किनार्‍यांवरील वाळूच्या टेकड्या गेल्या कुठे?

0
165
  • सुशांत द. तांडेल

छोट्या मोठ्या बांधकामांसाठी लागणार्‍या वाळूसाठी म्हणा किंवा गोर-गरीब उदरनिर्वाहासाठी घालत असलेल्या हंगामी गाळ्यांसाठी म्हणा किंवा थोरा-मोठ्यांच्या मनोरंजनाच्या नावाखाली होत असलेल्या चिरेबंदी बांधकामासाठी म्हणा, किनारपट्टीवर खरा बळी जातो तो हाच वाळूच्या टेकड्यांचा पट्टा.

गेल्या चार पाच महिन्यांच्या पावसाळी वातावरणात खवळून गेलेला अथांग महासागर आता पुन्हा एकदा शांत झाला आहे. याच संथ, मनमोहक समुद्राचे नयनरम्य दर्शन घेण्यासाठी येणार्‍या लाखो देश-विदेशी पर्यटकांना ‘अतिथी देवो भव’ म्हणत त्यांचे आदरातिथ्य करण्यासाठी गोमंतकीय समद्रकिनारे नटू-थटू लागले आहेत. किनार्‍यांच्या याच नटण्या-थटण्याच्या प्रक्रियेत शतकानुशतके खर्‍या अर्थाने तटरक्षकाची भूमिका अत्यंत समर्थपणे बजावून सागरापासून मानवाचे रक्षण करणार्‍या किनारपट्‌ट्‌ीवरील वाळूच्या टेकड्या व सभोवतालच्या वनस्पतींचा बळी जात आहे. धनाच्या मोहापायी या सर्व वाळूच्या टेकड्या व त्या भोवतालच्या हिरवाईची कत्तल एवढ्या सुसाट वेगाने चालली आहे.

भिंतीवर रंगाने काढलेल्या चित्राला स्वच्छ करण्यासाठी पाण्याने ते धुणे म्हणजेच त्याचा नाश करणे हे जेवढे त्रिकाल सत्य आहे, तेवढेच सत्य आहे किनारपट्टीवरील वाळूच्या टेकड्या व हिरव्या वनस्पतींची, झाडा-झुडपांची कत्तल म्हणजे मानवाची जणू आत्महत्याच आहे. तिथल्या मानव व जीवसृष्टीचा अकाली नाश होत आहे याचे भान राखून संबंधितांनी आपली विद्यमान विद्ध्वंसक कृती त्वरित न बदलल्यास डोळ्यांत दृष्टी असतानाही सत्य डोळसपणे न पाहणार्‍याने म्हातारपणी दृष्टीहीन झाल्यावर पेटलेला दिवा हातात घेऊन सत्य शोधण्यासाठी निरर्थक धडपड केली, तरीही त्याला त्यावेळी काळाकुट्ट अंधःकार सोडून आणखी दिसणार तरी काय?

वास्तविक, समुद्राजवळ खार्‍या हवेत व खार्‍या पाण्यावर जगणार्‍या वनस्पतींचा एक समूह असलेल्या किनार्‍यावरील छोटी-छोटी झाडे-झुडपे व वेलींच्या स्वरुपातील वनस्पतींचा व तिथल्या वाळूच्या नैसर्गिक टेकड्यांचे तिथल्या भूरक्षणाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्त्व आहे. किनारपट्टीवरील लोकवस्तीचा प्रदेश व समुद्राचे पाणी यांच्यामध्ये याच वाळूच्या टेकड्या व त्याभोवतालची हिरवाई म्हणजे एक जबरदस्त नैसर्गिक तटबंदीच असते. प्रखर वादळे व प्रलयकारी लाटांच्या तडाख्यापासून तेथील मानवाचे व इतर जीवसृष्टीचे रक्षण हीच नैसर्गिक तटबंदी करीत असते. एवढेच नव्हे तर काही विशिष्ट जलचर प्राण्यांनाही हेच आश्रयाचे अतिसुरक्षित स्थान असते. छोटे खेकडे वगैरे तेथेच अंडी घालतात व त्यांची पिल्ले मोठी संरक्षणक्षम झाली की तेथूनच मग समुद्राकडे जातात. पण सूर्य अस्ताला गेल्यावर प्रकाशाचे अस्तित्वच संपून गडद काळोख चहुदिशांनी पसरावा तशीच परिस्थिती सध्या किनारपट्टीवरील टेकड्यांची व वनस्पतींची झाली आहे.

