कीर्तनप्राज्ञ ह.भ.प. शंकरशास्त्री घाटे

0
143

– गोविंद काळे

 

यत्कीर्तनं यत्स्मरणं यदीक्षणं
यदवन्दनं यच्छ्रवणं यदर्हणम्‌|
लोकस्य सद्यो विधुनोति कल्मषम्
तस्मै सुभद्रश्रवसे नमो नमः॥
————————
ज्याचे कीर्तन, स्मरण, दर्शन, वंदन, श्रवण, पूजन माणसाच्या सर्व पापांचा नाश करते त्या मंगलमय यशदायी भगवंताला वारंवार नमस्कार असो.

 

‘परा यया तदक्षरम् अधिगम्यते’- परा विद्येचा ध्यास घेतलेले, अयाचित वृत्तीने राहणारे, श्‍वासागणिक ‘सोऽहं’चा जप करणारे, वेद-वेदांतावर असामान्य प्रभुत्व प्राप्त केलेले यतिवर्य गोविंदमामा उपाध्ये यांच्याकडे अध्ययन करण्याचा योग शंकरशास्त्री घाटे यांच्या वाट्याला आला. ते स्वतःस परम भाग्यवान समजत. ‘क्षणशः कणश्‍चैव विद्यामर्थं साधयेत्’- क्षणाक्षणाने विद्या आणि कणाकणाने धन प्राप्त केले पाहिजे. घाटेबुवांना कणाकणाने अर्थ गोळा करणे जमले नाही, परंतु आयुष्याचा प्रत्येक क्षण विद्यार्जनासाठी कामी लावला. धनार्थी होण्यापेक्षा ज्ञानार्थी होणे त्यांनी पसंत केले. एका अर्थाने प्रवाहाविरुद्ध पोहणे.
शंकरशास्त्री घाटेंनी वयाच्या सहाव्या वर्षी विद्यारंभ केला तो वयाच्या तेहतीसाव्या वर्षापर्यंत विद्याभ्यासच केला. याज्ञिकी, ज्योतिषशास्त्र, व्याकरण इत्यादीबरोबरच बंगाल संस्कृत असोसिएशनची काव्यतीर्थ, हिंदी राष्ट्रभाषा कोविद, बडोदा येथील श्रावणमास दक्षिणा परीक्षा, पुण्याच्या हरिकीर्तनोत्तेजक सभेचा चार वर्षांचा कीर्तन अभ्यासक्रमही मोठ्या आनंदाने पूर्ण केला. ब्रह्मसूत्रे, गीता आणि दशोपनिषदे या प्रस्थानत्रयीवर अधिकारवाणीने निरुपण करणार्‍या विद्वानांमध्ये गोमंतकीय शंकरशास्त्री घाटेबुवांचे नाव प्राधान्याने घेतले जाई. स्वामी विद्यारण्यांच्या पंचदशी ग्रंथावर त्यांचा विशेष अभ्यास होता.
कीर्तन रंगवायचे असेल तर केवळ वक्तृत्व उत्तम असून चालणार नाही तर त्याचबरोबर शास्त्रीय संगीताची जाणसुद्धा चांगली असली पाहिजे. ठेका कळला पाहिजे, कोणत्या वेळी कोणत्या रागाची निवड करावी हे समजले पाहिजे. समारोपाची भैरवी श्रोत्यांच्या काळजाला हात घालेल अशी गाता आली पाहिजे. गद्य कीर्तन म्हणजे रुक्ष कीर्तन. त्यासाठी सांगलीला राहून संगीताचे शिक्षण बुवांनी घेतले. बुवांचे कीर्तन कधी संपेल असा विचार श्रोत्यांच्या मनात येता कामा नये तर कीर्तन संपले हे कळलेदेखील नाही असे कीर्तन रंगले पाहिजे. कीर्तनकारबुवा आणि कीर्तनातील श्रोता- उभयतांची समाधी कीर्तनात लागली तरच ते उत्तम कीर्तन अशी घाटेबुवांची धारणा होती.
