किचन क्लिनीक =

0
246
  • वैद्य स्वाती हे. अणवेकर
  • (आरोग्य आयुर्वेदीक क्निनिक –म्हापसा गोवा)

शेपू

शेपूची भाजी ही बर्‍याच जणांना न आवडणारी अर्थात नावडती. तिला येणार्‍या विशिष्ट गंधामुळे ती बर्‍याच लोकांना आवडत नाही. (मलादेखील आवडत नाही.) हिच्या बियांना बाळंतशेपा असे म्हणतात. ह्यांचा उपयोग लहान मुलांच्या औषधांत करतात.
हिचे झाड तीन फूट उंचीचे असते. ही भाजी चवीला गोड व उष्ण असते. ही शरीरातील कफ व वात दोष कमी करते. भाजी म्हणून जरी ही तेवढी चांगली लागत नसली तरी हिचेदेखील बरेच औषधी उपयोग आहेत बरं का!
चला मग शेपूचे औषधी उपयोग पहायचे ना!
१) जखमेवर हिच्या पाल्याची चटणी वाटून लेप करावा.
२) तोंडास रूची नसणे, जीभ जाड होणे, तोंडाला दुर्गंध येणे अशा तक्रारींमध्ये शेपूचा कोवळा पाला व आल्याचा एक तुकडा चावून तोंडात येणारी लाळ थुंकून टाकावी.
३) लहान मुलांना शेपूची ताजी पाने एक कपभर पाण्यात उकळून व पाव कप पाणी शिल्लक ठेवून हे पाणी प्रत्येक दुग्धपानापूर्वी १-१ चमचा द्यावे. त्यामुळे बाळाचे पोटाचे आरोग्य उत्तम राहते.
४) शेपूची पाने घालून तीळाचे तेल उकडून ते गाळावे. हे तेल मार लागणे, मुरगळणे, संधिवात ह्यांच्या वेदनांमध्ये लावल्यास उत्तम.
५) बाळंतीणीस रक्तस्राव कमी होण्यास व दूध भरपूर येण्यास शेपूची भाजी देतात.
ही भाजी जास्त प्रमाणात खाल्ल्याने पित्त वाढते.

—————
कोथिंबीर

आपल्या स्वयंपाकघरात अत्यंत मानाचे स्थान प्राप्त अशी ही वनस्पती. तशी सगळ्यांचीच लाडकी. कारण कोणताही शाकाहारी अथवा मांसाहारी पदार्थ असो जसे वरण, डाळ, पोहे, उपिट, भाज्या, माशांची आमटी, चिकन, मटण ह्यावर सजावटीकरिता हिची पेरणी करतात. तसेच कोथिंबीर चटणी, कोथिंबीर वड्या ह्या सगळ्यांच्याच आवडीच्या. बर्‍याच व्यंजनांमध्ये हिचा वापर त्या पदार्थांची चव वाढविण्याकरिता केला जातो. कारण हिच्या मंद सुगंधाने व हिरव्यागार रंगाने पदार्थ दिसायला तर संदर दिसतोच पण त्याची लज्जतही वाढते.
कोथिंबीरीचे १ मीटर उंचीचे नाजुक क्षुप असते. ह्याची पाने दंतुर कडा असलेली व सुगंधी असतात. ही चवीला तुरट, कडवट व गोड आणि गुणाने थंड असते. म्हणूनच ही शरीरातील तिन्ही दोष शांत करते.
जसा आपण हिचा उपयोग स्वयंपाकामध्ये करतो तसेच हिचा वापर घरगुती उपचारांमध्येदेखील होतो.

१) तोंड आले असता कोथिंबीरीच्या रसाने गुळण्या कराव्यात.
२) डोकेदुखीमध्ये कोथिंबीरीचा पाला वाटून त्याचा लेप कपाळावर करावा.
३) कामाच्या दरम्यान जर चेहर्‍याचा संपर्क उष्णतेशी आल्यास त्वचा कोरडी होते व त्वचेची आग होते. तेव्हा कोथिंबीरीच्या रसांच्या घड्या चेहर्‍यावर ठेवाव्यात. थंडावा मिळतो.
४) वारंवार उलट्या होत असल्यास कोथिंबीरीचा रस+मध हे मिश्रण वारंवार चाटायला द्यावे.
५) ओल्या इसबावर कोथिंबीर वाटून त्यात वेखंड घालून ह्या मिश्रणाचा जाडसर लेप त्यावर लावावा.
६) हाता-पायाची आग होत असल्यास कोथिंबीरीच्या पाल्याचा रस काढून हातापायांच्या तळव्यांना चोळावा.

