किमयागार श्रावण…

0
153

– प्रा. सुनेत्रा कळंगूटकर

… ऊनपावसाचा पिसारा उघडून श्रावण भुईवर उतरतो. आभाळ किंचित उजळलेलं असतं… सूर्याची सोनपावलं अधूनमधून सृष्टीवर उमटत असतात… पक्षी घरट्यांतून बाहेर पडून पंख वाळवत तारांवर बसतात… इतक्यात अवचित श्रावणसर कोसळते. आकाशातून जलधारा वेगाने खाली झेपावतात आणि पक्ष्यांची धांदल उडते. मिळेल त्या दिशेने ते वेगाने उडून जातात.

श्रावणपक्षी

घननीळ फांद्यावरुनी
थिरकत आला मोर
जळी स्थळी पाषाणी
नाचू लागला मोर

लक्ष थेंबपिसार्‍यांनी
चपल विजपावलांनी
थुईथुई नाचत आला
निळानिळा हा मोर

झाडांपानांवर बरसला
फुलांफळांवर थिरकला
दृष्टी सृष्टीवर वृष्टी
रुजवूनी गेला मोर

सांडूनी गेला भवताली
जळाची पिसे निळी
सजल भुईवर पाचू
उधळूनी गेला मोर

ग्रीष्माच्या प्रखर उन्हानं होरपळून गेलेली धरणी, तहानलेली रानंवनं, नद्या, तलाव, शेतकरी आणि सगळी जीवसृष्टी चातकासारखी पावसाची वाट पाहात असतात… मृग नक्षत्र लागते आणि नभाच्या फांद्यांवरून पावसाचा निळा मोर धरेवर उतरतो… सृष्टीला सृजनाचे, लावण्याचे, चैतन्याचे वरदान देऊन जातो.
बहुरुपी पाऊस प्रत्येक महिन्यात वेगवेगळी रुपं धारण करतो. ज्येष्ठ महिन्यातला, मृग नक्षत्रावर अनावर आवेगानं कोसळणारा पाऊस… कृष्णमेघांच्या गर्जना, आभाळाच्या श्यामवर्णीय पटलावर उमटणारे विजेचे मत्त पदन्यास, सोसाट्याचा वारा हे सगळं घेऊन जेव्हा पहिला पाऊस येतो तेव्हा ग्रीष्माच्या झळांनी दग्ध झालेल्या मनांवर हळुवार फुंकर घालतो. भूमीपुत्राच्या कष्टकरी आयुष्यात आशेचे अंकुर रुजवतो. अंगणात, रस्त्यांवर थेंबांची फुलं फुलतात. अंगणातील पाण्यात कागदी होड्या तरंगू लागतात. रानातून मोरांच्या हाका ऐकू येतात…
ज्येष्ठ महिना संपून आषाढ सुरू होतो. पाऊस वाढत जातो. आभाळ फुटल्यागत पडणारा आषाढातला पाऊस दिवसरात्रीच्या सीमा मिटवतो. कृष्णमेघांनी आभाळ झाकोळून गेलेलं असतं. दिवसाही अंधार दाटलेला असतो. पाऊस बेभान होऊन कोसळत असतो. कौलारांवरून, पागोळ्यांमधून पावसाचं पाणी उत्कटतेनं धावत असतं…
पाऊस असा धुव्वांधार कोसळत असताना घरातील पाणी संपलेलं असतं. विहिरीवर जाणं कठीण होतं. घराबाहेर मात्र सर्वच पाणीच पाणी दिसत असतं. मग पागोळ्यावरचं पाणी भांड्यात धरलं जातं. न्हाणीघरातील तांब्याच्या भांड्यात भरलं जातं. घागर-कळशीच्या मुखावर पांढरा स्वच्छ पातळ कपडा बांधून पागोळ्यांमधलं पाणी त्यात धरलं जातं. पिण्यासाठी हे पाणी वापरलं जातं.
आषाढात उन्हाचे दर्शन क्वचितच होतं. हवेतील गारठा खूप वाढलेला असतो. त्या गारठ्याने अंग शिरशिरत असतं. रात्री झाडांवर काजवे चमचम करतात… झाडांवर साठलेली सगळी धूळ धुवून जाते. सृष्टी सचैल न्हाऊन निघते. तजेलदार हिरवी पानं आनंदानं हसत असतात…
अशावेळी नदीला पूर आलेला असतो. लाल पाण्याची नदी रोंरावत बेफान वेगाने धावत असते. ठिकठिकाणी लहानमोठे धबधबे, ओढे वाहत असतात. जलाशय तुडुंब भरतात. धरेला तृप्त करून आषाढ मग निरोप घेतो…
… आणि … ऊनपावसाचा पिसारा उघडून श्रावण भुईवर उतरतो. आभाळ किंचित उजळलेलं असतं… सूर्याची सोनपावलं अधूनमधून सृष्टीवर उमटत असतात… पक्षी घरट्यांतून बाहेर पडून पंख वाळवत तारांवर बसतात… इतक्यात अवचित श्रावणसर कोसळते. आकाशातून जलधारा वेगाने खाली झेपावतात आणि पक्ष्यांची धांदल उडते. मिळेल त्या दिशेने ते वेगाने उडून जातात. कुठल्यातरी झाडावर, पाऊस लागणार नाही अशा बेतानं गुपचूप बसून राहतात…
श्रावणसरीनंतर सोनकेवड्याच्या रंगानं ऊन झाडापानांवर सांडतं. ओलेत्या पानांच्या आरशात स्वतःचं रूप निरखू लागतं. गवत, पानं फुलं आनंदानं हसतात. त्यांच्या अंगावर हिर्‍यामोत्यांच्या राशी सांडलेल्या असतात. त्या क्षणी त्यांच्याइतकं वैभव कुणापाशीच नसतं…
