कुठ्ठाळी येथे महिन्याभरात पर्यायी मार्ग ः मुख्यमंत्री

0
118

कुठ्ठाळी येथे राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. रेल्वे मार्गाच्या बाजूने पर्यायी रस्ता तयार करण्यासाठी मान्यता मिळाली असून येत्या महिनाभरात रेल्वे मार्गाच्या बाजूने पर्यायी रस्ता तयार करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

कुठ्ठाळी येथे महामार्गावरून वाहतूक सुरू असताना नवीन रस्त्याचे काम करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी रस्ता अन्य मार्गाने वळवून रस्त्याचे बांधकाम केले जात आहे. रेल्वेच्या बाजूने पर्यायी मार्ग तयार करण्यासाठी प्रयत्न सुरू होता. या पर्यायी रस्त्यासाठी मान्यता मिळाल्याने पर्यायी मार्ग महिनाभरात तयार करून वाहतूक वळविण्यात आल्यानंतर वाहतूक कोंडीच्या समस्येवर तोडगा निघू शकतो, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

खाणबंदी फेरविचार
याचिका १५ पूर्वी सुनावणी
राज्यातील खाण बंदीच्या आदेशावर फेरविचार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका येत्या १५ डिसेंबरपूर्वी सुनावणीसाठी येण्याची शक्यता आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.

राज्यातील बंद असलेल्या खाण व्यवसाय लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. सरकारच्यावतीने ऍडव्होकेट जनरल आणि पॅनल ऑफ ऍडव्होकेट प्रतिनिधित्व करणार आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

काणकोण बगलरस्त्याचे
२९ रोजी उद्घाटन
काणकोण येथे नव्याने बांधण्यात आलेल्या राष्ट्रीय महामार्ग बगल रस्त्याचे उद्घाटन शुक्रवार दि. २९ रोजी सकाळी ११ वाजता केंद्रीय महामार्ग आणि रस्ता वाहतूक मंत्री नितीन ग़डकरी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या मार्गामुळे काणकोण – पोळोळे हे २१ किमीचे अंतर केवळ ७ किमीवर येणार आहे. या मार्गावर गालजीबाग, तळपण, माशे अशा तीन ठिकाणी पूल उभारण्यात आलेले आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

उत्तर गोव्यातील किनारी भागात योग्य साधनसुविधांच्या अभावामुळे वीज व पाण्याची समस्य भेडसावत आहे. वीज समस्या सोडविण्यासाठी नवीन साधनसुविधा उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी वर्षभराचा कालावधीची आवश्यकता आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. किनारी भागातील मंत्री मायकल लोबो यांनी वीज व पाणी समस्येचा विषय निदर्शनास आणून दिला असून तेही अधिकार्‍यांकडून आवश्यक कामे करून घेऊ शकतात, असेही मुख्यमंत्री म्हणाले.