का येतं वैफल्य?

0
158
  • अनुराधा गानू (आल्त सांताक्रूज, बांबोळी)

 

आपल्या देशात आर्थिक विषमतेची दरी खूप खोल आहे. काही जण ऐषारामात लोळत आहेत तर काहींना पोटभर अन्न मिळण्याची ददात. एकेक पैशासाठी वणवण फिरतात. अशा लोकांच्या किंवा मुलांच्या डोक्यात पैसा मिळवणं हेच वेड असतं.

 

सध्या जवळ जवळ रोजच वर्तमानपत्र उघडलं की, काही ठराविक बातम्या असतातच. खून, दरोडा, चोरी. दुसरी बातमी बलात्काराची आणि तिसरी बातमी कोणाच्यातरी आत्महत्येची. या सार्‍या ठळक बातम्या, बाकीच्या काय- विरोधी पक्षाची रोज नवी वक्तव्ये. कोणत्यातरी नटनट्यांचं जमलं- फिसकटलं, कसलेतरी घोटाळे, कोणत्यातरी मंत्र्यांनी दररोज कोणत्या ना कोणत्या तरी कार्यक्रमाला लावलेली हजेरी. रोज कोणत्या तरी नेत्याचा सत्कार समारंभ, अशाही काही बातम्या नित्यनेमाने असतातच. पण या बातम्या काय वाचायच्या, त्याबरोबर असलेले फोटो बघायचे आणि सोडून द्यायचे. संध्याकाळी पेपर टी-पॉयच्या खालच्या कप्प्यात आणि दुसर्‍या दिवशी रद्दीच्या कपाटात. त्या बातम्या तेवढ्याच लायकीच्या. पण मी ज्या ठळक बातम्या म्हटलं ना, त्या मात्र दुर्लक्ष करण्यासारख्या नसतात. पेपर जरी रद्दीत गेला तरी या बातम्या विचारांची शिदोरी देऊन जातात. मग आमच्यासारख्या सामान्य माणसाला प्रश्‍न पडतात… हे असं घडायची कारणं तरी काय आणि मग विचारचक्र सुरु होतं.

या अशा घटना घडण्याच्या अनेक कारणांपैकी महत्वाचं एक कारण आहे. वैफल्यग्रस्तता. पण हे असं वैफल्य का येतं? याचीही बरीच कारणे असू शकतात. हल्ली सगळीकडे माणसं भौतिक सुखाच्याच मागे धावत असतात, त्यामुळे जीवघेण्या स्पर्धा सुरु होतात. माणसाच्या वागण्याला कोणतीही अध्यात्मिक किंवा नैतिक बैठक नाही. त्यामुळे कायम मनाची अशांतता, मुलांच्याकडून पालकांच्या खूप अपेक्षा आणि पालकांच्याकडून मुलांच्या अवाजवी अपेक्षा, आर्थिक विषमतेची खूप मोठी दरी, बेरोजगार, आरक्षण आणि अहंकार… अशा खूप गोष्टी आहेत ज्यामुळे माणसाला वैफल्य येतं. आणि या वैफल्यग्रस्त अवस्थेत माणसांच्या हातून अशा घटना घडतात. कधी कधी प्रेमभंग झाल्यामुळेसुद्धा माणसं इतकी टोकाची कृती करतात आणि हे सगळं करणारी माणसं वयानं फार मोठी नसतात. बहुतेक तरुणच असतात.. जगाचा अनुभव नसतो. परिणामांची कल्पना नसते आणि विचारांची परिपक्वता नसते. पण वैफल्य मात्र असतं. त्यामुळे क्षणिक विचारांना बळी पडतात आणि मग आत्महत्येसारख्या टोकाच्या घटना घडतात.

