कुर्डी सरकारी शाळेच्या विद्यार्थ्यांचा पहिल्या दिवशीच वर्गांवर बहिष्कार

0
116

नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असतानाच पहिल्याच दिवशी सांगे तालुक्यातील वाडे-कुर्डी येथील वसाहत क्र. एक मधील सरकारी प्राथमिक विद्यालयाच्या सुमारे ८० विद्यार्थ्यांनी शिक्षक नसल्याकारणाने वर्गावर बहिष्कार घालून नाराजी व्यक्त केली.
वाडे-कुर्डीच्या प्राथमिक शाळेत सध्या ८०च्या वर विद्यार्थी आहेत. शिक्षक मात्र एकच आहे. गत शैक्षणिक वर्ष संपण्याअगोदर पालकांनी सांगेच्या भागशिक्षणाधिकारी कार्यालयात येवून शैक्षणिक वर्ष अर्धवट असताना शिक्षकाची बदली रद्द करावी म्हणून मागणी केली होती. त्यातच अन्य एक शिक्षक निवृत्त झाले आहेत. त्यामुळे ८० विद्यार्थ्यांसाठी एक शिक्षक आणि इंग्रजी विषयासाठी अन्य एक मिळून दोघांनाच शाळा सांभाळावी लागत असे.

हे चित्र नवीन शैक्षणिक वर्षात बदलावे म्हणून पंधरा दिवसांपूर्वी पालकांनी पुन्हा भागशिक्षणाअधिकार्‍याची भेट घेतली होती. तरीही काल शाळेच्या पहिल्याच दिवशी एकच शिक्षक असल्याने विद्यार्थ्यांनी बहिष्कार घातला. सोबत पालकवर्गही होताच. तात्पुरती व्यवस्था म्हणून जवळच्या नेत्रावळी नूने येथील शाळेच्या शिक्षिकेला वाडे-कुर्डीत जाण्याचा तोंडी आदेश दिला होता. पण तेथील पालकांचाही शिक्षिकेला वाडे-कुर्डीत पाठविण्यास विरोध होता. अखेर भागशिक्षणाधिकारी सुरेश लोटलीकर यानी नूने येथील शिक्षिकेला लेखी आदेश दिला. ती आजपासून तात्पुरती सोय म्हणून वाडे-कुर्डीला रूजू होणार आहे. शिक्षणाचा घोळ सुरू होण्याआधीच तो संपवावा अशी मागणी पालकांनी केली आहे.