‘किशोरवयीन मुलांचं पालकत्व’ : एक कठीण काम!!

0
1326

– डॉ. सुषमा किर्तनी

(भाग – १)

किशोरावस्था ही बालकापासून तरुणापर्यंतचा प्रवास आहे आणि त्यामुळे त्यांचं पालकत्व हे सुद्धा बालवयापासून तारुण्यापर्यंत मार्गदर्शन करण्याचा एक प्रवासच आहे. पालकांना त्यांच्या मुलांमध्ये उत्तम गुणांची पेरणी करावी लागते, तसेच त्या मुलांना स्वावलंबी व एक जबाबदार नागरिक बनण्यासाठी मदत करावीच लागते. आणि म्हणूनच पालकत्व हे मध्यम वयातील एक आव्हानात्मक आणि महत्त्वाचे विकासात्मक कार्य आहे.

पालकत्व म्हणजे काय?…
पालकत्व ही मुलांना वाढविण्याची कला आहे. ही एक समांतर प्रक्रिया आहे ज्यामध्ये मुले आणि पालक दोघेही एकमेकांपासून बरेच काही शिकतात आणि बहुधा ते त्यांच्याहातून घडणार्‍या चुकांपासून! पालकत्वाची कला ही उपजत असण्यापेक्षा ती शिकावी लागते. पालकांनी बरेचदा त्यांच्या पालकांच्या शिस्त लावण्याच्या निरनिराळ्या गोष्टी पाहिलेल्या असतात त्याच गोष्टी ते त्यांच्या मुलांसाठी उपयोगात आणू शकतात. अशा प्रकारे पालकत्वामध्ये विविध कार्ये, भावनिक जबाबदार्‍या, अडचणी आणि बक्षिसे यांचा समावेश असतो. सर्वसाधारणपणे दोन प्रकारचे पालक असतात – १. लहान तरुण पालक आणि २. तरुण मुलांचे पालक जे मध्यमवयीन असतात.
अडचण तेव्हा येते जेव्हा दुसर्‍या प्रकारचे पालक जे स्वतः मध्यमवयीन असतात व त्यांना त्यांच्या तरुण मुलांना सांभाळावे लागते शिवाय दुसर्‍या बाजूला त्यांचे आई-वडीलही असतात ज्यांचे वय वाढत असते. तर अशा मध्यमवयीन पालकांची या दोन नाजूक पिढ्यांमध्ये ‘अडकित्त्यात सुपारी’ अशी अवस्था होते. त्यांचे स्वतःचे करिअर्स ते बनवत असतात, व्यवसायाकरिता त्यांनी कर्ज घेतलेले असते आणि ते प्रचंड ताणाखाली वावरत असतात. तसेच या पालकांमध्ये संप्रेरके (हॉर्मोन्स)चे प्रमाण कमी होत असते तसेच मातांची (स्त्रियांची) रजोनिवृत्तीही जवळ आलेली असते. दुसर्‍या बाजूला किशोरवयीन मुलांमध्ये संप्रेरकांचे प्रमाण जास्त असते आणि या फरकामुळे मुले आणि पालक यांच्यामध्ये बराच संघर्ष असतो.
प्रत्येकाला हे समजून घ्यावेच लागेल की एका छोट्या मुलाला सांभाळणे आणि वयात येणार्‍या मुलांना सांभाळणे यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. १० ते १४ वयोगटातील मुले सांभाळणे हा पालकांसाठी खूप कठीण काळ असतो. याचे कारण लहानपणीच्या वागणुकीपेक्षा किशोरवयातील वागणूक ही बंडखोरीची असते. पालक या मुलांना कधी लहान म्हणतात तर दुसर्‍या वेळेला मोठा म्हणून त्यांना गोंधळवून टाकतात. शारीरिक बदल, संप्रेरकांमधील बदल, मुलींमध्ये सुरू होणारी मासिक पाळी या सगळ्यांमुळे किशोरवयीन मुले गोंधळलेली असतात व त्यामुळेच ती अस्वस्थ होतात. किशोरवयिनांच्या शरीर अवयवांची अनियमित वाढ झाल्यामुळे त्यांच्यात एक बेढबपणा दिसून येतो आणि यामुळे कुटुंबात वाद निर्माण होतात. पालकसुद्धा यावेळी त्यांच्यावर विशेषतः मुलींवर खूप कडक निर्बंध लादण्याचा प्रयत्न करतात ज्याचा त्यांना खूप त्रास होत असतो. त्या मुलांमध्ये निश्‍चितपणे कोणते बदल होणार यासाठी पालकही तयार नसतात, विशेषतः मुलींमधील, मासिक पाळीची समस्या! पालकत्वाचे चांगले परिणाम मिळवण्यासाठी घरातील कौटुंबिक वातावरण हे काळजी घेणारं, स्थिर आणि संगोपन करणारं असलं पाहिजे. पालक आणि मुलांनी एकमेकांना समजून घेण्याची फार गरज आहे जे जगण्याचं एक कौशल्य आहे, ज्यामुळे मग पालकत्व सोपं होऊन जातं.
पालकत्वावर परिणाम करणारे घटक कोणते?…
१) पालकांची शैक्षणिक पार्श्‍वभूमी –
सर्वसाधारणपणे शिकलेले पालक हे किशोरवयीनांसोबत चर्चा करण्यासाठी नेहमी तयार असतात कारण एक तर त्यांनी त्यांच्या समस्यांबद्दल वाचलेले असते आणि ते त्या सोडवण्यासाठी जास्त मित्रत्वाच्या नात्याने वागतात. काहीवेळा कमी शिकलेले पालक त्यांच्या मुलांकरता जास्त वेळ काढतात आणि चांगले शिकलेले नेहमी त्यांच्या करिअर बनवण्यात व्यस्त असतात. त्यामुळे ते आपल्या किशोरवयीन मुलांना सर्व प्रकारचे स्वातंत्र्य देऊन मोकळे होतात. अशी मुले खूप बिघडतात आणि त्यांना सांभाळणे कठीण होते.
२) सामाजिक व सांस्कृतिक पार्श्‍वभूमी.
३) गर्भश्रीमंत पालक.
४) कुटुंबाचा आकार किंवा सदस्यांची संख्या.
५) आयांचे व्यवसाय आणि तिचे कुटुंबातील वर्चस्व किंवा तिला कुटुंबात मिळणारा सन्मान.
६) आजी-आजोबांची लुडबुड आणि हस्तक्षेप.
क्रमशः