कुलभूषणच्या कबुलीमागचे सत्य

0
126

पाकिस्तानने हेरगिरीच्या आरोपाखाली डांबून ठेवलेल्या आणि फाशीची शिक्षा सुनावलेल्या कुलभूषण जाधवची त्याच्या कुटुंबियांशी भेट घडवून आणून आपण त्याला दूतावासीय मदत मिळवून दिल्याचा आव पाकिस्तानने आणला आहे. शिवाय या भेटीच्या निमित्ताने कुलभूषणकडून पढवून घेतलेल्या मनोगताची एक व्हिडिओ चित्रफीतही जारी करण्यात आली आहे. या मनोगतात कुलभूषणने आपण भारताच्या ‘रॉ’साठी काम करीत असताना इराणमधून पाकिस्तानात आलो होतो, आपल्याला अटकेनंतर पाकिस्तानी अधिकार्‍यांनी सन्मानाने वागवले, पाकिस्तानविरुद्ध आपण केलेल्या हेरगिरीसारख्या कृत्याची आपल्याला लाज वाटते वगैरे सांगितले आहे. त्याची त्याच्या कुटुंबियांशी भेट घडवून आणण्याच्या बदल्यात व त्याला त्याच्या सुटकेचे आश्वासन देऊन अशा प्रकारचे निवेदन वदवून घेतलेले असणे सहजशक्य आहे. खरे तर आजवर कुलभूषणची भेट त्याच्या कुटुंबियांशी घडवून आणावी व त्याला दूतावासीय मदत घेऊ द्यावी अशी विनंती भारताच्या वतीने वारंवार करण्यात येत होती. परंतु प्रत्येकवेळी पाकिस्तानने त्या मागणीला वाटाण्याच्या अक्षताच लावल्या. गेल्या एकवीस महिन्यांत भारताने किमान पंचवीस वेळा पाकिस्तानकडे ही मागणी लावून धरली होती, परंतु ती पुन्हा पुन्हा फेटाळण्यात आली. भारत सरकारने कुलभूषणचा प्रश्न शेवटी आंतरराष्ट्रीय न्यायालयापुढे प्रस्तुत केला. पाकिस्तानने त्याला भारतीय दूतावासाची मदत घेऊ दिलेली नाही आणि तो व्हिएन्ना कराराचा भंग असल्याची बाजू भारताने तेथे मांडली व त्याला स्वतःला आपली बाजू मांडण्याची संधीच दिली गेलेली नसल्याने त्याच्या फाशीच्या शिक्षेला रद्दबातल करण्यात यावे असा आग्रह धरला. आता हा विषय फार ताणून धरता येणार नसल्याचे उमगताच पाकिस्तानला पश्‍चात्‌बुद्धी झाली. त्यामुळेच महंमद अली जिनांचा वाढदिवस आणि नाताळचा मुहूर्त साधून मोठा गाजावाजा करून कुलभूषण आणि त्याची पत्नी व आई यांच्या भेटीला अनुमती दिली गेली. या भेटीचे श्रेय पुरेपूर लाटण्याचा प्रयत्न तर पाकिस्तानने चालवलाच, परंतु या निमित्ताने कुलभूषणकडून कथित कबुली मिळवून आपली बाजू बळकट करण्याचा प्रयत्नही पाकिस्तानने केला आहे. ही भेट एकांतात नव्हे तर पाकिस्तानच्या अधिकार्‍यांच्या जागत्या पहार्‍याखाली झाली, उभयतांना दूरध्वनीवरूनच परस्परांशी संभाषण करता आले आणि या संपूर्ण भेटीचे चित्रीकरणही करण्यात आले. या सर्वांचा अर्थ स्पष्ट आहे. पाकिस्तानला या भेटीतून कोणताही धोका पत्करायचा नव्हता. कुलभूषणने आपल्यावरील पाकिस्तानी अत्याचारांचा पाढा त्याच्या कुटुंबियांपुढे वाचू नये यासाठीच ही खबरदारी घेतली गेली असेल यात शंका नाही. मात्र, या भेटीतून एक गोष्ट सिद्ध झाली ती म्हणजे कुलभूषण अजून जिवंत आहे. पाकिस्तानने जारी केलेल्या छायाचित्रांत त्याच्या शरीरावर काही व्रण दिसून आले आहेत. हे त्याच्या कोठडीत झालेल्या छळाचे असावेत असा संशय आहे. कुलभूषणला ताब्यात घेतल्यापासून त्याच्यावर कोणकोणते अत्याचार झाले याची कोणतीही माहिती आजवर बाहेर येऊ शकलेली नाही, कारण त्याला मुळात भारतीयांच्या वा पाकिस्तानी प्रसारमाध्यमांच्या संपर्कातच आजवर येऊ दिले गेलेले नाही. कुलभूषणच्या तोंडून आपल्याला पाकिस्तानने सन्मानाने वागवल्याचे वदवून घेण्यात आले असले तरी त्याच्या शरीरावर दिसणारे व्रण वेगळेच काही सांगत आहेत. कुलभूषणची त्याच्या कुटुंबियांशी झालेली भेट खरे तर खासगी स्वरुपाची होती, परंतु कुटुंबासमवेत भारतीय दूतावासाचे उपउच्चायुक्त जे. पी. सिंग हे उपस्थित होते हे कारण देत ही भेट म्हणजेच कुलभूषणला मिळवून दिलेली दूतावासीय मदत असल्याचा आव पाकिस्तानने आणला आहे. भारताने त्यांचे ते म्हणणे स्पष्टपणे धुडकावून लावले आहे. भारतीय दूतावासाचे अधिकारी केवळ त्या खासगी भेटीवेळी कुलभूषणच्या कुटुंबियांना नैतिक पाठबळ देण्यासाठीच त्यांच्यासमवेत राहिले व ती दोन दूतावासांमार्फत आयोजित केली गेलेली औपचारिक भेट मुळीच नव्हती असे स्पष्टीकरण भारताने दिले आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयापुढे लवकरच कुलभूषण जाधवचा खटला सुनावणीसाठी येणार असल्याने तेथे आपली बाजू भक्कम व्हावी यासाठीच पाकिस्तानने त्याची त्याच्या कुटुंबियांशी भेट घडवून आणण्याची ‘उदारता’ दाखवली आहे. अर्थातच हा एक सापळा आहे. पाकिस्तानला मानवाधिकारांशी काही देणेघेणे असते तर जेव्हा त्याला पकडले गेले, तेव्हापासून आजवर त्याला त्याच्या या अधिकारांचा वापर का करू दिला गेला नाही? भारताने केलेल्या विनवण्या वेळोवेळी का फेटाळल्या गेल्या? केवळ कुलभूषण जाधवचा वापर भारताला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्यासाठी करायचा आहे. त्यासाठीच तर कुलभूषण आणि कुटुंबीयांच्या भेटीचा हा देखावा पाकिस्तानने उभा केला.