कुझनेत्सोवा, वावरिंकाला वाईल्ड कार्ड

0
119

>> युएस ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धा सुवर्णमहोत्सवी वर्ष

माजी युएस ओपन विजेते स्टॅन वावरिंका व स्वेतलाना कुझनेत्सोवा यांच्यासह दोनवेळची ऑस्ट्रेलियन ओपन विजेती व्हिक्टोरिया अझारेंका यांना आगामी युएस ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेसाठी वाईल्ड कार्ड देण्याता निर्णय आयोजकांनी काल जाहीर केला. न्यूयॉर्कमध्ये २०१६ साली नोवाक जोकोविचचा पराभव करत जेतेपदाला गवसणी घातलेला वावरिंका १५१व्या स्थानी घसरला आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे मागील वर्षाच्या शेवटच्या सहामाहीत तो स्पर्धात्मक टेनिसपासून दूर राहिला होता. २००४ साली किशोरवयात युएस ओपन जिंकण्याचा पराक्रम केलेल्या ३३ वर्षीय कुझनेत्सोवाने डाव्या मनगटाच्या शस्त्रक्रियेनंतर पुनरागमन करताना ८८व्या स्थानापर्यंत मजल मारली होती. परंतु, १६ जुलै या पात्रतेच्या अंतिम तारखेपर्यंत तिला निर्धारित खेळाडूंत स्थान मिळवता आले नव्हते. मुलींच्या गटातील विद्यमान विजेती अमांडा अनिसिमोवा व क्लेर लियू यांच्यासह असिया मोहम्मद, व्हाईटनी ओसुगवे व फ्रान्सच्या हार्मनी टान यांनादेखील महिला एकेरीसाठी वाईल्ड कार्ड मिळाले. पुुरषांमध्ये टिम स्मायझेक, मायकल मोह, नोहा रुबिन तसेच कॉरेंटिन मोटेट, जेसन कुबलर, ब्रॅडली क्लान व जेन्सन ब्रूक्सबी यांना वाईल्ड कार्ड देण्यात आले आहे.

विजेत्याला मिळणार २.९९ मिलियन पाउंड्‌स

अमेरिकेत २७ ऑगस्टपासून होणार्‍या युएस ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या आयोजकांनी यंदाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षासाठी आपल्या बक्षीस रकमेत ५ टक्क्यांनी वाढ केली आहे. या वाढीनुसार पुरुष व महिला एकेरीतील विजेत्याला प्रत्येकी २.९९ मीलियन पाउंड्‌स बक्षीस मिळणार आहे. अँजेलिक कर्बर व नोवाक जोकोविच यांना मिळालेल्या बक्षीस रकमेपेक्षा ५९०,००० पाउंड्‌सनी ही रक्कम अधिक आहे. आयोजकांनी या वर्षी एकूण बक्षीस रक्कम ५३ मीलियन डॉलर्सपर्यंत (४१.७ मिलियन पाउंड्‌स) वाढवली आहे. २०१३ सालापासून युएस ओपनच्या बक्षीस रकमेत तब्बल ५७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ‘फ्लशिंग मिडोज’वरील एकेरीतील उपविजेत्यांना १.४६ मिलियन पाउंड्‌स मिळतील. तर दुहेरीतील विजयी संघातील प्रत्येकाला ५५१,००० मिलियन पाऊंड्‌स देण्यात येणार आहेत. पहिल्या फेरीतील पराभूत खेळाडूसुद्धा ४२,५०० पाऊंड्‌सनी श्रीमंत होणार आहेत. युऐस ओपन ही सर्वांत अधिक बक्षीस रकमेची स्पर्धा म्हणून ओळखली जाते. ऑस्ट्रेलियन, फ्रेंच ओपन व विंबल्डनमधील विजेत्याला अनुक्रमे २.३२ मिलियन पाउंड्‌स, १.९३ मिलियन पाउंड्‌स व २.२५ मिलियन पाउंड्‌स दिले जातात.