काश्मिरी तरुणाईच्या व्यथा वेदनांचे दर्शन

0
124

एडिटर्स चॉईस

  •  परेश प्रभू

३७० कलम हटवले गेल्याने काश्मीर आज एका नव्या वळणावर आहे. बदल हा कधीच सोपा नसतो व तो सहजासहजी स्वीकारला जात नाही. त्यामुळे काश्मीर सध्या निर्बंधांखाली आहे. एकीकडे दहशतवाद व दुसरीकडे सुरक्षा यंत्रणा यांच्या दडपणाखाली वाढलेल्या काश्मिरी तरुणाईच्या मानसिकतेतून काश्मीर प्रश्नाचा वेध घेणारे हे महत्त्वपूर्ण पुस्तक आहे..

सध्या देशभरात एकच विषय केंद्रस्थानी आला आहे, तो म्हणजे काश्मीर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधानाच्या कलम ३७० खालील काश्मीरचे विशेषाधिकार काढून घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्यापासून काश्मीर खोर्‍यामध्ये तणावपूर्व शांतता आहे. सततची संचारबंदी, नेत्यांना झालेली अटक, फोन व इंटरनेटवरील निर्बंध आदींमुळे काश्मीरला एका मोठ्या तुरुंगाचे स्वरूप सध्या प्राप्त झालेले आहे. काश्मिरी जनता एका मोठ्या बदलाला सामोरी जाते आहे आणि बदल हा कधीच सोपा नसतो. तो सहजासहजी स्वीकारला जात नसतो. त्यामुळे या परिस्थितीचा फायदा देशद्रोही शक्ती तर उठवणार नाहीत ना ही चिंता प्रत्येक जागृत भारतीयाच्या मनामध्ये आज आहे.
आपण काश्मीरकडे आपल्या दृष्टिकोनातून पाहात असतो. परंतु काश्मीरमध्ये जन्मलेल्या, वाढलेल्या माणसांच्या – विशेषतः तेथील तरुणाईच्या मनात काय चालले असेल? सतत एकीकडे दहशतवाद आणि दुसरीकडे सुरक्षा यंत्रणांच्या दबावाखालील त्यांचे आयुष्य कसे असेल? पत्रकार गौहर गिलानी यांचे ‘कश्मीर ः रेज अँड रीझन’ हे कोरे करकरीत पुस्तक याच प्रश्नाचे उत्तर देते. गौहर गिलानी हे श्रीनगरस्थित ख्यातनाम पत्रकार. बीबीसी वर्ल्ड, एनडीटीव्ही, सीएनएन न्यूज१८, इंडिया टुडे, अशा आघाडीच्या प्रसारमाध्यमांसाठी काश्मीरसंदर्भात वार्तांकन करण्याचा त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे.

काश्मीरकडे जग एक नंदनवन म्हणून बघते. गिलानी म्हणतात त्याप्रमाणे, ‘‘बाहेरच्या जगासाठी काश्मीर एक स्वर्ग आहे, त्याच्या निसर्गसौंदर्यामुळे, हिमाच्छादित पर्वतांमुळे, गुलमर्ग आणि पहलगामच्या खोर्‍यांमुळे, सोनमर्गच्या हिमनदीमुळे, चिनाब आणि झेलमसारख्या नद्यांमुळे, निशात आणि शालीमारसारख्या मोगल उद्यानांमुळे, नितांतसुंदर दल, निगीन आणि वुलर सरोवरांमुळे, वेरीनाग आणि कोकरनागचे झरे आणि अहरबलच्या धबधब्यामुळे; पण बहुसंख्य पर्यटकांना ठाऊक नसते की १९८० पासून काश्मीर खोर्‍यातील जनता मात्र, दहशतवादाचे भयाण रूप पाहात आली आहे. गेली सात दशके दोन आण्विक शक्तींच्या कात्रीत सापडली आहे. वंश, धर्म, राष्ट्रीयत्व आणि राजकीय अस्मितेच्या विवादांचे चटके सोसत आली आहे. काश्मीर ही रक्तपात, विश्वासघात आणि तोडलेल्या वचनांची कहाणी आहे.’’

