किनारी व्यवस्थापन आराखडाप्रश्‍नी सरकारकडून फसवणूक : कॉंग्रेस

0
126

नव्या किनारी व्यवस्थापन आराखडा प्रकरणी (सीझेडएमपी) गोवा सरकार जनतेची फसवणूक करीत असल्याचा आरोप काल कॉंग्रेसने केला. पक्षाचे प्रवक्ते ट्रॉजन डिमेलो म्हणाले की सरकारातील काही मंत्रीच अप्रत्यक्ष वा प्रत्यक्षपणे किनारपट्टीवरील जमीन विक्रीत गुंतलेले आहेत. या जमिनी विकता याव्यात यासाठी हे मंत्री भरती रेषा निश्‍चित करण्यास विलंब करीत असून ती आपणाला पाहिजे तशी मागे पुढे घेऊ लागले असल्याचा आरोप डिमेलो यांनी काल पत्रकार परिषदेत केला.
या एकूण प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही डिमेलो यांनी यावेळी केली. किनारपट्टीवरील जमीन घोटाळा प्रकरणी आपण २० सप्टेंबर २०१६ रोजी तत्कालीन मुख्यमंत्र्यांना एक पत्रही लिहीले होते, अशी माहिती डिमेलो यांनी यावेळी दिली.

आयवा फर्नांडिस यांच्यावर अन्याय करू नये
दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना जर गोव्यातील जनतेचा विश्‍वास संपादन करायचा असेल तर त्यांनी अन्न आणि औषध प्रशासनातील एक प्रामाणिक अधिकारी आयवा फर्नांडिस यांच्यावर अन्याय होऊ देऊ नये, अशी मागणीही डिमेलो यांनी केली.
दक्षिण गोव्यात नेमणूक करण्यात आलेल्या आयवा फर्नांडिस यांना तेथून हलवण्याचा निर्णय १७ रोजी घेण्यात आल्याचे सांगून आता सरकार मासळीत फॉर्मेलीन नसल्याचेही सांगू लागले आहे. जर परराज्यातून येणार्‍या मासळीत फॉर्मेलीन नाही तर मग सरकार दक्षिण गोव्यात मासळीतील फॉर्मेलीनची तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळा का बांधू पहात आहे, असा सवालही डिमेलो यांनी यावेळी केला.
गोव्यात जेव्हा मासळीतील फॉर्मेलीनचा वाद निर्माण झाला होता तेव्हा त्यावेळच्या दोन मंत्र्यांनी मासळीतील फॉर्मेलीन तपासण्याची जबाबदारी आयवा फर्नांडिस या अन्न आणि औषध प्रशासनातील अधिकार्‍याकडे सोपवण्यात येणार असल्याचे सांगितले होते. याची आठवणीही डिमेलो यानी यावेळी करून दिली.