बुवांच्या इतक्या पदव्या, पांडित्य आणि सुंदर सादरीकरण पाहून एका चाणाक्ष श्रोत्याने बुवांना प्रश्‍न केला- ‘बुवा! तुमचे गुरू तरी कोण?’ बुवा क्षणभर थांबले. कानाच्या दोन्ही पाळ्यांना अंगुष्ठ आणि तर्जनीने स्पर्श केला आणि गायला सुरुवात केली.
जो जो जयाचा घेतला गुण
तो तो मिया गुरू केला जाण
गुरुसी आले अपारपण
जग संपूर्ण गुरू दिसे
साक्षात प्रभुदत्तात्रेयांनी चोवीस गुरू केले. मी तर एक सामान्य कीर्तनकार. ज्याच्या-ज्याच्याकडून शिकलो ते सारेच गुरू. ‘बालादपि सुभाषितम्’- लहान मुलाकडूनसुद्धा त्याचे गोड (बोबडे) बोल घ्यावेत असे सुभाषितकारांनी लिहूनच ठेवले आहे. जीवनाकडे, विशेषतः आपल्या अध्ययनाकडे पाहताना बुवांनी हा उदारमतवादी दृष्टिकोन अखेरपर्यंत बाळगला.
ज्योतिष विद्येचा उत्तम अभ्यास असल्यामुळे प्रश्‍न घेऊन येणारी अनेक मंडळी मोठ्या श्रद्धेने, आस्थेने बुवांच्या चरणावर मस्तक टेकवून दक्षिणा समर्पण करीत. माझ्या दारी मोठ्या आत्मीयतेने ही मंडळी आपल्या सांसारिक अडचणी, प्रश्‍न घेऊन आली आहे. दामोदरा! त्यांच्या अडचणी तू सोडव. ज्योतिशास्त्र म्हणजे ‘वेदानां चक्षुः’- वेदांचे डोळे आहेत. या डोळ्यांना त्यांची दुःखे दिसू देत, अशी प्रार्थना देव दामोदराकडे करूनच ते ज्योतिष कथन करीत. ज्योतिषशास्त्राचा केवळ अभ्यास पुरेसा नाही तर दारी येणार्‍याचे कल्याण व्हावे ही आंतरिक तळमळ असली पाहिजे त्यासाठी देवाकडे प्रार्थना. त्यामुळे त्यांच्या हाताला- वाणीला यश लाभे. त्यांच्या चरितार्थाचे साधन ज्योतिषविद्या असली तरी संस्कृत व हिंदी भाषेची पदवी असल्यामुळे मडगावच्या मॉडेल हायस्कूलमध्ये काही वर्षे शिक्षक म्हणूनही काम यशस्वीपणे सांभाळले. गुरू-शिष्य परंपरा हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. जीवनाच्या प्रत्येक पावलावर गुरूंचे मार्गदर्शन उपयोगी पडते. गुरू-शिष्यांचे नातेच असे आहे. ‘गुरू हा केला पाहिजे’ असे उद्गार वारंवार त्यांच्या वाणीतून येत.
शंकेन भक्षितं सर्वं त्रेलोक्यं स चराचरम्
सा शंका भक्षिता येन तस्मै श्रीगुरवे नमः॥
– संपूर्ण चराचर हे त्रैलोक्य शंकेने व्यापिले आहे. शंकेनेच सर्वकाही भक्षण केले आहे. त्या शंकेला ज्याने खाऊन टाकले आहे त्यासाठी गुरू आणि त्याला नमस्कार. गुरू म्हणजे उत्तर. गुरू म्हणजे शंकेचे समाधान. गुरू म्हणजे ज्ञान. अभ्यास आणि पाठांतर उत्तम असल्यामुळे सूत्रबद्ध उत्तर देण्यात त्यांचा हातखंडा होता. येणार्‍याला निरुत्तर करण्यापेक्षा समाधानी करण्याची विलक्षण हातोटी बुवांना साधली होती.
