कुडचडे रेल्वे स्थानकावर भीषण दुर्घटना टळली

0
89

>> फाटक उघडे असताना धडकले रेल्वे इंजीन

कुडचडे रेल्वे स्थानकावरील ट्रॅक नंबर दोनवर काल फाटक उघडे असताना अचानक रेल्वेचे इंजीन येऊन थांबल्याने मोठा गोंधळ उडाला. ही घटना संध्याकाळी पावणेपाचच्या सुमारास घडली. सुदैवाने त्यावेळी कोणी नसल्याने भीषण दुर्घटना टळली. यावेळी संतप्त लोकांनी रेल्वे अधिकार्‍यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केल्याने वातावरण तंग बनले होते. मात्र, रेल्वे पोलिसांनी लोकांची समजूत घातल्यानंतर वातावरण निवळले.
कुडचडे रेल्वे स्थानकातील ट्रॅक नंबर दोनवर तांत्रिक बिघाड असल्याने वारंवार डबे घसरण्याच्या घटना घडत असतात. बर्‍याच वेळा मागील डबे मुख्य रेल्वेपासून अलग होण्याच्या घटना घडतात. काल संध्याकाळी इंजिनाकडचा भाग सुटून रेल्वे फाटकाजवळील रुळावर मध्येच बंद पडली. ही रेल्वे कुळेहून मडगावच्या दिशेने जात होती. तत्पूर्वी, दिल्लीला जाणारी एक्सप्रेस रेलगाडी आल्याने ती थांबवण्यात आली होती. इंजीन सुटले त्यावेळी रेल्वेचे फाटक उघडे होते. त्यामुळे सदर बाजूने एखादे वाहन गेले असते तर मोठा अनर्थ घडला असता असे तिथे उपस्थित असलेल्या लोकांनी सांगितले. या मार्गावर नेहमी मोठी वर्दळ असते.
स्थानिक लोकांनी या घटनेनंतर रेल्वे स्थानकावरील स्टेशन मास्तरांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधित अधिकारी त्यावेळी उपस्थित नव्हते असे संतप्त लोकांना सांगण्यात आले. त्यामुळे जमलेल्या लोकांनी उपस्थित रेल्वे कर्मचार्‍यांना फैलावर घेतले. यावेळी तणाव निर्माण झाल्याने रेल्वे पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी जमावाला बाहेर काढून फाटक बंद करून रेल्वे वाहतूक पुन्हा सुरू केली.