किनार्‍यांवर सुविधांसाठी केंद्राकडून २०० कोटी मंजूर

0
58

केंद्र सरकारच्या ‘स्वदेश दर्शन’ योजनेखाली राज्यातील समुद्र किनार्‍यांवर साधनसुविधा विकासासाठी २०० कोटी रु. मंजूर झाले असून या योजनेखाली कांदोळी, कळंगुट, हणजूण, वागातोर, मांद्रे, बागा, हरमल आदी किनार्‍यांवर साधनसुविधा उभारण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी काल विधानसभेत दिली. दयानंद सोपटे यांच्या प्रश्‍नाचे उत्तर देताना त्यांनी वरील माहिती दिली.

मांद्रे किनार्‍यावर सरकारने कोणतीही साधनसुविधा का उभारलेली नाही, असा सवाल सोपटे यांनी विचारला होता. या प्रश्‍नाचे उत्तर देताना पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी सरकारने ‘स्वदेश दर्शन’ योजनेखाली विविध किनार्‍यांवर हाती घेतलेल्या विकासकामांची लांबलचक यादीच सभागृहापुढे सादर केली. मात्र, बर्‍याच किनार्‍यांवर शौचालये व पर्यटकांना कपडे बदलण्यासाठीच्या खोल्या बांधण्यासाठी सीआरझेडकडून परवानगी मिळालेली नसल्याने हे काम हाती घेता आले नसल्याचे आजगावकर यांनी सांगितले. यावेळी आरोप करताना सोपटे म्हणाले की, मांद्रे किनार्‍यावर काहीही काम न करता करोडो रु. ची कामे केल्याचे उत्तर पर्यटन खात्याने दिलेले आहे. प्रत्यक्षात मात्र कोनशिला बसवण्यापलिकडे कोणतेही काम झाले नसल्याचे त्यांनी सभागृहाच्या नजरेस आणून दिले.

यावेळी सोपटे यांच्या या प्रश्‍नाचे थेट उत्तर देण्याचे सोडून मंत्री आजगावकर यांनी सरकारने विविध किनार्‍यांवर केलेल्या विकासकामांची यादी सभागृहापुढे सादर केली. किनार्‍यांवर सीसीटीव्ही बसवण्याचा प्रस्ताव असून काही प्रमुख किनार्‍यांवर मोफत वायफाय सुविधाही पुरवण्यात येणार असल्याचे आजगावकर यांनी यावेळी सांगितले. ३ कोटी ६३ लाख रु. खर्चून गोव्याचे जॉग्राफिक इन्फोर्मेशन सिस्टिम मॅपिंग तयार करण्यात येणार असल्याची माहितीही आजगावकर यांनी यावेळी दिली.

सोपटे-आजगावकर यांच्यात
शाब्दिक चकमक
मांद्रे किनार्‍यावर विकासकामे न करताच करोडोंची विकासकामे केल्याचे पर्यटन खात्याने आपणाला जे उत्तर दिलेले आहे त्याबाबत मंत्री आजगावकर हे काहीही स्पष्टीकरण करीत नसल्याचा आरोप दयानंद सोपटे यांनी यावेळी सभागृहात केला असता सोपटे व मंत्री आजगावकर यांच्यात यावेळी शाब्दिक चकमकही झडली.