कुजिरा शैक्षणिक संकुलातील पार्किंग व्यवस्थेसाठी मास्टर प्लॅन

0
114
????????????????????????????????????

>> संकुलाचे होणार दीनदयाळ उपाध्याय असे नामकरण

कुजिरा येथील शैक्षणिक संकुलाचे पं. दीनदयाळ उपाध्याय विद्या संकुल असे नामकरण केले जाणार आहे. या संकुलातील विविध समस्या सोडविण्यासाठी नियुक्त टास्क फोर्सने तेथील वाहतूक व पार्किंग समस्या सोडविण्यासाठी १० कोटी रुपये खर्चाचा मास्टर प्लॅन तयार केला आहे, अशी माहिती टास्क फोर्सचे अध्यक्ष, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

वाहतूक व पार्किंग ही या संकुलातील एक प्रमुख समस्या आहे. ही समस्या सोडविण्यासाठी जीएसआयडीसीला मास्टर प्लॅन तयार करण्याची सूचना केली होती. राहुल देशपांडे आणि कंपनीतर्फे पार्किंग व वाहतूक व्यवस्थेत सुसूत्रता आणण्यासाठी तयार केलेला मास्टर प्लॅन शैक्षणिक संस्थांसमोर मांडण्यात आला आहे. मुलांच्या सुरक्षेवर मास्टर प्लॅनमध्ये भर देण्यात आला आहे. विद्या संकुलाच्या प्रवेशद्वाराच्या आतमध्ये कुठल्याही प्रकारची वाहने नेण्यास मान्यता दिली जाणार नाही. मुख्य फाटकावर मुलांना सोडण्यात आल्यानंतर पर्यायी पायवाटेतून मुले संबंधित शाळेच्या आवारात जातील. पादचारी मुले आणि वाहनांसाठी वेगळा रस्ता निश्‍चित करण्यात आला आहे. पार्किंग जागेत ८६४ दुचाक्या, २५६ चार चाकी आणि ६४ बसगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे, असेही कुंकळ्येकर यांनी सांगितले.

कुजिरा शिक्षण संकुलात सध्या पाच शैक्षणिक संस्था कार्यरत आहेत. आगामी शैक्षणिक वर्षापासून आणखी एका संस्थेचे स्थलांतर केले जाणार आहे. कुजिरा शिक्षण संकुलातील संस्थांना भेडसावणार्‍या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. वीज समस्या सोडविण्यासाठी दोन नवीन वीज ट्रान्स्फॉर्मर बसविण्यात आले आहेत. पाणी समस्या सोडविण्यासाठी नवीन जलवाहिनी घालण्यात आली आहे. सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी सांडपाणी निचरा प्रकल्प उभारण्यात आला आहे, असेही कुंकळ्येकर यांनी सांगितले.

या शैक्षणिक संकुलातील रस्ता क्षेत्रातील भिंतीचा आर्ट गॅलरी म्हणून विकास केला जाणार आहे. या भिंतीवर चित्रांचे प्रदर्शन करण्यासाठी योग्य तरतूद केली जाणार आहे. संकुलाच्या प्रवेशद्वारावर दीन दयाळ उपाध्याय यांचा पुतळा उभारण्यात येणार आहे. संकुलातील जुन्या ओहळाचे सुशोभीकरण केले जाणार आहे. या ओहळाचे पाणी ठिकठिकाणी अडवून ठेवण्याची व्यवस्था आहे. तसेच आवारात विविध प्रकारच्या झाडांची लागवड केली जाणार आहे.
सर्व प्रवेशद्वार व बाहेर जाणार्‍या दरवाजांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. सरकारी मान्यतेनंतर प्रत्यक्ष कामाला एप्रिल किंवा मे महिन्यात सुरुवात होईल. दुसर्‍या टप्प्यातील आराखड्यामध्ये मल्टी क्रीडा संकुल, प्रशासकीय इमारतीचा समावेश आहे. त्यात आयएएस परीक्षेसाठी कोचिंग वर्ग, बँक, शिक्षण खात्याचे कार्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव आहे, असेही कुंकळ्येकर यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला आमदार ऍन्थोनी फर्नांडिस, फोर्सचे सदस्य महेश कांदोळकर, संदीप चोडणकर, सुहास सरदेसाई, भाटीकर, शिक्षण खात्याचे संचालक गजानन भट, राहुल देशपांडे यांची उपस्थिती होती.