कुंकळ्ळीतील एनआयटी संकुलाचे बांधकाम जुलै २०२१ मध्ये पूर्णत्वास

0
134

एनआयटी गोवाच्या कुंकळ्ळी येथील नियोजित संकुलाचे बांधकाम जुलै २०२१ मध्ये पूर्ण होणार आहे. एनआयटीचे संकुलात अत्याधुनिक साधन सुविधा उपलब्ध करताना पर्यावरणाचे संवर्धनासाठी हरित प्रकल्पाची (गो ग्रीन) संकल्पना राबविली जाणार आहे. पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर, सौरऊर्जा प्रकल्प उभारला जाणार आहे, अशी माहिती एनआयटी गोवाच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष आणि संचालक प्रा. डॉ. गोपाल मुगेराय यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.

एनआयटी गोवाच्या संकुलासाठी १२४ एकर जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात ४३ एकर जमिनीमध्ये बांधकाम केले जाणार आहे. जागेच्या सभोवताली कुंपण उभारण्याचे काम ६० टक्के पूर्ण झाले आहे. संकुलातील झाडांचे संवर्धन केले जाणार आहे. संकुल उभारणीसाठी सुमारे ३९६ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. संकुल उभारण्यासाठी सीपीडब्लूडीक़डे सामंजस्य करार करण्यात आला आहे. या संकुलात विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट क्लास रूम, डिजिटल वाचनालय व इतर सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. मुगेराय यांनी दिली.

स्थानिक विद्यार्थ्यांच्या राखीव
५०% जागा भरल्या
एनआयटी गोवा मध्ये स्थानिक विद्यार्थ्यांसाठी राखीव असलेल्या ५० टक्के जागा यावर्षी भरल्या आहेत. एनआयटीमध्ये मॅकानिकल आणि सिव्हिल या दोन नवीन शाखा सुरू करण्यात आल्या आहेत. संस्थेचे स्वतःचे संकुल नसताना सुध्दा राष्ट्रीय पातळीवरील एनआयआरएफ रॅर्कींगमध्ये ८७ वा क्रमांक पटकाविला आहे. देशात स्थापन केलेल्या ११ नवीन एनआयटीमध्ये गोवा ही संस्था सर्वोत्तम ठरली आहे. संस्थेच्या पाचव्या पदवीदान सोहळ्यात १११ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान केल्या जाणार आहेत.