कोथिंबीर खाण्याचा अतिरेक केल्यास शरीरातील धातूंना क्षीणता येते.
——————-

मुळ्याचा पाला

मुळ्याची भाजी आवडीने खाणारे लोक तसे कमीच आढळतात. आपण भाजी करताना पाल्यासोबत मुळादेखील वापरतो. पंजाबी डिश मुलीके पर्राठे जाम फेमस आहेत. पण मला अजूनही तो खायचा योग आला नाही. मुळ्याच्या कोवळ्या पाल्याची लिंबू पिळून केलेली कोशिंबीरदेखील सुरेख लागत.
तर असा हा मुळ्याचा पाला आपण भाजी करायला तर वापरतोच पण ह्याचे बरेच औषधी उपयोग देखील आहेत ते ही पाहणे गरजेचे आहे.
मुळ्याचे झुडूप असते व मुळा जो पांढरा असतो जमिनीखाली उगवतो तर पाल्याला उगवणार्‍या शेंगांमध्ये बिया असतात. मुळ्याचा पाला हा कडू, खारट व गोड अशा मिश्र चवीचा असमतोल असतो. तो शरिरातील कफ आणि वात दोष कमी करतो.
आता त्याचे औषधी उपयोग पाहूयात:
१) लघवीला कमी व बुळबुळीत होत असेल तर मुळ्याच्या पाल्याचा रस १/४ कप सकाळी अनशापोटी व संध्याकाळी ४ वाजता घ्यावा.
२) छोटा मुतखडा असल्यास मुळ्याच्या पाल्याचा रस १/२ कप + १ चमचा धणे पुड नियमीत ६ महिने घ्यावे तो खडा विरघळतो.
३) शौचास काळपट पांढरे होणे, भूक न लागणे, अंग जड होणे अशा तक्रारींमध्ये १/४ कप मुळ्याच्या पानांचा रस+१/४ चमचा कळी मिरीपूड रोज दिवसातून ४ वेळेस काही दिवस घ्यावी.
४) संडासला साफ होत नसेल तर मुळ्याच्या पाल्याची भाजी नियमित जेवणात असावी.
५) वारंवार सर्दी खोकला होत असल्यास २ चमचे मुळ्याच्या पाल्याचा रस+२ चिमूट मिरपूड+ १/४ चमचा मध हे मिश्रण दिवसातून तीन वेळेस काही दिवस घ्यावे.

मुळ्याचा पाला खाण्याचा अतिरेक केल्यास पित्ताचा त्रास व वारंवार संडासला होते.

————

अळू

साधारणपणे पावसाळ्यात अगदी भरपूर उगवणारी ही पालेभाजी तशी सगळ्यांच्याच पुष्कळ आवडीची. अगदी खमंग चुरचुरीत अळुवड्या म्हणा, अळूचे फतफते म्हणा किंवा हरतालिकेला केली जाणारी ऋषिंची (कंदमुळांची) भाजी. ह्या सगळ्याच पदार्थांची चव अगदी लाजवाब लागते. त्यामुळेच आपले सर्वांचेच विशेष प्रेम ह्या भाजीवर आहे. (तसे काही महाभाग असतील ज्यांना ही भाजी आवडतही नाही. पण ती संख्या तशी नगण्यच समजावी).
अळूचे रोप हे ११/२ -२ फूट लांब उगवते. ह्याची पाने मोठी व पसरट असतात आणि ह्यावर पावसाचे पाणी चिकटून रहात नाही. त्यामुळेच काही क्षणभंगुर गोष्टींना अळवावरचे पाणी ह्या म्हणीने संबोधले जाते.
ह्याचे काळा, पांढरा, हिरवा, गर्द हिरवा असे अनेक प्रकार असतात. त्यातील फिकट हिरवा पातळ पानांच्या प्रकारास तेर असे म्हणतात आणि ह्याच्या पानांची भाजी आंबट चिंचेचा वापर न करता केल्यास भरपूर खाजते.
खायला काळा व गर्द हिरवा अळू उत्तम. अळूची चव ही तुरट गोड असते आणि हा थंड असतो. त्यामुळे हा शरीरात वात व कफ दोष वाढवतो व पित्त कमी करतो.
ह्या अळूचे बरेच औषधी उपयोगदेखील आहेत. ते आता थोडक्यात पाहूया:

१) गळू फुटण्यास अळूची पाने व देठ वाटून त्याचा पोटीस गळूवर बांधावा.
२) बाळंतीणीस दूध वाढायला जेवणामध्ये नियमित थोडी अळूची भाजी खायला द्यावी.
३) जखमेवर अळूच्या पाल्याचा रस वाटून लावल्यास त्यातील रक्तस्त्राव बंद होतो व जखम लवकर भरते.
४) अळूच्या पानांचे देठ मीठासोबत वाटावेत. बंद व सुजलेल्या गाठी बसण्यास लेप करावा.
५) सर्वांगाची आग होत असल्यास अळूची भाजी, फुलके व तुप ह्यासोबत खावी.
अळूची भाजी जास्त खाल्ल्यास पोटात वात धरतो व बद्धकोष्ठाचा त्रास होतो.