‘काव्यमाला काव्यहोत्र’ सातासमुद्रापार…

0
368
  •  कालिका बापट

‘सुरक्षित राहा, घरात राहा, संपर्कात राहा’ या संदेशाद्वारे चालू करण्यात आलेला मनसा क्रिएशन्स निर्मित उपक्रम म्हणजे ‘काव्यमाला काव्यहोत्र’. या ग्लोबल वेब-कविसंमेलनात सहभागी होणार्‍यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. गोवा, महाराष्ट्र, बृहन्महाराष्ट्र, बृहन्भारत आणि विदेशातील हजारो प्रथितयश कवी-कवयित्री या उपक्रमाशी जोडले गेले आहेत. त्याविषयी थोडेसे….

पुस्तक दिनादिवशी अर्थात २३ एप्रिल रोजी माझ्या मनसा क्रिएशन्सतर्फे गोव्यातून एक संकल्प आखला गेला. घरात राहून, सुरक्षित राहून सर्वांच्या संपर्कात राहायचे. त्यासाठी मी एक उपक्रम हाती घेतला. ‘सुरक्षित राहा, घरात राहा, संपर्कात राहा’ या संदेशाद्वारे हा उपक्रम चालू करण्यात आला होता. हा उपक्रम असा की एकाने कविता सादर करायची आणि त्याने दोन कवींची नावे सुचवून हा उपक्रम पुढे न्यायचा. त्याप्रमाणे उपक्रमाचे फॉर्मेट तयार करण्यात आले. कवी, कवयित्रींना पाठविण्यासाठी निमंत्रण संदेश बनविण्यात आला. तेव्हा एक माहीत होतं की हा उपक्रम पुढे न्यायचा आहे. सर्वांना जोडून घेऊन ही काव्यदिंडी पुढे न्यायची आहे आणि हा संकल्प तडीस गेला, सफल झाला आणि आता तो सातासमुद्रापारही गेला आहे. याचा अतिशय आनंद होतो आहे. गोवा, महाराष्ट्र, बृहन्महाराष्ट्र, बृहन्भारत, आणि विदेशातील हजारो कवी-कवयित्री या उपक्रमाशी जोडले गेले आहेत. दिवसेंदिवस या उपक्रमाची व्याप्ती वाढत असून, दिवसाकाठी पंचवीस ते तीस कवी-कवयित्री यात स्वत:चे कविता सादरीकरणाचे व्हिडिओ फेसबुकवर अपलोड करीत आहेत. ‘काव्यमाला काव्यहोत्र’ या उपक्रमांतर्गत आयोजित ग्लोबल वेब-कविसंमेलनात सहभागी होणार्‍यांची संख्या वाढतच चालली आहे आणि ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.
या उपक्रमात महाराष्ट्रातील प्रथितयश कवी-कवयित्रींनी सहभाग घेतला आहे. ज्येष्ठ साहित्यिक महेश केळूसकर, ज्येष्ठ गझलकार ए.के. शेख, गझलकार प्रशांत वैद्य, गझलकार आनंद पेंढारकर, महेश देशपांडे, ज्येष्ठ कवयित्री अंजली कुलकर्णी, गौरी कुलकर्णी, आश्‍लेषा महाजन, स्वरूपा सावंत, वैषाली मोहिते, वृषाली केळकर, साहील कबीर, निर्मिती कोलते, अनघा जावकर, शशिकांत कोळी, शशिकांत तिरोडकर, नंदू सावंत, कल्पना बांदेकर, संजीवनी बोकील, मंदाकिनी पाटील, संगीता अर्बुने, भाऊ विशे, मनीषा अतुल, मंजिरी पाटील, डॉ. संगीता गोडबोले, प्रणाली कदम, पूजा भडिंगे, अनिल आठल्ये इत्यादी अनेक कवी-कवयित्रींनी यात सहभाग घेतला आहे. किती जणांची नावे घेऊ? प्रथितयश, नवोदित अशा कितीतरी कवयित्रींनी या काव्यहोत्रात आपल्या समिधा अर्पण केल्या आहेत.
२३ एप्रिल रोजी आखलेला हा उपक्रम आता सव्वा महिन्यानंतर सातासमुद्रापार पोचला आहे. अमेरिकास्थित ज्येष्ठ साहित्यिक, कवयित्री वर्षा सातपुते हळबे, सिंगापूरच्या संचिता कारखानीस, मोहना कारखानीस, सुचेता चौगुले पाटील, अबुधाबीच्या रूपाली कीर्तनी, पीनल चौधरी अशा कितीतरी जणींनी या काव्यहोत्रात सहभाग घेतला आहे. सामाजिक संदेश घेऊन सुरू केलेल्या या उपक्रमाला सर्व स्तरावरून चांगला प्रतिसाद लाभत आहे.