विशेषतः या वयातील मुलांना अभ्यासाव्यतिरिक्त इतर खूप गोष्टी आकर्षित करतात. मोबाईल, टीव्ही, इतर व्यसनं या सगळ्याचा परिणाम या मुलांवर होत असतो. कालच टीव्हीवर बातमी ऐकली. या तरुण वयातील ७४% मुलं मोबाईलशिवाय जगूच शकत नाहीत. काही मुलं अभ्यासात खूप हुशार असतात. त्यांच्या मार्कांची टक्केवारीसुद्धा खूप चांगली असते. पण ते आरक्षणाच्या वर्गात मोडत नाही. आरक्षण असलेल्या मुलांना कितीही कमी टक्के मार्क्स असले तरी त्यांना सहज कोणत्याही कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो आणि आपल्याला मिळत नाही. मग आपोआपच फ्रस्ट्रेशन (वैफल्य) येते. काही वेळेला इंटरव्ह्यू खूप चांगला होतो पण नोकरी मिळत नाही. का? .. तर पुन्हा आरक्षण आणि टेबलाखालून देण्याइतका पैसा नाही. आपल्या देशात लोकसंख्या इतकी भरमसाठ वाढतेय, त्याबद्दल तर अजिबात जागरुकता नाही. नोकरीच्या ५० जागांसाठी ५०,००० अर्ज आलेले असतात. मग चढाओढ, त्यातून निर्माण होते जीवघेणी स्पर्धा. मग पुन्हा तेच… आरक्षण, सत्ता, पैसा. त्यामुळे वैफल्य. शिवाय आपल्या देशात आर्थिक विषमतेची दरी खूप खोल आहे. काही जण ऐषारामात लोळत आहेत तर काहींना पोटभर अन्न मिळण्याची ददात. एकेक पैशासाठी वणवण फिरतात. अशा लोकांच्या किंवा मुलांच्या डोक्यात पैसा मिळवणं हेच वेड बनतं. कसंही करून पैसा मिळवायचाच आणि श्रीमंत व्हायचंच या वेडाने ते झपाटून जातात आणि मग या वैफल्यग्रस्त अवस्थेतूनच खून, चोर्‍या, दरोडे असे प्रकार घडतात. याचं सगळं ज्ञान चित्रपटातून तर मिळतंच. शिवाय वास्तवता दाखवण्याच्या नादात चित्रपटात अतिशय उत्तेजक आणि अश्‍लील दृश्ये दाखवली जातात. त्याचाही परिणाम या मुलांवर होतो आणि मग उपभोग घेण्याच्या लालसेपायी बलात्कारासारख्या घटना घडतात.

काही मुलं अभ्यासात हुशार नसतात. पण दुसर्‍या कुठल्यातरी विषयात, कलेत अतिशय पारंगत असतात. पण बर्‍याच वेळा पालकांना ते पटत नाही. त्यांना हवी असते टक्केवारी. असे पालक फक्त अभ्यासाच्या मागे लागतात आणि अपेक्षेप्रमाणे गुण मिळाले नाही की ते आपल्या मुलाची दुसर्‍या मुलांबरोबर तुलना करू लागतात. त्यांचा पाणउतारा करतात. ते मुलांना सहन होत नाही. काही वेळेला आपल्याला परिस्थितीमुळे करता आलं नाही ते मुलानं करावं असा त्यांचा अट्टाहास असतो. अपेक्षा चूक नाही, पण त्याचा अट्टाहास करणं चुकीचं आहे. मग आईवडलांच्या इच्छा- अपेक्षा पूर्ण करता आल्या नाहीत की पालक चिडतात आणि मग आपण आयुष्यात कधी यशस्वी होऊ शकणार नाही, आपण अपयशीच आहोत.. असा न्यूनगंड मुलांच्या मनात निर्माण होतो. हीच वैफल्यग्रस्त अवस्था आणि मग यातूनच घडतात आत्महत्या.

काही लोकांमध्ये अतिशय अहंकार भरलेला असतो आणि तो अहंकार कोणाकडून डिवचला गेला की ते आपल्या जिवाचं बरं-वाईट करून घेतात.

एकूण काय तर सगळ्या घटनांचं मूळ कारण आहे नैराश्य आणि वैफल्य. सुदृढ समाजासाठी या गोष्टी घातकच आहेत. याचा विचार प्रत्येकानं करायला हवा ना. भ्रष्टाचाराला वेळीच आळा घालायला हवा. आर्थिक विषमता कमी करण्यासाठी, नाहीशी करण्यासाठी कसोशीने प्रयत्न व्हायला हवेत. जीवघेण्या स्पर्धांतून एकमेकाला वाचवायला हवे.