ईश्‍वरावर श्रद्धा ठेवताना परिश्रमाचे महत्त्व त्यांनी कधीही कमी मानले नाही. ‘प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे’, ‘प्रयत्नांती परमेश्‍वर’, ‘कष्टाशिवाय फलप्राप्ती नाही’ असे ते वारंवार प्रतिपादन करीत. विद्यार्थिजीवनातील आठवणी सांगताना त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहत. ज्योतिषशास्त्राच्या परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यावर रुपये बारा व प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. पंचांगकर्ते ज्योतिर्विद छत्रेशास्त्रींनी त्यांची मौखिक परीक्षा घेतली होती. छत्रेशास्त्रींच्या पुढ्यात उभे राहताना नामांकित ज्योतिषीसुद्धा भीतीने मागेपुढे होत. त्यांचे समाधान करणे महाकठीण. शंकरशास्त्री घाटेंनी बालवयातच त्यांच्याकडून शाबासकी मिळविली. त्यांच्या मौखिक परीक्षेला लक्ष्मणशास्त्री मुरगूडकर नावाचे दुसरे एक प्रकांडपंडित उपस्थित होते. त्यांनी तर हा विद्यार्थी उत्तम तयारीचा आहे असे जाहीर प्रशस्तिपत्र दिले. पंढरपूर येथे ही परीक्षा घेण्यात आली. तत्कालीन राष्ट्रीयपंडित धर्मप्राण धारूरकर शास्त्रींच्या हस्ते बुवांना गौरविण्यात आले. बुवांच्या आयुष्यातील हा अतीव आनंदाचा क्षण. आशीर्वादाची ही कमाई बुवांनी विद्यार्थिदशेतच मोठ्या कष्टाने साध्य केली होती.
गणेशभट्ट नवाथे यांनी आपल्या सावईच्या दत्तमंदिरात शंकरशास्त्री घाटेंची कीर्तने ठेवली होती. गणेशभट्ट म्हणत, ‘हा घाटे दिसायला बारीक पण एकदा का पगडी चढवून व्यासपीठावर कीर्तनाला उभारला म्हणजे अंगात भार आल्यासारखे होते व तो देवर्षी नारद बनून कीर्तन करू लागतो.’ नवाथेंचा हा अभिप्राय घाटेंच्या कीर्तनाचा महिमा सांगणारा, अधिक बोलका आहे.
सौराष्ट्रमधील सोमनाथ मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. महमद गझनी नावाच्या यवन सरदाराने ते वारंवार लुटले. भारत स्वातंत्र्यानंतर देशाचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी मंदिराचा जीर्णोद्धार करून गतवैभव प्राप्त करून दिले. सात दिवस चाललेल्या धार्मिक सोहळ्यासाठी देशाच्या विविध भागांतील विद्वान- पंडितांना निमंत्रित करण्यात आले होते. तर्कतीर्थ पं. लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी सोहळ्याचे अध्वर्यूपण भूषविले होते. ब्रह्मा, होता, उद्गाता तीनही पदांवर विद्वान पंडितांची नियुक्ती करण्यात आली होती. निमंत्रित विद्वानांमध्ये शंकरशास्त्री घाटे यांचे नाव होते. तर्कतीर्थांना या कामी त्यांनी मोलाचे सहकार्य केले. आपल्या आयुष्यातील हा सोहळा आणि त्यातील सहभाग जन्मोजन्मी लक्षात ठेवावा एवढा असाधारण असल्याचे घाटेशास्त्री मोठ्या नम्रतेने प्रतिपादन करीत. राष्ट्रीय स्तरावरील विद्वानांच्या पंक्तीत स्थान मिळणे सोपे नव्हे. त्यांच्या विद्वत्तेची झलक सांगण्यास एवढा एकच प्रसंग पुरेसा ठरावा.
