काश्मीरमधील ७६ हजारहून अधिक लोक सुखरुप स्थळी

0
88

भारतीय सशस्त्र दलांनी जम्मू-काश्मीरमध्ये युद्ध पातळीवर सर्वात मोठे मदत आणि बचाव कार्य सुरू केले असून आतापर्यंत ७६,५०० लोकांना सशस्त्र दल आणि एनडीआरएफने सुखरुपस्थळी पोचवले आहे. भारतीय हवाई आणि लष्कराने ७९ विमाने आणि हेलिकॉप्टर्स मदत कार्यासाठी पाठवली. लष्कराने सैन्यदलाच्या २४४ तुकड्या श्रीनगरमध्ये तर ८५ तुकड्या जम्मू परिसरात तैनात केल्या आहेत. त्यांनी ८,२०० ब्लॅकेट्‌स आणि ६५० तंबूचे वाटप केले. तसेच दीड लाख लिटर पाणी, अडीच टन बिस्किटे, २८ हजार खाद्य पदार्थांची पाकिटेही पूरग्रस्त भागात वाटली. वेगाने वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी ८० वैद्यकीय पथके कार्यरत आहेत. लष्कराच्या १३५ नौका आणि एनडीआरएफच्या १४८ रबरी बोटी बचाव कार्यात सक्रीय आहेत.
रस्ते वाहतूक पूर्ववत करण्यासाठी सीमा रस्ते संघटनेने पाच कृती दल तयार केले आहेत. ज्यात ५७०० कर्मचारी आहेत. ताज्या माहितीनुसार बटोट-किरतवाड आणि किश्तवाड-सिंथन दरम्यान रस्ते वाहतूक पूर्ववत करण्यात आलेले आहे. जम्मू-पुंछ रस्ताही वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. तेथील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत असून नवी दिल्लीतील आयडीएस मुख्यालयात पुरपरिस्थितीबाबत ताजी माहिती दिली जात आहे.
मदत पुरवण्याचे केंद्रीय मंत्र्यांचे आश्‍वासन
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि भूविज्ञान मंत्री, पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री, डॉ. जितेंद्र सिंग यांनी म्हटले आहे की जम्मू काश्मिरमधील पुरग्रस्त भागात अडकलेल्यांच्या नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये, आवश्यक ती सर्व मदत पुरवली जाईल. ते म्हणाले की, आपण तेथील प्रशासनाच्या संपर्कात आहोत. येत्या एक दोन दिवसांत दूरसंचार यंत्रणा पूर्ववत होईल अशी आशा आहे. बचाव पथके संपर्कासाठी उपग्रह फोनचा वापर करीत असल्याचे त्यांनी सांगितले.