काश्मीरात ३ दहशतवाद्यांचा खात्मा : दोन जवान शहीद

0
103

दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्याच्या अवनीर या खेड्यात पोलीस व लष्कर यांच्या संयुक्त कारवाईदरम्यान उडालेल्या चकमकीत हिजबुल मुजाहिदीनचे तीन दहशतवादी ठार झाले. मात्र दहशतवाद्यांच्या प्रतीहल्ल्यात दोन जवानही शहीद झाले. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये त्यांचा म्होरक्या यासिन इटू उर्फ गझनवी याचा समावेश आहे. शहीद जवानांची नावे इल्याराजा पी. (तामिळनाडू) व सुमेध वामन गवई (महाराष्ट्र) अशी आहेत. शहिदांना नंतर श्रीनगरमध्ये लष्करी अधिकार्‍यांनी राज्याच्या मंत्र्यांच्या उपस्थितीत अखेरची मानवंदना देण्यात आली.
शोपियान जिल्ह्याच्या अवनीरा खेड्यातील एका घरात हे दहशतवादी असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिल्यानंतर पोलीस व लष्कराने शनिवारी रात्री सदर भागाला वेढा घातला. प्रत्यक्ष कारवाई सुरू झाल्यानंतर दहशतवाद्यांनी पोलीस व लष्करी जवानांवर धुवांधार गोळीबार सुरू केल्याने त्यात ५ जवान जखमी झाले. जखमी स्थितीत त्यांना इस्पितळात नेण्यात आले. त्यापैकी दोघांची प्राणज्योत मालवली. त्यानंतर रात्रभर उभय बाजूंनी पहाटेपर्यंत चकमकी सुरूच राहिल्या. या संयुक्त कारवाईत म्होरक्या गझनवी याच्यासह त्याचा अंगरक्षक उमर व इरफान हा दहशतवादीही ठार झाला. गझनवी हा बुदगाम जिल्ह्यातील रहिवासी होता. तिघांचेही मृतदेह पोलिसांच्या हाती लागले असून मोहीम संपल्यानंतर गझनवी यांच्या कुटुंबियांना बोलावून त्याची ओळख पटविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.