किचन क्लिनीक = फळ वर्ग

0
250

– डॉ. स्वाती अणवेकर (म्हापसा)

आता आपण कंदमुळं हा वर्ग पूर्ण करून आणखी एका महत्त्वाच्या गटाकडे वळू – तो म्हणजे आपल्या सर्वांच्याच आवडीचा गट फळांचा!!
फळे हा आपल्या सर्वांच्याच आवडीचा गट आहे. आपण सर्वचजण वेळ मिळेल तेव्हा फळांवर ताव मारत असतो. ‘‘उस वक्त हम आव देखते हैं न ताव’’.
हो, खरेच फळे पौष्टिक, रूचकर असतात. तसेच त्यात अनेक जीवनसत्व व खनिजदेखील असतात. पण हीच फळे खाताना जर आपण काही नियम पाळले तर मला वाटते आपण सेवन करत असलेल्या फळांचा आपल्या शरीराला अपाय न होता फायदाच होईल.
* फळं खात असताना आपण ही खुणगाठ मनाशी घट्ट बांधावी की ती कायम पोट रिकामी असताना एक आहाराचा भाग म्हणून खावी. कारण बरीच मंडळी भरपेट जेवण झाल्यावर फळे कापून खातात, हे असे करणे म्हणजे रोगाना आयते आमंत्रण होय. कारण जेवल्यावर फळे खाण्याने त्याचा विपरीत परिणाम खाल्लेल्या अन्नाच्या पचनावर होऊन रक्तातील ट्रायग्लिसराईड्स देखील वाढतात. याबद्दल सविस्तर पुढे पाहू.
* दुसरा प्रकार म्हणजे हीच फळे दुध, दही, पनीर, चक्का, आयस्क्रीम यांसोबत खाणे जसे फ्रूट सलाड विथ कस्टर्ड, शेक्स.. इ वारंवार खाणे म्हणजे त्वचारोग, सर्दी, दमा, खोकला, सायनस यांना आयतेच निमंत्रण होय.
* तसेच काही मंडळींना फळांचा रस पिण्यात भारी रस असतो. पण गरज नसताना असे करणे म्हणजे आपल्या पचनशक्तीवर अतिरिक्त ताण देणे होय. कारण जेव्हा आपण सबंध फळ खातो तेव्हा आपल्या पोटात त्याचा चोथा ज्यास फायबर म्हणतात ते जाते, पण रस काढायला व त्यातून पोट भरायला भरपूर फळे वापरावी लागतात. त्यामुळे साहजिकच जास्त साखर व पर्यायाने उष्मांक शरीरात गेले की नाही? त्यामुळे मी तर कायम फ्रूट ज्युसच पिते पण वजन मात्र कमी होत नाही अशी तक्रार करणार्‍यांनी हे लक्षात घ्यावे.
* तसेच सकाळी नाश्त्याला इतर पदार्थ खाऊन असे पाश्चात्यांप्रमाणे ज्युस पिणे म्हणजे पोटाचे विकार, अपचन व वजनवाढीला आयतेच आमंत्रण आहे हे लक्षात असू द्यावे.
म्हणूनच फळे खा, पण ते खायचे नियम पाळून बरे का!
ह्या विभागाची माहिती देण्यापूर्वी मला आपणांस हे सांगणे आवश्यक वाटले कारण आपल्यापैकी बरेच जण ह्या अशा चुका फळे खाताना हमखास करत असतात.

पपई

पपई हे फळ अत्यंत रूचकर व पौष्टिक असते. तसेच हे सगळ्यांना आवडणारे व बारमाही फळ. याचा आपण वेगवेगळ्या तर्‍हेने उपयोग करू शकतो – मग शेक असो वा फ्रूट सलाड – सगळ्याच पदार्थांत ही पपई रूचकर लागते.
तसे काही आपण ह्यातून फारसे पक्वान्न बनवत नाही कारण हे फळ कच्चे असताना भाजी व पिकल्यावर नुसतेच खायला छान लागते.
याचा १०-१२ फूट उंच वृक्ष असतो व ह्या झाडाला फांद्या नसतात. पाने ताडाच्या पानांप्रमाणे छत्राकार, विस्तृत व विभक्त खणांची असतात. फुले हिरवी, पांढरी व एकलिंगी असतात. फळ एक कोष्ट, लंबगोल, कच्चे असताना हिरवे व पिकल्यावर पिवळसर असते. त्याच्या आत बिया असतात ज्या चॉकलेटी रंगाच्या व पाणीदार अशा पिकलेल्या फळात तर कच्च्या फळात पांढर्‍या असतात.
कच्चे फळ हे चवीला तिखट, कडवट असते ते उष्ण असते व कफ वातशामक असून पित्तकर असते.
तर आता आपण प्रथम कच्च्या पपईचे घरगुती उपचार पाहूया :
१) कच्च्या पपईचा चीक गजकर्णावर लावावा फायदा होतो.
२) मुळव्याधीवर पपईच्या कच्च्या फळाचा चीक लावल्यास ३ दिवसांनी मोड कमी होतो.
३) कच्ची पपई वाटून हातपायांवर बांधून झोपल्यास हातपायांची आग व भेगा कमी होतात.
४) कच्च्या पपईचे तुकडे मांस शिजवताना त्यात घालावे म्हटजे मांस लवकर शिजते व सुपाच्य होते.
५) कृमींवर मोठ्या माणसांना १ चमचा पपईचा चीक+साखर हे मिश्रण घ्यावे व लहान मुलांना हा चीक १-२ थेंब साखरेसह द्यावा.