स्वतः एक काश्मिरी असल्याने त्या नजरेतून हे पुस्तक लिहिले गेले आहे आणि तेच त्याचे वैशिष्ट्य आहे. सतत तणावाच्या वातावरणात जगताना आलेले दाहक अनुभवाचे चटके मानसिकतेवर कसा सखोल परिणाम घडवू शकते हे गिलानींचे हे पुस्तक वाचताना कळते. वयाच्या तेराव्या वर्षी घराशेजारी फुटिरतावाद्यांनी लावलेले पोस्टर कुतूहलापोटी वाचत असताना सैनिकांकडून पडलेली थप्पड, दहशतवादी असल्याच्या संशयावरून घरावर पडलेला छापा आणि पोलीस स्थानकावर अकारण काढावी लागलेली रात्र, विमानतळावर इमिग्रेशन अधिकार्‍यांनी त्या देशद्रोही गिलानींचा तू कोण? असा केलेला अनपेक्षित सवाल, अशा दाहक वैयक्तिक अनुभवातून घडणार्‍या मानसिकतेमधून लिहिली गेलेली ही कैफियत आहे हे असे पुस्तक वाचत असताना आधी लक्षात घ्यावे लागते. बाहेरच्या व्यक्तींनी काश्मीर प्रश्नावर लिहिलेली असंख्य पुस्तके आहेत, परंतु स्वतः एका काश्मिरी तरुणाने त्या प्रश्नाकडे शक्य तितके तटस्थ राहण्याचा प्रयत्न करून लिहिलेले हे पुस्तक आहे आणि म्हणूनच दखल घेण्याजोगे आहे. राहुल पंडिता यांचे ‘अवर मून हॅज ब्लड क्लॉटस्’ पूर्वी वाचले होते. काश्मिरी पंडितांवर दहशतवाद्यांनी केलेल्या अत्याचारांच्या अतिशय सुन्न करणार्‍या कहाण्या त्यात होत्या. गिलानी यांचे हे पुस्तक दहशतवादाशी काडीमात्र संबंध नसलेल्या एका आम काश्मिरी होतकरू तरुणाची व्यथा मांडते. सफरचंदांच्या, अक्रोड, बदाम, डाळींबांच्या बागांमध्ये हसतखेळत गेलेले बालपण अचानक बदलते, दहशतवाद, दगडफेक करणारे हिंसक जमाव, संचारबंदी, निर्बंध हा नित्य जीवनाचा भाग बनतो. मशिदींतून विखारी प्रचार ऐकत वाढलेल्या कधी शांतीच न पाहिलेल्या काश्मीरच्या संतप्त नव्या पिढीला नेमके काय हवे आहे? तिच्या मनात खदखदणारा एवढा राग का? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न गिलानींचे हे पुस्तक करते. काश्मिरींची नवी पिढी सर्व आघाड्यांवर दिल्लीच्या राजवटीला आव्हान का देत असते त्याची कारणमीमांसा करण्याचा प्रयत्न गिलानींच्या या पुस्तकामध्ये आहे. आपण देशभक्त भारतीयाच्या नजरेतून या लेखनाकडे पाहतो तेव्हा काश्मिरींच्या संघर्षाचे उदात्तीकरण करण्याचा तर हा प्रयत्न नाही ना ही शंका आपल्या मनात येते, परंतु आम काश्मिरींचा दिल्लीकडे पाहण्याचा दृष्टिकोन असा का घडला आहे हे समजून घेण्यासाठीही हे पुस्तक तितकेच उपयुक्त ठरते हे मात्र नाकारता येत नाही.

