किचन क्लिनीक

0
180

१) संत्र/नारंगी

नागपूर ह्या फळाकरीता जगभरात प्रसिध्द आहे. संत्री हे फळ आवडत नाही अशी व्यक्ती विरळच असेल. ह्याचा रसदेखील आपण आवडीने पितो. तसेच केक, बिस्कीट, जाममध्येदेखील ह्याच्या रसाचा वापर करतात असे म्हणतात. ऑरेंज फ्लेवर हा भारी फेमस आहे बुवा.
ह्याचे झाड हे लिंबाच्या झाडा समान असते. ह्याची फळे चवीला आंबट, उष्ण, रूचीवर्धक, वातनाशक व सारक म्हणजेच मोठ्या आतड्यातील मळ पुढे सरकवणारी असतात. तसेच हे फळ पचायला जड असते.
ह्याचे अनेक औषधी उपयोग देखील आहेत ते आता आपण पाहूयात :
१) संत्राच्या रसात थोडे सैंधव मीठ घालून प्यायल्यास अति ताण पडून आलेला थकवा नष्ट होऊन तरतरी येते.
२) शरीरातून होणारा रक्तस्राव थांबवायला १ कप संत्र्याचा रस १ चमचा साखर व ४ चमचे आवळ्याचा रस घालून प्यावा.
३) संत्र्याची ताजी साल कोरड्या इसबावर १५-२० मिनिटे चोळावी फायदा होतो.
४) संत्र्याच्या सालीची चटणी गरम करून गळूवर बांधावी म्हणजे ते पिकून फुटते.
५) पोटात भूक असून देखील तोंडाला चव नसेल तर संत्र्याचा रस + ओवा + जीरे + हिंग हे मिश्रण घोट घोट प्यावे.
पण संत्री अतिप्रमाणात खाल्ल्यास जुलाब होऊ शकतात.

२) द्राक्ष
द्राक्षांचा उपयोग आपण खाण्यासाठी तर करतोच. पण त्यापासून मनुका, बेदाणे, वाईन असे विविध प्रकार बनविले जातात. तसेच आपण औषध म्हणून घेत असलेले द्राक्षासव हेदेखील बर्‍याच जणांच्या आवडीचे.
ही द्राक्षे खायला खरोखरच सुरेख लागतात. त्यातल्या त्यात गोड असतील तर अगदी अमृततुल्यच म्हणा ना!
हिंदुस्थानभर ही द्राक्षे पिकवीली जातात. ह्याच्या पांढरी, हिरवी आणि काळी असे तीन प्रकार असतात. द्राक्षांचा वेल असतो व तो लावल्यापासून ३ वर्षात त्यास फळे येतात.
द्राक्षाचे फळ कच्चे असताना जड, तुरट आंबट असते तर पिकलेले फळ हे चवीला गोड, थंड व शरीरातील वात, पित्त दोष कमी करते.
आता आपण ह्याचे औषधी उपयोग पाहूयात :
१) अशक्तपणामध्ये द्राक्षे, खडीसाखर, मध व पिंपळी हे मिश्रण खावे तरतरी येते.
२) वारंवार तहान लागत असल्यास काळी द्राक्षे व ज्येष्ठमध काढा हे मिश्रण प्यावे.
३) घसा कोरडा पडणे, तोंड सुकणे, जीभ कोरडी होणे, तोंडास चव नसणे ह्यात द्राक्ष व आवळकठी हे मिश्रण वाटून तुपात मिसळावे व त्याची गोळी करून तोंडात चघळावी.
४) पित्ताचा त्रास होत असल्यास काळी द्राक्षे रस १/२ ग्लास+१ चमचा जीरे पूड+ १/४ चमचा सैंधव हे मिश्रण १-३ वेळा घ्यावे.
५) १/२ ग्लास द्राक्षाचा रस+१ चमचा बडीशेप हे मिश्रण पित्त वाढून आलेल्या तापात द्यावे त्याने लघवीचे प्रमाण वाढून शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले जातात.
द्राक्षे अतिप्रमाणात खाल्ल्यास कफाचा त्रास व सर्दी होऊ शकते.

