येतात पण ते आकाराने छोटे व अधिक असतात व ह्यात नासाचा समावेश कमी असतो.ह्या पासून पुढे आणखी भयंकर प्रकारची लेप्रसी होऊ शकते.
४) माइल्ड बॉर्डरलाइनलेप्रसी ः
ह्यात लालसर खपल्या येतात जे सिमेट्रीकली पसरलेल्या असतात. ह्यात मध्यम प्रमाणात सुन्नपणा आढळतो व काही स्थानिक लसिका ग्रंथी सुजतात.
५) बॉर्डरलाइन लेप्रमॅटस लेप्रसी ः
ह्यात पुष्कळ वण असतात जे चपटे असतात किवा मग त्यात उंचावते अथवा गाठी होतात. ह्यात त्वचेवर सुन्नपणा असतो किवा नसतो.
६) लेप्रोमॅटस लेप्रसी ः
हा जरा प्रखर प्रकारचा व्याधी असून ह्यात त्वचेवर पुष्कळ उंचवटे व चट्टे येतात तो भाग सुन्न होतो व मांसपेशी मध्ये अशक्तपणा येतो. ह्या प्रकारामध्ये नाक, वृक्क व पुरुषांचे जननाग देखील प्रभावित होते. हा ट्युबरक्युलॉइड लेप्रसी ह्या पेक्षा अधिक जास्त संक्रामक प्रकार आहे.
आता लेप्रसी निदान कसे केले जाते ते आपण पाहूयात:
ह्याचे निदान करण्यासाठी त्वचेच्या प्रभावित भागाचा छोटा तुकडा काढून त्याची सूक्ष्म दर्शकाखाली तपासणी केली जाते ज्याला बायॉप्सी असे म्हणतात.

ह्या व्याधीचे शरीरावर कोणकोणते दुष्परिणाम होतात ते आता आपण जाणून घेऊया:
१) काचबिंदू अथवा अंध्यत्व.
२) चेहरा विद्रूप होणे.
३) किडनी फेल होणे.
४) वंध्यत्व अथवा षंढत्व.
५) मांसपेशी कमकुवत होणे ज्यामुळे पुढे हात वाकडे होणे व पाय वाकडे होणे असे प्रकार घडतात.
६) नाकाच्या आतील अंतस्त्वचेला इजा होऊन नाकातून रक्तस्त्राव होणे अथवा नाक चोंदणे.
७) पाय, हात व अन्य अवयवांना संज्ञा वहन करणार्‍या नसाना कायम स्वरूपी इजा होते.
ज्या व्यक्तीच्या नसांना इजा होते त्यांना वेदना होत नाहीत त्यामुळे त्यांना हात, पाय, पावले ह्यावर जखम झाली तरी कळत नाही.
ह्या व्याधीचा सर्वात जास्त धोका कोणाला असतो ते आपण पाहूयात. ज्या व्यक्ती कुष्ठरोग प्रभावित परिसरात राहतात त्यांचा अशा कुष्ठ रोग्यांशी सतत संपर्क आल्यास, तसेच ज्या व्यक्ती सतत चिम्पान्झी, माकड, गोरील्ला इ. सारख्या जनावरांच्या सतत संपर्कात असतात त्यांना हाताळतात त्यांना हा व्याधी होण्याचा धोका अधिक असतो.
(क्रमशः)
(कृपया वरील उपचार हे फक्त वाचकांच्या माहितीसाठी असून त्याचा उपयोग वैद्यांच्या सल्ल्‌यानेच करावा).