काश्मीरात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात ५ जवान शहीद

0
158

जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील सीमा सुरक्षा दलाच्या (सीआरपीएफ) एका प्रशिक्षण केंद्रावर रविवारी पहाटे दहशतवादी घुसून त्यांनी केलेल्या हल्ल्यात भारताचे पाच जवान शहीद झाले. दहशतवादी व भारतीय जवान यांच्यात त्यानंतर झालेल्या चकमकीत तीन दहशतवादीही ठार झाले. उरी हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा दलांच्या तळावर दहशतवाद्यांनी केलेला हा दुसरा मोठा हल्ला आहे. जैश ए महम्मद या संघटनेच्या दहशतवाद्यांनी हा हल्ला केल्याचे वृत्त आहे.

अशा हल्ल्याची शक्यता असल्याची कुणकुण सुरक्षा दलांना होती अशी माहिती राज्याचे पोलीस महासंचालक एस. पी. वैद्य यांनी दिली.
याबाबत वृत्त असे की रविवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास अवंतीपुरा विभागात असलेल्या सीआरपीएफच्या प्रशिक्षण केंद्राच्या परिसरात तीन दहशतवाद्यांनी प्रवेश केला. हातबॉम्बचा मारा करीत ते या केंद्राच्या परिसरात घुसले व त्यानी धुवॉंधार गोळीबार सुरू केला. शहीद झालेल्यापैकी एकाचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाल्याचे सांगण्यात आले.

दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याचे लक्षात आल्यानंतर भारतीय जवानांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी हातबॉंब व अंदाधुंद गोळीबार केल्याने काही जवान जखमी झाले. सकाळी त्यापैकी एका जवानाचा मृत्यू झाला. त्यानंतर उभयतांत चकमकी सुरूच राहिल्या. काही अतिरेकी परिसरातील इमारतींमध्ये दडून राहिले होते. काही दिवसांपूर्वीच भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून हल्ला केला होता. त्या हल्ल्यात पाकचे तीन सैनिक ठार झाले होते. त्यावेळी भारतीय सैनिकांनी रावळकोट सेक्टरमधील परिसरात प्रवेश करून तेथे गस्तीवर असलेल्या पाक सैनिकांचा खात्मा केला होता. सर्जिकल स्ट्राईकनंतर भारतीय लष्कराचे हे पहिले क्रॉस बॉर्डर ऑपरेशन ठरले होते.