काश्मीरसंदर्भातील गेल्या काही वर्षांतील महत्त्वपूर्ण घटनांच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न गिलानींनी या पुस्तकात केला आहे. बुरहान वानी या स्थानिक काश्मिरी दहशतवाद्याचा आपल्या सैनिकांनी खात्मा केला, तेव्हा त्याच्या अंत्ययात्रेचे निमित्त साधून त्रालच्या ईदगाहमध्ये कसा तमाशा करण्यात आला हे सर्वज्ञात आहे. काही कुख्यात दहशतवादी देखील त्या जमावामध्ये मिसळून गोळीबार करीत होते आणि स्थानिक रहिवासी त्या दहशतवाद्यांना सैनिकांपासून संरक्षण पुरवीत होते. बुरहान वानीची हत्या हा काश्मीरच्या संघर्षाला नवे वळण देणारी घटना मानली जाते, कारण तेव्हापासून त्याला नायकाच्या रूपात प्रस्तुत करून दक्षिण काश्मीरमधील अनेक कोवळ्या तरुणांना हाती शस्त्र घेण्यास देशद्रोही शक्तींनी प्रेरित केल्याचे दिसते. जेकेएलएफ, हुर्रियत कॉन्फरन्सच्या नेत्यांकडून काश्मिरी लढ्याची सूत्रे दहशतवाद्यांच्या हाती नेणारे हे स्थित्यंतर गिलानींनी तपशिलाने वर्णिले आहे. बुरहानचे गाव शरीफाबाद हे सर्वाधिक साक्षरता असलेले गाव आहे. अशा गावातील हा तरुण दहशतवादाकडे का वळला असेल याची कारणमीमांसा करण्याचा प्रयत्न लेखक करतो. आपल्याला ती पटायलाच हवी असे नाही, परंतु काश्मिरी जनतेचा दृष्टिकोन, वेगवेगळ्या राजकीय प्रवाहांचा इतिहास समजून घेण्याच्या दृष्टीने ती अभ्यासण्याजोगी आहे.

अर्थपूर्ण, प्रामाणिक व स्वच्छ राजकारणाचा अभाव हेही काश्मीर समस्येचे एक मूळ असल्याचे गिलानी यांना वाटते. काश्मीर खोर्‍यातील निवडणुकांमध्ये हेराफेरी चालत आली. त्यामुळे काही घराणी वगळता इतरांच्या राजकीय आकांक्षांना वाव मिळाला नाही. यातूनच काहींनी नियंत्रण रेषा पार करून पाकिस्तान गाठले आणि शस्त्रास्त्र प्रशिक्षण घेतले याकडे ते लक्ष वेधतात. शेख अब्दुल्लांनी आधी मुस्लीम एकत्रीकरणाचा प्रयत्न केला होता. जम्मू काश्मीर मुस्लीम कॉन्फरन्सचे ते पहिले अध्यक्ष होते. परंतु नंतर कॉंग्रेसच्या संपर्कात आल्याने त्यांनी सेक्युलर भूमिका घेतली व नॅशनल कॉन्फरन्स बनली. त्यावेळी मिरवाईज मौलाना महंमद युसूफशाह यांनी त्याविरुद्ध बंडखोरी केली. आजही हजरतबलमधील शेख अब्दुल्लांच्या समाधीला अहोरात्र पहारा ठेवावा लागतो असे गिलानी लिहितात.

