किवीज-लंका कसोटी रोमांचक स्थितीत

0
121

>> वॉटलिंगचे झुंजार अर्धशतक

>> एम्बुलदेनियाचे चार बळी

न्यूझीलंड व श्रीलंका यांच्यातील पहिल्या कसोटी सामना तिसर्‍या दिवसअखेर रंगतदार स्थितीत येऊन पोहोचला आहे. निरोशन डिकवेलाच्या चिवट अर्धशतकाच्या बळावर श्रीलंकेने पहिल्या डावात १८ धावांची आघाडी घेतल्यानंतर न्यूझीलंडने दुसर्‍या डावात ७ बाद १९५ धावा केल्या आहेत. त्यांच्याकडे १७७ धावांची आघाडी असून यष्टिरक्षक फलंदाज बीजे वॉटलिंग ६३ धावांवर नाबाद आहे.

दुसर्‍या दिवसाच्या ७ बाद २२७ धावांवरून काल पुढे खेळताना लकमलने डिकवेलाला चांगली साथ देताना संघाच्या धावसंख्येत अजून पंधरा धावांची भर घातली. रॉस टेलरने लकमलचा त्रिफळा उडवून ही जोडी फोडली. या दरम्यान डिकवेला याने आपले १२वे कसोटी अर्धशतक लगावले. त्याने आपल्या खेळीत केवळ ३ चौकार लगावले. दुसर्‍या दिवसअखेर २२ धावांनी पिछाडीवर राहिलेल्या लंकेने तिसर्‍या दिवशी सर्वबाद २६७ धावांपर्यंत पोहोचत १८ धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. न्यूझीलंडकडून ऐजाझने ५, सॉमरविलने ३ व बोल्टने २ गडी बाद केले. पहिल्या डावात संघाला चांगली सुुरुवात दिलेला जीत रावल दुसर्‍या डावात स्वस्तात बाद झाला. धनंजय डीसिल्वाचा चेंडू कव्हर्सच्या दिशेने खेळण्याच्या प्रयत्नात त्याने आपली विकेट बहाल केली. कर्णधार केन विल्यमसन सलग दुसर्‍या डावात दुहेरी धावसंख्या गाठण्यात अपयशी ठरला. एम्बुलदेनियाला पुढे सरसावत षटकार मारण्याचा त्याचा प्रयत्न फसला व मिड ऑनवर कुशल परेराने त्याचा अप्रतिम झेल घेतला. रॉस टेलरलादेखील आक्रमकता नडली. एम्बुलदेनियाविरुद्ध आक्रमक फटका खेळण्याच्या नादात चेंडू त्याच्या बॅट्‌ची कड घेऊन स्लिपमध्ये धनंजय डीसिल्वाच्या हातात जाऊन विसावला. यावेळी न्यूझीलंडची ३ बाद २५ अशी केविलवाणी स्थिती झाली होती.

निकोल्स व लेथम यांनी यानंतर चौथ्या गड्यासाठी ५६ धावांची भागीदारी रचली. अकिलाने लेथमला तर डीसिल्वाने निकोल्सची विकेट काढत न्यूझीलंडला ५ बाद ९८ असे संकटात टाकले. बीजे वॉटलिंग याने यानंतर आपले सतरावे कसोटी अर्धशतक पूर्ण करत तळातील फलंदाजांना हाताशी धरून लहान-मोठ्या भागीदार्‍या रचल्या. लंकेकडून एम्बुलदेनिया सर्वांत यशस्वी ठरला. त्याने ४ बळी घेतले. सामन्याचे दोन दिवस अजून शिल्लक असून न्यूझीलंडने २२५च्या आसपास आघाडी फुगवली तर लंकेला या धावसंख्येचा पाठलाग करणे सोपे जाणारनाही.

धावफलक
न्यूझीलंड पहिला डाव ः सर्वबाद २४९
श्रीलंका पहिला डाव ः ७ बाद २२७ वरून ः निरोशन डिकवेला झे. विल्यमसन गो. सॉमरविल ६१, सुरंगा लकमल त्रि. गो. बोल्ट ४०, लसिथ एम्बुलदेनिया पायचीत गो. सॉमरविल ५, लाहिरु कुमारा नाबाद ०, अवांतर ३, एकूण ९३.२ षटकांत सर्वबाद २६७

गोलंदाजी ः ट्रेंट बोल्ट २०-४-४५-२, टिम साऊथी ७-३-१७-०, विल्यम सॉमरविल २२.२-३-८३-३, ऐजाझ पटेल ३३-६-८९-५, मिचेल सेंटनर ११-०-३१-०
न्यूझीलंड दुसरा डाव ः जीत रावल झे. करुणारत्ने गो. डीसिल्वा ४, टॉम लेथम झे. थिरिमाने गो. अकिला ४५, केन विल्यमसन झे. परेरा गो. एम्बुलदेनिया ४, रॉस टेलर झे. डीसिल्वा गो. एम्बुलदेनिया ३, हेन्री निकोल्स झे. मेंडीस गो. डीसिल्वा २६, बीजे वॉटलिंग नाबाद ६३, मिचेल सेंटनर झे. लकमल गो. एम्बुलदेनिया १२, टिम साऊथी यष्टिचीत डिकवेला गो. एम्बुलदेनिया २३, विल्यम सॉमरविल नाबाद ५, अवांतर १०, एकूण ७६ षटकांत ७ बाद १९५, गोलंदाजी ः सुरंगा लकमल ८-१-२५-०, अकिला धनंजया २४-३-५६-१, धनंजय डीसिल्वा १०-३-१६-२, लसिथ एम्बुलदेनिया २९-३-७१-४, लाहिरु कुमारा ५-०-१९-०