काश्मीर धगधगले

0
153

भारतीय जनता पक्षाने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात अत्यंत कणखर भूमिका स्वीकारण्याची ग्वाही दिल्याच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये वातावरण विलक्षण पेटल्याचे दिसते आहे. विशेषतः भाजपच्या जाहीरनाम्यात काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० आणि ३५ अ हटविण्याचे वचन देण्यात आलेले असल्याने काश्मिरी नेत्यांचा तीळपापड उडाला आहे. फारुख अब्दुल्लांपासून मेहबुबा मुफ्तींपर्यंत सारे काश्मिरी नेते एका सुरात त्याच्या विरोधात उभे ठाकले आहेत. ३७० वे कलम हटवलेत तर काश्मीरवरील भारताचा हक्क संपुष्टात येईल असे मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या, तर ३७० वे कलम हटवून बघाच; त्यानंतर काश्मीरमध्ये कोण तिरंगा फडकवतो ते मी पाहीन अशी धमकी फारूख अब्दुल्लांनी दिली आहे. आजवर फुटिरतावादी नेते अशा जहाल भाषेत बोलायचे. आता मुख्य राजकीय प्रवाहातील काश्मिरी मंडळीच अशा प्रकारच्या सरळसरळ देशद्रोही भाषेमध्ये बोलू लागलेली दिसते आहे. खरे तर या मंडळींचे संभावितपणाचे मुखवटे उडून खरे चेहरे रंग दिसू लागले आहेत असेच म्हणायला हवे. वारे वाहील त्या दिशेने आपले सूप धरायचे आणि सत्तेची फळे चाखायची ह्या सार्‍या मंडळींची जुनी नीती आहे. वेळोवेळी केंद्रातील सत्ताधारी पक्षाशी हातमिळवणी करून काश्मीरमध्ये मनसोक्त सत्ता उपभोगताना राष्ट्रीयत्वाची बात करणारे हेच लोक आज काश्मीर भारतापासून तोडण्याची बात करू लागले आहेत. याच मेहबुबा मुफ्ती दोन वर्षांपूर्वी काश्मीरचा प्रश्न केवळ मोदीच सोडवू शकतात असे सांगत होत्या. आज त्या फुटिरतावाद्यांच्या भाषेत बोलताना दिसत आहेत. मुख्य प्रवाहातील नेतेच अशा भाषेत बोलू लागल्याने काश्मीरमधील परिस्थिती चिघळण्याची चिन्हे आहेत. आधीच काश्मीरमध्ये लोकसभा निवडणुका होणार असल्याने त्या पार्श्वभूमीवर सध्या बर्‍याच घडामोडी घडताहेत. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर नुकताच तेथील राज्यपालांनी जम्मू – श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग येत्या ३१ मे पर्यंत सुरक्षा दलांना सुरक्षित हालचाली करता याव्यात यासाठी सर्व प्रकारच्या नागरी वाहनांना आठवड्यातून दोन दिवस म्हणजे रविवारी आणि बुधवारी पहाटे चार वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत पूर्ण बंद ठेवण्याचा आदेश काढला आहे. जम्मू – श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग हा थेट उत्तर काश्मीरमधील बारामुल्लापासून जम्मूपर्यंत जाणारा महत्त्वाचा दुवा असल्यामुळे तो नागरी वाहतुकीला बंद ठेवल्याने काश्मिरी जनतेची मोठी गैरसोय होईल हे खरे आहे, परंतु ही परिस्थिती पुलवामा हल्ल्यामुळे तशा प्रकारच्या संभाव्य दहशतवादी हल्ल्याच्या भीतीमुळे उद्भवलेली आहे. लोकसभेच्या निवडणुका सुरळीत पार पडाव्यात यासाठी त्या काळापुरता हा बंदी हुकूम आलेला आहे, परंतु या घटनेचे राजकीय भांडवल करून भारत सरकारविरुद्ध रान पेटवण्यासाठी सारे काश्मिरी नेते उतावीळ दिसत आहेत. सरकारने खरे तर एकीकडे दहशतवाद्यांचा निःपात करताना दुसरीकडे फुटिरतावाद्यांविरुद्धही कडक पावले उचलली होती. फुटिरतावाद्यांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या. काहींच्या मुसक्या आवळल्या गेल्या. काश्मीरच्या जमाते इस्लामीवर बंदी घालण्यात आली. पाकिस्तानच्या दूतावासात मेजवानीसाठी निघालेल्या काश्मिरी मंडळींना रोखून परत पाठवण्यात आले. केंद्र सरकारने काश्मीरसंदर्भात अवलंबिलेली ही कठोर नीती किती बरोबर, किती चूक हा वेगळा मुद्दा, परंतु परिस्थिती शांत करण्याऐवजी ती अधिकाधिक चिघळावी या दृष्टीने प्रक्षोभक विधाने करणारे काश्मीरमधील नेते खरोखर त्या राज्याचे हित चिंततात का हा मोठाच प्रश्न आज उपस्थित होतो आहे. एकीकडे भाजपाने काश्मीरसंदर्भात केलेल्या जहाल घोषणा तर दुसरीकडे कॉंग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात लष्कराच्या विशेषाधिकारांना काढून घेण्याचे आश्वासन देत आगीशी मांडलेला खेळ ह्या दोहोंच्या मध्ये कोठे तरी काश्मीरचे हित लपलेले आहे. केवळ दडपशाहीच्या बळावर काश्मीर प्रश्न सुटणे शक्य नाही हे जितके खरे, तितकेच काश्मीरसंदर्भात लांगूलचालनाची नीतीही उपकारक ठरणारी नाही हे खरे आहे. त्यामुळे ठकासी व्हावे ठक, उद्धटासी उद्धट या नीतीने एकीकडे दहशतवादी, फुटिरतावादी यांच्याशी दोन हात करतानाच आम काश्मिरी नागरिकांना जवळ घेण्याचीही तितकीच आवश्यकता आहे. निवडणुकीचा ज्वर अंगात चढल्याने काश्मीरसंदर्भात आगलावी भाषणे झाली तर काश्मिरी जनतेला मुख्य राष्ट्रीय प्रवाहात सामील करून घेण्याच्या दिशेने आजवर झालेल्या सार्‍या प्रयत्नांवर पाणी फेरल्यासारखे होईल. त्यामुळे नेत्यांनी काश्मीरसंदर्भात टीकाटिप्पणी करताना जबाबदारीने आणि देशहित विचारात घेऊनच करणे अपेक्षित आहे. सरकारने दहशतवाद्यांचा, फुटिरतावाद्यांचा कठोरपणे सामना करणे जेवढे आवश्यक आहे, तेवढेच आम काश्मिरी जनतेशी संपर्क, संवाद, सलोखा प्रस्थापित करणेही मोलाचे आहे. काश्मिरी राजकारणी यातील मोठा अडथळा बनून राहिलेे आहेत. त्यांना खड्यासारखे बाजूला काढून आगामी सरकारने काश्मिरी जनतेशी थेट संवाद प्रस्थापित केला, तरच धगधगते काश्मीर शांत होऊ शकेल!