काश्मीरात राष्ट्रपती राजवट लागू

0
133

जम्मू – काश्मीरमधील मेहबूबा सरकारचा पाठिंबा भाजपने मंगळवारी काढून घेतल्यानंतर काल तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. केंद्रीय गृह खात्याच्या प्रवक्त्याने याला दुजोरा देताना सांगितले की, काश्मीरात तातडीने राष्ट्रपती राजवट लागू करण्यास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मान्यता दिली.

भाजपने मेहबूबांचा पाठिंबा मंगळवारी काढून घेतल्यानंतर काश्मीरमधील घडामोडींना रात्री वेग आला. राज्यपाल एन. एन. व्होरा यांनी राज्यातील ताज्या राजकीय घटनांचा अहवाल दिल्लीत राष्ट्रपती भवनाला पाठविला. त्यावेळी राष्ट्रपती कोविंद सुरिनामला जाणार्‍या विमानात होते. भारतीय वेळेनुसार सुरिनामला ते काल पहाटे ३ वाजता दाखल होणार होते. त्यानुसार त्यांना सदर अहवाल सुरिनामला पाठविण्यात आल्यानंतर राष्ट्रपतींनी राज्यपालांच्या शिफारशीला मान्यता देण्याची प्रक्रिया पूर्ण करून काल सकाळी ६ वाजता त्या विषयीचा आदेश श्रीनगरला पाठविला.

आठव्यांदा राष्ट्रपती राजवट
जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली जाण्याची गेल्या ४ दशकातील ही आठवी वेळ ठरली आहे. तर २००८ पासून व्होरा यांच्या राज्यपालपदाच्या कार्यकाळातील अशा राजवटीची ही चौथी वेळ आहे. २००८ साली व्होरा राज्यपालपदी असताना प्रथम १७४ दिवसांसाठी राष्ट्रपती राजवट लागू झाली होती.