झाडांत दडलेले पक्षी पुन्हा एकदा तारांवर येऊन बसतात. भिजलेले पंख झटकतात. हिरव्या रंगाच्या अनेक छटा सगळीकडे दिसत असतात. गडद हिरवा, फिकट हिरवा, करडा हिरवा अशा छटांबरोबरच पाचूच्या कोवळ्या, लुसलुशीत आणि टवटवीत लोभस रंगाने जमीन व्यापून टाकलेली असते…
श्रावण येताना सणांची, व्रतांची थैली घेऊन येतो. आयतारपूजन, श्रावणी सोमवार, मंगळागौरी, शुक्रवारव्रत, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, श्रीकृष्णजन्माष्टमी अशी अनेक व्रतं आणि सणं श्रावणात असतात. श्रावणाच्या थैलीत काही आठवणींच्या चिजा असतात…
बालपणीचा श्रावण ऊनपावसाचा खेळ खेळू लागतो. श्रावणातल्या ऊनपावसात कुठेतरी माकडाचं लग्न लागत असतं. माकडाच्या लग्नाची कल्पनाचित्र बालमनासमोर तरळत असतात…
घरातील आयतारपूजनासाठी परसात फिरून फुलं, पत्री गोळा करायची. नदीकाठावर जाऊन शेखंडाची पांढरी पानं आणायची, खारीच्या पाठीवर उमटलेली रामाची बोटं सोधायची आणि आईला आणून द्यायची. आयताराचं पूजन व्हायचं…
नागपंचमीला सकाळी वडिलांबरोबर गावातील मूर्तीकाराच्या घरी जायचं. मूर्तीकाराच्या घरी चिकणमातीपासून बनवलेले पिवळेधम्मक नाग ओळीने मांडून ठेवलेले असत. अष्टमीसाठी बाळकृष्णाच्या मूर्ती तयार होत असत. गणपतीच्या विविध प्रकारच्या मूर्तीही तयार झालेल्या असत. अजून त्या रंगविण्याचे काम मात्र सुरू झालेलं नसायचं. आम्ही नागाची मूर्ती घेऊन घरी येत असू.
घरी वडील नागाची पूजा करीत. नागाला दुधाचा नैवेद्य दाखवला जायचा. देवघरात पुजलेला नाग पाहून एक अनामिक भीति मनात दाटून यायची. हा जिवंत झाला तर? अधूनमधून देवघराचे दार उघडून मी आत पाहायचे. नाग जाग्यावर आहे ना?
घरात पातोळ्यांचे जेवण असायचं. इतर पदार्थांपेक्षा लक्ष पातोळ्यांवरच अधिक असायचं. संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी नाग परसातील अळूच्या बेटात पोहचवला जायचा. त्यानंतर रोज नाग तिथंच आहे की गेला हे मी खिडकीतून पाहत असे. नाग तिथंच असायचा. मग मी अळूच्या बेटाकडे चुकूनसुद्धा जात नसे…
नारळीपौर्णिमेला एका दिवसासाठी गळ्यात जानवं घालायला मिळायचं तेव्हा मज्जा वाटायची पण तेच जानवं दुसर्‍या दिवशी तुळशीत ठेवताना मन खट्टू व्हायचं. त्या दिवशी रक्षाबंधनही साजरं व्हायचं. गावातील दुकानात जाऊन आणलेली मोठ्ठी राखी भावाला बांधली जायची.
मग यायची गोकुळाष्टमी. घरातील जन्माष्टमीचा उत्सव खूप वर्षांपूर्वी काही कौटुंबिक कारणांनी बंद पडला. तो पुन्हा सुरू झाला नाही. त्यामुळे घरात कृष्णाची साधीच पूजा व्हायची. पोहे बनवले जायचे. संध्याकाळी मी व माझा भाऊ अष्टमीला मामाच्या घरी जायचो. मामाच्या घरी जन्माष्टमीचा उत्सव असे. रात्री बारा वाजता कृष्णजन्म होई. बाळकृष्णाची निळी मूर्ती मोठी लोभस वाटायची. आरती झाल्यावर सर्वांना द्रोणातून नैवेद्य वाटला जायचा. कृष्णाला आवडणारे पोहे त्यात असायचे.
तिन्हीसांजेला समईच्या मंद उजेडात हरीविजय, रामविजय, भावार्थरामायण अशा ग्रंथांचे वाचन होत असे. वडील वाचून अर्थ सांगायचे आणि आम्ही सगळीजणं ऐकत असू. त्या कथांमधून एक अद्भुत सुंदर जग उलगडत असे.
असा हा श्रावण. लोभस, सुंदर… आपल्यासोबत सोनऊन्हं घेऊन येणारा… सृष्टीला हसवणारा.. भुलवणारा किमयागार… आपल्या सुवर्णथैलीतून आणलेल्या कितीतरी सुंदर गोष्टींचा नजराणा त्यानं दिला आणि आयुष्यावर आनंदाची, चैतन्याची पखरण केली.
रजतकनकाची पिसे सांडूनी
नभातून उतरला श्रावणपक्षी
गाऊ लागला श्रावणगाणी
रेखीत सोनउन्हाची नक्षी

न्हात्याधुत्या तरुवेलींनी
हसत ताल धरला
पानाआड त्या दडलेल्या
कळ्या खुदकन हसल्या

झाडापानांवर उधळल्या
हिर्‍यामोत्यांच्या राशी
पारिजातकही बहरला
सोनचाफा बावनकशी

हसरा अन् लाजरा
श्रावणपक्षी हा बावरा
आला बघ उघडूनी
उनपावासाचा पिसारा