आयसिससारखे वादळ जगभरात घोंगावते आहे, परंतु अजून तरी त्याला काश्मीर खोर्‍यात विशेष समर्थन मिळालेले नाही असेही गिलानी पुस्तकाच्या एका प्रकरणात सांगतात. काश्मिरी दहशतवादाचे सारे खापर केवळ पाकिस्तानवर फोडून चालणार नाही, काश्मीर प्रश्न हाताळण्यात दिल्लीश्वरांचे आजवर कुठे काय चुकले हेही पाहण्याची गरज आहे, असे गिलानींचे प्रतिपादन आहे आणि ते पटण्याजोगे आहे. काश्मीर प्रश्नावरून भारत पाकिस्तान दरम्यान १९४७-४८, १९६५ आणि कारगिलचे १९९९चे अशी तीन युद्धे झाली (७१ चे भारत – पाक युद्ध बांगलादेशच्या निर्मितीसंदर्भात होते). काश्मीर प्रश्नावर चौकटीबाहेरचा विचार करून जनताकेंद्रित तोडगा निघायला हवा होता असे गिलानींना वाटते. काश्मिरी हिंदू आणि मुसलमानांनी गेल्या तीन दशकांतील एकमेकांचे दुःख आणि वेदना समजून घेतलेले नाही असे लेखकाला वाटते. आम्ही जातीय सलोख्याने निश्‍चित एकत्र राहू शकलो असतो, कारण काश्मीरच्या संस्कृतीचा तो अविभाज्य भाग आहे असे गिलानींचे प्रतिपादन आहे. काश्मीरमधील इस्लाम हा खरोखरच भारताच्या काही भागांसारखा कर्मठ नाही, तो उदारमतवादी आहे आणि सूफी परंपरेचा त्यावर मोठा प्रभाव आहे. काश्मिरी पंडितांच्या स्थलांतरास स्थानिक मुसलमान समुदायालाही ते जबाबदार धरतात. आम्ही आमचे निर्णय, आमचे जीवन, आमचा इतिहास आणि वर्तमान दुर्दैवी परिस्थितीला शरण जाऊ द्यायला नको होते. आपला सांस्कृतिक व भावनिक धागा तुटू द्यायला नको होता असे ते पुढे लिहितात.
काश्मीर प्रश्न जटील बनवण्यात नोयडास्थित कॉर्पोरेट दूरचित्रवाणी माध्यमांनाही ते जबाबदार धरतात आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील काश्मीरसंदर्भातील ‘टॅब्लॉईड’ पद्धतीची एकूण कव्हरेज पाहिली तर हा आक्षेप नक्कीच पटण्याजोगा आहे. विषयाचे गांभीर्य समजून न घेता उथळ, सवंग प्रस्तुतीकरणातून काश्मिरी जनतेच्या जखमांवरील खपल्या उखडण्याचेच काम या वाहिन्या करीत असतात. लेखक त्याच्याशी प्रख्यात नॉम चॉम्स्कींच्या ‘टेन स्ट्रॅटजीस ऑफ मॅनिप्युलेशन’ या दशसूत्रीचा संदर्भ जोडतात.

काश्मीर प्रश्नाच्या सोडवणुकीसंदर्भात शेवटच्या प्रकरणांत लेखकाने केलेले प्रतिवादन आणि सूचना आता कालबाह्य ठरल्या आहेत, कारण ३७० कलम हटवण्याच्या मोदींच्या धाडसी व ऐतिहासिक निर्णयानंतर काश्मीर प्रश्नाचे सारे ताणेबाणेच बदलून गेले आहेत. आता पाकिस्तान या चित्रात उरलेला नाही. काश्मीर हे भारताचे अभिन्न अंग आहे आणि काश्मिरी जनतेचा उत्कर्ष ही आपली जबाबदारी आहे या भावनेतून मोदी ‘नया कश्मीर’ घडवायला निघाले आहेत. गुरवारी रात्री त्यांनी देशवासीयांना केलेल्या संबोधनातून त्यासाठीच्या आपल्या सर्वंकष कृतिकार्यक्रमाची दिशा त्यांनी स्पष्ट केलेली आहे. येत्या ईदच्या दिवसांत मोदी काश्मीरसाठी एखादी मोठी घोषणाही करू शकतात. त्यांच्यावर भरवसा ठेवून आजवरचा रक्तपात, हिंसाचार, असुरक्षित जिणे यापासून मुक्ती मिळवून एका नव्या भविष्याला सामोरे जायचे की नाही हे शेवटी काश्मिरी जनतेने ठरवायचे आहे!