२३रोजी या उपक्रमासंदर्भातील व्हिडिओ तयार केल्यावर
२४तारखेला सकाळी ४ वाजता मी तो व्हिडिओ फेसबुक पेजवर अपलोड केला. त्यांनंतर त्याच दिवशी गोव्यातील नामवंत कवयित्री ऍड. केतकी साळकर आणि प्रा. डॉ. नीता तोरणे यांना मी उपक्रमासंदर्भात माहिती देऊन हा उपक्रम कसा पुढे जाईल याविषयी सांगितले. त्याप्रमाणे दोघींनीही आपण यात सहभागी होणार असल्याचे आश्‍वासन दिले. २४ व २५चा दिवस तसाच गेला. दोघींकडून प्रतिसाद आला नाही. तोपर्यंत गोव्यातील सर्वच प्रथितयश कवी कवयित्रींना मी संदेश पाठवून या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले. अनेकांनी आपण नक्कीच यात सहभागी होऊ असे सांगून, व्हिडिओ कसा करायचा याविषयी माहिती पण घेतली. २५च्या रात्री माझी एक युवा मैत्रीण निशा नागराज गोरे ऑनलाइन दिसली. पावणे दोन वाजले असावे तेव्हा. मी निशाला म्हटले, की ‘बघ असा असा उपक्रम आहे. तू उद्या सकाळी पहिला व्हिडिओ टाकू शकशील काय?’ तिने लागलीच ‘हो’ म्हटले. तिचा निरोप घेतला आणि मी झोपायला गेले. दुसर्‍या दिवशी सकाळी २६ तारखेला उठून बघते तर नीशाने आपल्या कवितेचा आणि या उपक्रमातील माझ्यानंतरचा पहिला व्हिडिओ टाकला होता. तो व्हिडिओ पाहून एवढा आनंद झाला. त्याच आनंदाच्या भरात मी केतकीला फोन लावला. तिला सांगितले, ‘तू पण टाक आता व्हिडिओ म्हणजे आमची काव्यमाला पुढे जात राहील’. लगेचच केतकीने पण टाकला. त्यानंतर त्याच दिवशी गोव्याचे गझलकार दत्तप्रसाद जोग यांनी आपला व्हिडिओ टाकला. नीशाने ज्या कवींची नावे सुचविली होती, त्यांनी पण व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. काव्यहोत्रने आता जोर धरला होता. शीतल साळगावकर, चित्रा क्षीरसागर, गझलकार प्रकाश क्षीरसागर यांनीही आपल्या काव्यसमीधा अर्पण केल्या. त्यानंतर ही काव्यदिंडी युवा कवी-कवयित्रींनी पुढे नेली. श्रद्धा गवंडी, अंकिता देऊलकर, विशाल गावस, अविनाश नाईक, सविता गिरोडकर यांनी ही काव्यपालखी पुढे नेली. त्याचबरोबर प्रथितयश कवयित्रींमधून मीना समुद्र, शांता लागू, तेजश्री प्रभूगावकर, रेखा मिरजकर, अंजली चितळे, अंजली आमोणकर, अनुजा जोशी, प्रा. डॉ. नीता तोरणे, प्रा. विनय बापट, चंद्रशेखर गावस, परेश नाईक, गौरीश वेर्णेकर इत्यादी अनेक कवी-कवयित्रींनी या काव्यहोत्रात सहभाग घेतला. एवढेच नव्हे तर याच सहभागी कवी-कवयित्रींपैकी अनेकांनी ही काव्यदिंडी महाराष्ट्रात पोचविण्यास मदत केली. चंद्रशेखर गावस यांनी कोल्हापूरचे इंद्रजीत शिरगावकर आणि देवगडच्या उत्तरा जोशी यांचे नाव सुचविले. प्रा. विनय बापट यांनी बंगलोरच्या प्रज्ञा वझे घारपुरे आणि नागपूरच्या पूजा डोंगरवार यांची नावे सुचविली. अशा प्रकारे ही काव्यदिंडी गोव्याबाहेर पोचली.

