कुटुंबियांसह रस्त्यावर येण्याचा पर्यटक टॅक्सी मालकांचा इशारा

0
116

>> चर्चिल आलेमाव यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

पर्यटक टॅक्सी मालक हे गोमंतकीय असून त्यांना डावलून परप्रांतियांच्या गोवा माईल्स ऍप टॅक्सींना परवाना देवून सरकार गोमंतकीयांवर अन्याय करीत आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना भेटून सर्व माहिती दिली आहे. त्यांनी आपण टॅक्सी संघटनांची बैठक घेवून तोडग्याचे आश्‍वासन दिले आहे. मात्र, तोडगा न निघाल्यास गोव्यातील सर्व पर्यटक टॅक्सी चालक कुटुंबियांसह रस्त्यावर येतील असा इशारा आमदार चर्चिल आलेमाव यांनी काल दिला. दरम्यान, या प्रकरणी काल कोलवा बंदचे आयोजन करण्यात आले होते.

शनिवारी गोवा माईल्स टॅक्सी चालक व गोवा पर्यटक टॅक्सी यांच्यातील भांडणानंतर काल चर्चिल आलेमाव यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेवून बोलणी केली. त्यानंतर त्यांनी विविध टॅक्सी संघटना व टॅक्सी चालक यांची बैठक घेतली. त्यावेळी आमदार रेजिनाल्ड लॉरेंस, आमदार विल्फे्रड डिसा, अखिल गोवा टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष चेतन कामत, बाप्पा कोरगावकर, अखिल गोवा काळ्या पिवळ्या टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष आनंद नाईक उपस्थित होते. यावेळी सर्वांनी न्याय मिळविण्यासाठी रस्त्यावर येण्याचा इशारा दिला. माईल्स टॅक्सीना परवाना द्यायचा असेल तर शहरात द्या, किनार्‍यावर नको. तसेच माईल्सचे चालक परप्रांतीय असून त्यांना पंधरा वर्षे गोव्यात वास्तव्याचा दाखला व बॅच परवाना देताना आवश्यक करा. किनारपट्टी भागात जागता पहारा ठेवण्याचा इशारा केंद्र सरकारने दिला असल्याने कोणतीच माहिती नसलेल्या गोवा माईल्सना परवाना देणे धोकादायक असल्याचे चर्चिल आलेमाव यांनी सांगितले. पर्यटन महामंडळाने टॅक्सी चालकांना विश्‍वासात न घेता परवाने दिले ते तात्काळ रद्द करावे अशी मागणी केली.

रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी सांगितले की, चर्चिल आलेमाव हे गोवा पर्यटक टॅक्सी चालकांसाठी भांडतात ते योग्य आहे. आपण विधानसभेत हा प्रश्‍न उपस्थित केल्यानंतर माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी लक्ष घालण्याचे आश्‍वासन दिले होते. तसेच पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष निलेश काब्राल यांच्याही निदर्शनास आणून दिले होते. आपण टॅक्सी मालकांसोबत असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार विल्फ्रेड डिसा यांनीही पाठिंबा दिला.

मुख्यमंत्र्यांनी आमच्या कोणत्याच संघटनांना विश्‍वासात न घेता गोवा माईल्स टॅक्सी सेवा आणून परप्रांतियांना परवाने दिले. त्यामुळे गोमंतकीयांचे नुकसान होणार असून गोमंतकियांना एकजुटीने लढा देण्याची गरज आहे असे बाप्पा कोरगावकर यांनी सांगितले.