राज्यात केरी ते पोळेपर्यंत पसरलेल्या १०२ कि.मी. लांबीच्या किनारपट्टीवरील कोणत्याही किनार्‍यावर नजर मारल्यास सहज लक्षात येईल, भोवतालच्या वाळूच्या टेकड्यांची व हिरवाईची आपत्तीजनक परिस्थिती. त्याठिकाणी वाळूच्या टेकड्या व हिरवाई होती असे टाहो फोडून जरी स्थानिकांनी सांगितले, तरीही त्यावर विश्‍वास ठेवणे महाकठीण झाले आहे. एखाद दुसर्‍या ठिकाणी मानव निर्मित ‘संरक्षण भिंत’ दिसेलही कदाचित. पण करोडो रुपये मोडून उभी केलेल्या त्या मानवनिर्मित संरक्षणभिंतीची स्थिती, आगीत पेरलेले बीज, कधी होत्याचे नव्हते झाले तेच समजत नाही तशी केविलवाणी झालेली दिसून येते. कारण, शेवटी निसर्ग हा निसर्गच आहे.
या वाळूच्या टेकड्या व त्या भोवतीलची हिरवाई आपल्या गोव्यात केरी-तेरेखोल ते मोरजी, शापोरा ते शिकेरी, मिरामार ते करंजाळे, वेळसांव ते मोबोर व तळपण ते गालजीबाग अशा विविध पट्‌ट्यांमध्ये थोड्याफार उंचीच्या व आकाराच्या फरकाने सापडते. या टेकड्यांची ऊंची एक मीटरपर्यंत असते. समुद्राने रौद्ररुप धारण करून मनुष्यवस्तीत घुसण्याचा प्रयत्न केल्यास त्याला लगाम घालणारी आघाडीवरील प्रथम सक्षम ‘ढाल’ म्हणजे दुसरे तिसरे काही नसून हाच नैसर्गिक उंचवट्यांचा परिसर असतो. या नैसर्गिक ‘तटबंदी’मुळेच वादळाचे अतितीव्र तडाखेही सौम्य होताना ‘याची देही याची डोळा’ पाहिलेली, अनुभवलेली माणसे किनारपट्टीत आजही आढळतात.

वारंवार वादळे येऊन थडकणार्‍या ओरिसा, आंध्रप्रदेश व पश्‍चिम बंगालच्या भूभागातसुद्धा तिथल्या जीवसृष्टीचे रक्षण करण्यात सर्वाधिक आघाडीवर असतो तो तिथल्या किनार्‍यावरील वाळूच्या टेकड्यांचा व त्यावरील हिरवाईचा परिसर, हे अनेकवेळा सिद्ध झाले आहे.

पण दुर्दैवाने गत पाच-सहा वर्षांत गोमंतकीय समुद्रकिनार्‍यांवरील वाळूच्या टेकड्यांची व तिथल्या हिरवाईची अवनती झाली आहे. ‘अति तेथे माती’ म्हणतात, तशी सगळीकडे सपाट वाळूच दिसू लागली आहे. किनारी पर्यटनापासून मिळणार्‍या बक्कळ धनापुढे अगदीच क्षुल्लक वाटणार्‍या वाळूट्या टेकड्या व तिथल्या हिरवाईचा साधा विचार करायला सुद्धा वेळ आहे कुणाला?

छोट्या मोठ्या बांधकामांसाठी लागणार्‍या वाळूसाठी म्हणा किंवा गोर-गरीब उदरनिर्वाहासाठी घालत असलेल्या हंगामी गाळ्यांसाठी म्हणा किंवा थोरा-मोठ्यांच्या मनोरंजनाच्या नावाखाली होत असलेल्या चिरेबंदी बांधकामासाठी म्हणा, किनारपट्टीवर खरा बळी जातो तो हाच वाळूच्या टेकड्यांचा पट्टा. दरवर्षी पर्यटन हंगामापूर्वी या ठिकाणी होत असलेली हिरवाईची कत्तल व टेकड्यांचे सपाटीकरण पाहिल्यास विनाश जास्त दूर नाही हे अगदी स्पष्टपणे नजरेस येईल.

एकूणच या गंभीर विषयाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करणे म्हणजे संन्यास घेणारा माणूस संसाराच्या त्यागाला आणि लग्नाचे केळवण झालेली नवरी मुलगी आपल्या माहेरच्यांच्या वियोगाला मनोमन तयारच असते, तसेच आपण सर्वजण समुद्राच्या प्रकोपाला तयारच तर नाही ना, हाही एक गहन प्रश्‍नच आहे. कारण किल्ले-कोट मोडकळीस आलेले असताना व सभोवताली पावसाळी हवामान आणि आकाशात ढगांची जमवाजमव चालू असतानाची सभोवतालची स्थिती दिसत असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून जो आपल्याच पद्धतीने चालत राहतो, त्याचा व त्याच्यावर अवलंबितांचा घात हा ठरलेलाच असतो हे सर्वमान्यच आहे.
पूर्णपुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण सारथ्य करत असलेल्या वीर धनुर्धर अर्जुनालाही ज्याचा अंत करणे त्याला निसर्गतःच लाभलेल्या कवचकुंडलांमुळे कठीण होत होते, त्या अद्वितीय दानशूर कर्णाने तेच कवचकुंडल स्वतःच उतरवून दान केले होते. त्या नंतर कवचकुंडले गमावलेल्या कर्णाचा वध करणे अर्जुनाला जास्त कठीण गेले नाही. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष निसर्गाकडून लाभलेल्या समुद्रकाठावरील वाळूच्या टेकड्या व त्याभोवतालची हिरवाई रूपातील सुरक्षा कवचाला आम्हीच आमच्याच हातांनी दूर फेकत गेलो, नष्ट करत गेलो तर मग देवच पावो आपल्या सर्वांना!