कुलकर्णी कुटुंबीयांचा सहभाग

मोहन कुलकर्णी आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबीयांनी या काव्यहोत्रात सहभाग घेेऊन साहित्यप्रेमाविषयीचा, काव्यप्रेमाविषयीचा दाखला दिला. यात स्वत: मोहन कुलकर्णी, त्यांची पत्नी नंदिनी कुलकर्णी, मुली आसावरी कुलकर्णी, संहिता कुलकर्णी तसेच त्यांनी ही काव्यदिंडी पुढे नेत अनेकांची नावे सुचविली. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रातील विद्रोही कवी साहील कबीर यांनीही आपल्या काव्यसमिधा अर्पण केल्या त्या मोहन कुलकर्णीप्रति असलेल्या प्रेमभावामुळे. मी ज्यावेळी त्यांना संपर्क साधला, त्यावेळी ते म्हणाले, आपण केवळ मोहन कुलकर्णी यांच्यासाठीच या काव्यहोत्रात सहभागी होतो आहे. असेही किस्से हे काव्यहोत्र पुढे नेताना अनुभवायला मिळाले. मी जेव्हा आसावरी कुलकर्णी यांची लिंक तपासली तेव्हा कळले की तिचे नाव बेळगावहून कुणीतरी सुचविले होते. याचा अर्थ असा की, ही काव्यदिंडी बेळगावपर्यंत पोचली आहे.

काव्यहोत्राचा ‘टर्निंग पॉईंट’

गझलकार स्वरूपा सामंत यांनी या काव्यहोत्रात सहभाग घेतला. याला काव्यहोत्राचा टर्निंग पॉईंट म्हणावे लागेल. बेळगावच्या वृषाली केळकर नामक कवयित्रीने स्वरूपा सामंत यांचे नाव सुचविले. ‘पार्कातल्या कविते’ च्या संस्थापक असलेल्या स्वरूपा सामंत यांनी आपली कविता सादर केल्यावर फक्त दोनच नव्हे तर अनेकांची नावे सुचवली. यात गझलकार आनंद पेंढारकर, निर्मिती कोल्हे, महेश देशपांडे इत्यादी अनेकांची नावे सुचवली. त्यामुळे त्यांनी सुचविलेल्या कवी-कवयित्रींनी ही काव्यदिंडी जोमाने पुढे नेली. आता बर्‍यापैकी कर्नाटक, महाराष्ट्र आणि विदर्भात ही काव्यदिंडी फिरत होती. गोव्यातही कार्य जोमाने चालले होते. दोन-तीन नावे सोडल्यास जवळजवळ गोव्यातील सर्वच कवी-कवयित्रींनी यात सहभाग घेण्यास सुरुवात केली होती. काहींनी आम्हाला मीडियाचे तंत्रज्ञान कळत नाही, काहींनी आम्हाला त्यात रस नाही.. असे सांगून माघार घेतली किंवा नकार दिला. म्हणून ही काव्यदिंडी थांबली नाही. याच दरम्यान मडगावातील युवा कवयित्री वैष्णवी पै काकोडे आणि श्रीया टेंगसे या दोघींना मी काव्यहोत्रात सहभागी होण्यास निमंत्रण पाठवले होते. त्या दोघींनी आपल्या काव्यसमीधा अर्पण केल्या. त्यातील वैष्णवी यांनी मडगावच्या पत्रकार, लेखिका, कवयित्री कविता आमोणकर यांचेे नाव सुचवले होते. तर कविताने मडगावच्या अनेक कवी-कवयित्रींना यात जोडून घेतले. एवढेच नव्हे तर कोकणी कवी म्हणून ओळख असलेल्या कवींनीदेखील आपल्या मराठी कविता या काव्यहोत्रात सादर केल्या. यात पणजीच्या अपर्णा भोबे यांनी आपली कविता सादर करून पुन्हा एक मैलाचा दगड पार केला. त्यांनी सुचवलेले नाव म्हणजे रूपाली मावजो किर्तनी ज्या अबुधाबीत राहतात. त्यांच्याशी मी संपर्क केला असता, त्यांनी आपण कविता सादर करणार असल्याचे सांगितले आणि तिथून ही काव्यदिंडी सातासमुद्रापार गेली. त्याच दरम्यान अमेरिकेच्या वर्षा सातपुते हळबे यांच्याशी संपर्क साधून यात सहभागी होण्यासाठी आवाहन केले होते. त्यांनी आपली कविता सादर करून काव्यदिंडी सातासमुद्रापार नेली. तसेच महाराष्ट्रात काव्यदिंडी पोचल्यावर प्रशांत वैद्य यांनीदेखील विदेशातील आपल्या असंख्य कवीमित्रांना जोडून घेतले.
हे सर्व चालले असताना, गोव्यात बर्‍यापैकी ओळखले जाणारे महाराष्ट्रातील ज्येष्ठ कवी शशिकांत तिरोडकर यांच्याशी मी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी अनेकांची नावे सुचविण्याबरोबरच महेश केळूसकर यांच्याशी संवाद साधण्याची कल्पना दिली. त्याप्रमाणे केळूसकरांशी बोलले असता, त्यांनी आपण तुम्हाला पूर्ण सहकार्य करू असे सांगून ए.के. शेख तसेच अनेक कवी-कवयित्रींचे फोन नंबर्स दिले. अशा तर्‍हेने ही काव्यदिंडी पुढे पुढे जाऊ लागली.