ज्योतिषशास्त्राने पोटाची भूक भागविली, परंतु बुद्धीची आणि मनाची भूक याच कीर्तनाने भागविली. ‘शांतिपरते नाही सुख| येर ते अवघेची दुःख’
कीर्तनाने शांती दिली, जगण्याला समाधान दिले असे बुवा वारंवार सांगत.
ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासातून बुवा प्रचंड दौलत उभे करू शकले असते. परंतु आपली विद्वत्ता आणि अधिकाराचा वापर त्यांनी रंजल्या-गांजल्या लोकांसाठी अधिकतर केला.
जे का रंजले गांजले
त्यासी म्हणे जो आपुले
तोचि साधू ओळखावा
देव तेथेचि जाणावा
संत तुकाराम महाराजांचा अभंग कीर्तनात आळवताना आपले आचरण या अभंगाच्या विचाराशी सुसंगत राहील याची दक्षता त्यांनी आयुष्यभर घेतली. गोरगरिबांना मदतीचा हात पुढे करणारे पुरोहित असा त्यांचा गोमंतकात लौकिक होता. मोठमोठ्या धार्मिक कार्यात त्यांना पाचारण केले जाई. पुण्यातील बाबा महाराज सहस्रबुद्धे समाधी मंदिरात संपन्न झालेल्या लक्षचंडी सोहळ्यातही त्यांचा सहभाग होता. गोमंतक, कारवार, कोकण या ठिकाणी झालेल्या कीर्तन संमेलनात तथा हरिभक्त परिषदेच्या कार्यातही त्यांचे मौलिक योगदान लाभले आहे.
खंडेपार येथील शांतादुर्गा मंदिरात वीस वर्षे नवरात्र कीर्तनसेवा केली. मडगाव येथील दामोदर सालच्या बाजूस असलेल्या राममंदिरातही बुवांनी कीर्तनसेवेचा उपक्रम केला. बाहेर बिदागी जास्त मिळते आहे म्हणून परंपरागत कीर्तनसेवा बुवांनी कधीही खंडित केली नाही. त्यांच्या विद्वत्तेची आणि कीर्तनसेवेची दखल गोवा शासनाच्या कला व संस्कृती खात्याने घेऊन १९८७-८८ च्या कीर्तनविषयक कामगिरीबद्दल त्यावेळचे मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
१९७५ मध्ये गोमंतकातील वेदमूर्ती पं. हरिभाऊ बोरकर आणि वे.शा.सं. कृष्णमामा केळकर यांचा हृद्य सत्कार गोमंतकातील जनतेमार्फत करण्यात येऊन थैली अर्पण करण्यात आली होती. त्या दोन विद्वानांनी थैलीतील रकमेचा उपयोग व्यक्तिगत संसारासाठी न करता गोमंतक संस्कृतोत्तेजक संस्थेच्या शांकर पाठशाळेकडे सुपूर्द केली. खडतर तपश्‍चर्या करून वेदाध्ययन करणार्‍या गोमंतकीयाचा सत्कार व्यासपौर्णिमेच्या दिवशी करून त्यांना थैली अर्पण करण्यात येते. १९९०-९१ मध्ये पं. शंकरशास्त्री घाटेंचा सत्कार व्यासपौर्णिमेला करण्यात आला. आयुष्यातील अत्युच्च सन्मान मिळाला अशी भावना पं. घाटेशास्त्रींंची होती.
१९२० ते १९९२ म्हणजे सत्तर वर्षांचा कालखंड. बुवांचे निर्वाण २८ मे १९९२ रोजी झाले. बुवांनी ‘विद्या धनं सर्व धनप्रधानम्’ मानून एखाद्या साधकाप्रमाणे विद्याभ्यास आयुष्याच्या शेवटच्या श्‍वासापर्यंत केला. गोमंतकीय कीर्तनकार परंपरेत विद्याव्रती पं. ह.भ.प. शंकरशास्त्री घाटेंचे नाव मोठ्या सन्मानाने आणि आदराने घ्यावे लागते.