 

३) जांभूळ
‘जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजं जी! …’ हे गाणे प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात घर करून बसलेले. तसेच उन्हाळ्याच्या दिवसात मिळणारी ही रसरशीत जांभळेदेखील आपल्या प्रत्येकाच्याच मनात घर करून आहेत. मीठ लावून ही जांभळे उन्हाळ्यात चोखून लाळ घोटत खाणे म्हणजे एका अभूतपूर्व सुर्खाीची अनुभूतीच जणू.
ह्याचा १०० फूट उंच वृक्ष असतो. ह्याची पाने ३-६ इंच लांब भालाकार, स्निग्ध, चमकदार असतात. फुले हिरवी सफेद सुगंधित असतात. फळ १/२-११/२ इंच लांब, अंडाकार असते. हे कच्चे असताना हिरवे व पिकल्यावर जांभळे होते. त्याच्या आत मोठी टणक बी असते.
जांभुळ हे चवीला तुरट, गोड, आंबट असते व थंड गुणाचे असते. त्यामुळे ते शरीरातील कफ व पित्त हे दोष कमी करते व वात दोष वाढविते.
जशी ही जांभळे खायला छान लागतात तसेच ह्यांचे बरेच औषधी उपयोग देखील आहेत ते आपण पाहूयात.
१) अंगाची आग होत असल्यास जांभळाचा शिरका (अर्थात जांभळाचा आंबवलेला रस) तीळ तेलात मिसळून अंगाला लावावा.
२) डायबेटिसमध्ये रक्त व लघवीतील साखर नियंत्रणात ठेवायला जांभळाच्या बियांचे चुर्ण सकाळी व रात्री १-१ चमचा रिकाम्या पोटी घ्यावे.
३) जांभळाच्या कच्च्या फळाच्या रसात मीठ घालून गुळण्या केल्यास दात हलणे, हिरड्या सैल होणे, तोंड येणे, तोंडातून रक्तस्त्राव होणे ह्या तक्रारी कमी होतात.
४) जुलाब होत असल्यास अथवासंडास मधून आव पडत असल्यास जांभळाच्या कच्च्या फळाचा रस १/२ कप + १ ग्लास ताक हे मिश्रण थोडे थोडे दिवसातून ३-४ वेळा प्यावे.
५) भुक न लागणे, तोंडाला चव नसणे, ह्यात पिकलेल्या जांभळाचा रस १ कप+ १ मोठा चमचा आल्याचा रस +१/४ चमचा काळी मिरीपूड हे मिश्रण २१ दिवस जेवणापुर्वी घ्यावे.
जांभळे खाण्याचा अतिरेक केल्यास बध्दकोष्ठाचा त्रास होऊ शकतो.

४) डाळिंब
डाळिंबाच्या दाण्यांप्रमाणे लालचुटूक ओठ… अशी उपमा सुंदर स्त्रियांच्या ओठांना दिली जाते. खरोखरच हे डाळिंबाचे दाणे जणुकाही रूबीच्या रत्नाप्रमाणेच दिसतात. ह्या दाण्यांचा रस पिण्यासाठी वापरतात तसेच मुंबई दाबेलीमध्ये चव यायला हे डाळिंब दाणे घातले जातात.
काही म्हणा पण हे डाळिंब जसे सुरेख लागते तसेच ते खाल्ल्यावर शरीरात तरतरी येते. ह्या डाळिंबाचा १०-१५ फुट उंच वृक्ष असतो जो मध्यम आकाराचा असतो. ह्याची फुले नारंगी लाल रंगांची असतात तर फळे गोल लालसर व टपोरे दाणेयुक्त असतात.
ह्याचे गोड फळ हे थंड व त्रिदोषशामक असून गोड आंबट चवीचे फळ हे किंचीत पित्तकर असते तर आंबट फळ हे कफवातनाशक असून पित्तकर असते.
चला आता ह्याचे औषधी उपयोग पाहूया :
१) लहान मुलांना होणार्‍या जुलाबात फळाची साल पाण्यात उगाळून मधासह त्याचे चाटण द्यावे.
२) पित्ताचा त्रास, आंबट ढेकर, जळजळ ह्यात १/२ डाळींब रस+१ चमचा खडीसाखर घ्यावी.
३) तापामध्ये तहान लागत असल्यास थोड्या थोड्या वेळाने डाळिंबाचा रस प्यावा.
४) डाळिंबाची साल सुकवून त्याची पूड करावी व त्याने दात घासावे ह्याने दात व हिरड्या बळकट होतात. रक्तस्त्राव होत असल्यास कमी होतो.
५) घसा बसणे, दुखणे, टॉन्सील्स वाढणे ह्यात डाळींबाच्या ताज्या सालीचा काढा + चिमूटभर हळद घालून गुळण्या कराव्यात.
डाळिंब अतिप्रमाणात खाल्ल्यास जुलाब, सर्दी असे त्रास होऊ शकतात.