किचन क्लिनीक

0
271
  • वैद्य स्वाती हे.अणवेकर
    (आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा)

करडई

हे बहुवर्षायू क्षूप असते. ही भाजी चविला गोड, तिखट, भूक वाढविणारी व उष्ण असते. ही
भाजी शरिरातील वात व कफ दोष कमी करते व पित्त दोष वाढविते.
ही भाजी जेवणात वापरतात तशीच ती घरगुती औषध उपचारातदेखील वापरली जाते.
आता हिचे औषधी उपयोग पाहूया.
१) सर्दी झाल्यास करडईच्या कोवळ्या पाल्याची भाजी द्यावी.
२) ह्या भाजीचा पोटीस सुजेवर बांधल्यास सूज व वेदना कमी होतात.
३) मोठ्या व्यक्तींना कृमीचा त्रास झाल्यास करडईची भाजी करडईच्याच तेलात शिजवून खावी.
४) लघवी चिकट व गढूळ होणे ह्यात करडईच्या पानांचा रस २ चमचे + धणे पूड १ चमचा हे मिश्रण रोज सकाळी ८ दिवस घ्यावे.
५) घशात चिकट कफ येणे व तोंडात चिकट लाळ तयार होणे ह्या तक्रारीवर करडईची कोवळी पाने चावून त्याचा रस थुंकावा.

ही भाजी जास्त खाल्ल्यास डोळ्यांचे विकार, रक्तदोष व पित्ताचे विकार होतात.
————————–

अंबाडी 

ह्याचे चारपाच हात उंच झाड असते व त्याच्या कोवळ्या पाल्याची भाजी करतात. ही भाजी चवीला आंबट असते. काही लोक ह्याच्या झाडाच्या साली सुकवून त्याचा वापर आमसुलाचा पर्याय म्हणून करतात.
ही भाजी शरीरातील वात दोष कमी करते व पित्त वाढविते.
हिचा उपयोग जसा पालेभाजी म्हणून जेवणात केला जातो तसाच घरगुती उपचारांमध्येदेखील आपण हिला वापरू शकतो.

हिचे औषधी उपयोगही आपण पाहूया.
१) डोक्यात खवडे झाल्यास अंबाडीच्या पाल्याचा रस डोक्यावर लावून २ तास ठेवावा व मग केस धुवावेत.
२) हातापायांची आग होऊन जळजळ होत असेल तर अंबाडीच्या पाल्यात मीठ टाकून त्या पाण्याने वाफ द्यावी व गरम पाला हातापायांना बांधावा.
३) तेलकट पदार्थाचे अजीर्ण झाले असल्यास अंबाडीची भाजी व तांदूळ एकत्र शिजवून केलेला भात खावा.
४) मार लागून सूज आल्यास अंबाडीच्या पानांचा पोटास रूईच्या पानात गुंडाळून बांधावे.
५) वारंवार उलट्या होत असल्यास अंबाडीच्या पाल्याचा रस ४ चमचे + खडीसाखर १ चमचा + १/४ चमचा वेलचीपूड हे मिश्रण दर १/२ तासाने चाटायला द्यावे.

अंबाडीची भाजी अतिप्रमाणात खाल्ल्यास ऍसिडिटी होते व पित्ताचे विकार होतात.
———————-
टाकळा 

ही वनस्पती प्रामुख्याने पावसाळ्यात उगवते. गोव्यातदेखील ही भाजी पावसाळा ह्या ऋतूमध्ये आवडीने खाल्ली जाते.
ही भाजी शिजवल्यावर रूचकर लागते. मग तुम्ही तेलात परतून करा, मूग, चणा अथवा तूरडाळ घालून फक्त गुळ खोबरे घालून शिजवून करा किंवा मग त्यात फणसाच्या सुकवलेल्या आठळ्या घालून करा. अगदी लज्जतदार लागते ही भाजी.
हिचे वर्षायू उग्र गंधयुक्त क्षुप असते.
ही चवीला तिखट व उष्ण असते. म्हणूनच शरीरातील कफ व वात दोष कमी करते.
जशी खायला ही लज्जतदार लागते तशीच ही आपण घरगुती उपचारांमध्येदेखील हिचा उत्तम वापर करू शकतो.

हिचे औषधी उपयोग:
१) गजकर्णामध्ये टाकळ्याच्या रस कडुनिंबाच्या पाल्याचा रस एकत्र मिसळून त्यांवर लावावे.
२) अंगावर पांढरे डाग पडत असल्यास व खाज येत असेल तर टाकळ्याची भाजी व भाजणीची भाकरी खावी.
३) त्वचा तेजवान व मुलायम दिसायला टाकळ्याच्या पाल्याचा रस बेसनात मिसळून नियमितपणे चेहर्‍यावर लावावा.
४) खरूजेवर रोगग्रस्त भागावर टाकळ्याचा रस चोळावा व नवीन पाल्याची चटणी तिथे बांधावी. ती सोडल्यावर त्या भागावर हळदपूड चोळावी. चांगला फायदा होतो.
५) गळू फुटण्यासाठी टाकळ्याचा पाला वाटून केलेली चटणी बारीक वाटून त्याचा गोळा गळूवर ठेवावा व दर बारा तासांनी तो गोळा बदलावा.

ही भाजी अतिप्रमाणात खाल्ल्यास जुलाब होऊ शकतात.
—————–
पुनर्नवा 
(वसुची भाजी / घेटुळी)

ह्याचे प्रसरणशील व बहुवर्षायू क्षुप असते. हे २-३ फुट लांब असते. हिचे पांढरा व लाल असे दोन प्रकार असतात. त्यातील पांढरी पुनर्नवा ही प्रामुख्याने भाजीकरिता वापरतात. ही भाजी पथ्यकर असली तरीदेखील बर्‍याच प्रमाणात उपेक्षित आहे. म्हणूनच हिचा उपयोग व गुण जाणून घेणे गरजेचे आहे.
ही भाजी पावसाळ्यात भरपूर वाढते आणि हिचे पुष्कळ औषधी उपयोग आहेत. पांढरी वसूची भाजी अथवा घेटुळी ही चवीला तिखट, कडू, तुरट व गोड असते. ही उष्ण गुणाची असते व शरीरातील वात, पित्त व कफ हे तिन्ही दोष कमी करते.

हिचे औषधी उपयोग पाहूया :
१) व्रणातील स्त्राव कमी करायला वसूच्या पानांचा रस काढून तिचा लेप लावावा.
२) सूज आली असल्यास पुनर्नवा + देवदारू + सुंठ + वाळा ह्याचा काढा गोमूत्र घालून घ्यावा.
३) कफयुक्त दम्याचा त्रास होत असल्यास पुनर्नवाचा काढा वेखंड घालून घ्यावा.
४) पचन नीट न होत असल्यास पाल्याची भाजी, सुप किंवा त्याच्या पाल्याचा रस नियमित काही दिवस घ्यावा.
५) कावीळीमध्ये पुनर्नवा रस १-११/२ महिने घ्यावा व यकृताचा अशक्तपणा कमी होतो.
६) घाम मुळीच येत नसेल तर त्वचा कोरडी होते व फुटू लागते. यामुळे त्वचेवरील लवदेखील गळू लागते. त्यावेळी पुनर्नवेच्या पानांचा रस अंगास चोळावा व त्याची भाजी खावी.

ही भाजी जास्त प्रमाणात खाल्ल्यास अतिप्रमाणात संडास व लघवी होऊ शकते.