गदिमांच्या नातीचा सहभाग

या काव्यहोत्रात ग.दि. माडगूळकर यांची नात लीनता माडगूळकर-आंबेकर यांनीही सहभाग घेतला. यामुळे तिच्या समूहातल्या अनेक जणी या काव्यहोत्रात जोडल्या गेल्या. कवयित्री अंजली आमोणकर यांच्या भगिनी माया महाजन यांनी तर औरंगाबादहून कवी कवयित्रींची फळीच निर्माण केली. ज्यांनी कधी फेसबुकचा वापरही केला नाही, अशांनी स्वत:चे फेसबुक अकाउंट उघडून आपल्या कविता सादर केल्या. यात शैला मोहनापूरकर, रंजना बर्‍हाळे, निर्मला जोशी, सुनीता क्षीरसागर अशा अनेकांनी आपल्या कविता सादर केल्या. एके दिवशी मला उसगाव गोव्याहून एका सत्तरी ओलांडलेल्या सुरेखा देसाई नामक महिलेचा फोन आला. म्हणाल्या, गदिमांच्या नातीने देखील आपल्या काव्यहोत्रात सहभाग घेतला आहे, असे पेपरमध्ये वाचले. त्यांना यात सहभागी व्हायचे होते. परंतु फेसबुक अकाउंट नव्हता. परंतु त्यांच्या मुलाने मदत केली आणि मग तिची कविता सर्वांपर्यंत पोचली. असे कितीतरी किस्से या काव्यहोत्राच्या निमित्ताने अनुभवायला मिळाले. हेच तर या काव्याहोत्राचे यश होय.

मान्यवरांनी घेतली दखल

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सुविद्य पत्नी तथा गोवा भाजपा महिला मोर्चाच्या अध्यक्ष सौ. सुलक्षणा प्रमोद सावंत यांनीही आपल्याला भावलेली मराठी कविता सादर करून सहभागी कवी-कवयित्रींना शुभेच्छा दिल्या. तसेच गोव्याचे कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनीही सर्व सहभागी कवी-कवयित्रींना शुभेच्छा देऊन स्व. विष्णू वाघ यांची ‘घूमचे कटर घूम’ ही कविता सादर केली. महाराष्ट्र पोलिसांनी वर्दीत आपल्या कविता सादर करून या उपक्रमाचा संदेश सर्वांपर्यंत पोचविला. प्रशांत वैद्य यांनी सुचवलेले नाव म्हणजे, मुंबईचे ज्येष्ठ पोलीस नंदू सावंत ज्यांनी आपली फौजच या काव्यहोत्रात आणली आहे. एवढेच नव्हे तर या उपक्रमांतर्गत ते जनतेला संदेशही देतात.