काश्मीरात प्रजासत्ताक दिनी हल्ल्याचा कट उधळला ः ५ अतिरेकी ताब्यात

0
138

जम्मू-काश्मीर पोलिसांनी काल जैश-ए-महंमदच्या ५ दहशतवाद्यांना अटक केली. येत्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यादरम्यान दहशतवादी कारवाया करण्याचा या दहशतवाद्यांचा इरदा होता असा दावा पोलिसांनी केला आहे. त्यांच्याजवळील मोठ्या प्रमाणातील दारूगोळाही जप्त करण्यात आला आहे. अटक केलेल्यांची नावे ऐजाझ अहमद शेख, उमर हमीद शेख, इम्तियाज अहमद, साहिल फारूरू गोजरी व नासिर अहमद मीर अशी आहेत.

दरम्यान मध्य काश्मीरचे पोलीस उपमहानिरीक्षक व्ही. के. बिर्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार ताब्यात घेतलेल्या दहशतवाद्यांनी आपण शस्त्रे व दारूगोळा ठेवलेल्या ठिकाणांची माहिती दिली होती. त्यानुसार त्या ठिकाणी जाऊन जिलेटिन कांड्या, डिटोनेटर, अन्य स्फोटके, बॅटर्‍या, नायट्रिक ऍसिड यांचा मोठ्या प्रमाणातील साठा जप्त करण्यात आला.

अटक करण्यात आलेल्या पाच दहशतवाद्यांनी प्रजासत्ताक दिनी दहशतवादी हल्ल्यांची तयारी सुरू केली होती, असे यावरून स्पष्ट झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. गेल्या वर्षी काश्मीर विद्यापीठात २६ जानेवारी रोजी झालेल्या हल्ल्यात हात असल्याची कबुली या दहशतवाद्यांनी दिली असल्याचे सांगण्यात आले.