पिकलेली पपई
पिकलेली पपई ही चवीला गोड, थंड असून पित्तनाशक असते.
आता पिकलेल्या पपईचे घरगुती उपचार पाहूया :
१) जेवणानंतर काही वेळाने पिकलेल्या पपईच्या १-२ फोडी खाल्ल्याने अन्नपचन सुलभ होते.
२) बाळंतीण बाईला जेवणानंतर पपई खायला दिल्यास तिला भरपूर दुध येते.
३) ज्या स्त्रीयांना मासिक पाळीच्या वेळी स्त्राव कमी होतो त्यांनी पपई खावी व ओटी पोटाला एरंडेल तेलाने मालीश करावे.
४) पपईच्या बियांचे चूर्ण १-२ चमचे गरम पाण्यासह दीर्घ काळ सेवन केल्याने कृमिंचा प्रादुर्भाव कमी होतो.
५) प्रसुतीनंतर गर्भाशय संकुचित होऊन रक्तस्राव थांबावा म्हणून पपईच्या बियांचा रस काढुन प्यावा व ओटीपोटाला देखील हा रस + एरंडेल तेल हे मिश्रण चोळावे.
पपई ही गरोदर स्त्रीने खाऊ नये कारण पपईमध्ये गर्भाशय संकोच करण्याचा गुण असल्याने त्यामुळे गर्भपात होऊ शकतो.
तसेच पपईचे अतिसेवन केल्यास बायकांना मासिक पाळीच्या वेळेस अतिरक्तस्त्राव होऊ शकतो.

लिंबू

लिंबू अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचेच लाडके फळ. या फळाचा आपण खायला तर उपयोग करतोच जसे लिंबू सरबत, लोणचे ते ही वेगवेगळ्या प्रकारची, तसेच कोणत्याही पदार्थांची लज्जत वाढवायला ह्याचा रस आपण हमखास त्या पदार्थावर पिळतो. तसेच हे फळ फक्त खायलाच वापरले जाते असे नाही बरं का, ह्या बिचार्‍याचा उपयोग जारण मारण अर्थात काळ्या विद्येत करतात म्हणे, तसेच दृष्ट बाधा होऊ नये म्हणून आपण लिंबू मिरचीचे तोरण आपल्या घर-वाहन ह्याला लावतोच ना! तर मग असा हा बहुपयोगी लिंबू. या फळाने अगदी आनंद, आजारपण, वाईट काळ ह्या सर्वांत आपली साथ न सोडण्याचा जणू पण केला आहे.
असा हा बहुपयोगी मित्र लिंबू.
* यााचे मोठे झुडूप असते. याच्या फांद्यांवर काटे असतात. पाने गोल, तेलकट, हिरवी चमकदार व विशिष्ट गंधयुक्त असतात. ह्याचे दोन भेद आहेत गोल व पातळ पिवळी साल असलेला आणी दुसरा लांबट जाड हिरवी साल असलेला. मला पिवळे रसरसशीत लिंबू जाम आवडतात बुवा.
* लिंबु हा चवीला आंबट, उष्ण व वातनाशक आहे पण हा पित्त व कफ वाढवतो. चला आता ह्याचे काही घरगुती उपचार पाहूया:
१) संडासमधून आव पडणे किंवा पातळ जुलाब होणे यावर लिंबू गरम करून त्याचा रस काढावा व त्यात सैंधव व साखर मिसळून थोड्या थोड्या वेळाने १/२ चमचा पित रहावे.
२) अजीर्ण, उल्ट्या, तोंडाला चुळा सुटणे ह्यात लिंबाचा रस १ चमचा+ मध २ चमचे हे मिश्रण चाटावे.
३) अजीर्णामुळे घशाशी आंबट येत असल्यास २ चमचे लिंबू रस+ १/४ कप गार पाणी+ १ चिमूट खायचा सोडा हे मिश्रण घ्यावे.
४) लघवीतून खर पडत असल्यास लिंबाचा रस १ चमचा+कोथिंबीर रस १ चमचा हे मिश्रण कोमट पाण्यातून २-३ वेळा दिवसातून काही दिवस घ्यावे.
५) लिंबूरसात हळकुंड उगाळून त्यात १ चिमूट कापूर घालून हे मिश्रण सर्वांगास चोळावे ह्याने त्वचेखाली असणारी चरबीची फाजील वाढ थांबते. तसेच त्वचा निरोगी व चांगली राहते.
६) एरंडेल लिंबूरसात घालून त्याचे मलम करावे व हे मलम पायांच्या भेगांना, त्वचा मऊ व्हायला व छर्रींीीरश्र Aषींशी ीहर्रींश श्रेींळेप म्हणून आपण वापरू शकता.
लिंबू प्यायचा अतिरेक केल्यास दात आंब्यात व ठिसूळ होतात, तसेच हाडांवर देखील ह्याचा दुष्परिणाम दिसतो, त्यांचप्रमाणे सर्दी होते.