काळ धोक्याचा; गरज उपाययोजनांची

0
138
  • शैलेंद्र देवळाणकर

२०१८ हे वर्ष काश्मीरसाठी आणि भारत – पाकिस्तानच्या संघर्षाच्या दृष्टीने अत्यंत घातक वर्ष ठरण्याची शक्यता काही सुरक्षा विश्‍लेषक आणि गुप्तहेर यंत्रणा वर्तवत आहेत. दुसरीकडे सीमापार गोळीबार करून घुसखोरांना पाकिस्तान सुरक्षाकवच देत आहे. या पार्श्‍वभूमीवर भारताने एका बाजूला पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर कोंडी करतानाच काऊंटर टेररिझम टेक्निक बळकट करण्याची गरज आहे.

सध्या पाकिस्तानपुरस्कृत सीमापार गोळीबार आणि दहशतवादी कृत्यांमुळे काश्मिरमध्ये अशांतता आणि तणाव निर्माण झाला आहे. सुंजवानमधील दहशतवादी हल्ला गेल्या ४० दिवसांमध्ये काश्मिरमध्ये सुरक्षा यंत्रणांवर दुसरा हल्ला आहे. गेल्या ३५ महिन्यांमधील हा तब्बल २०६ वा दहशतवादी हल्ला आहे. आता २०१८ हे वर्ष काश्मिरसाठी आणि भारत पाकिस्तानच्या संघर्षाच्या दृष्टीने अत्यंत घातक वर्ष ठरण्याची शक्यता काही सुरक्षा विश्‍लेषक आणि गुप्तहेर यंत्रणा वर्तवत आहेत. या आव्हानाला तोंड देण्यासाठी भारताला मानसिकदृष्ट्या आणि संरक्षणात्मक दृष्ट्या तयार रहावे लागेल.

यासंदर्भात आणखी एक प्रवाह दिसून येत असून तो चिंताजनक आहे. हा प्रवाह आहे दहशतवाद्यांना मिळणारे स्थानिकांचे समर्थन. २०१७ मध्ये साधारण ७१ तरुण हे दहशतवादी संघटनांमध्ये सामील झाल्याची माहिती पुढे आली असून हा आकडा गेल्या दहा वर्षातील सर्वाधिक आहे. यावरुन दहशतवादाला स्थानिकांकडून मिळणारे समर्थन किती मोठे आहे याची कल्पना येते. खास करून उत्तर काश्मिरच्या विशिष्ट जिल्ह्यातून दहशतवादाला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. तेथील तरुण दहशतवादी गटांमध्ये सामील होत आहेत. १९९०च्या दशकामध्ये जे तरुण दहशतवादी संघटनांमध्ये सामील व्हायचे त्यांच्यापेक्षा हा तरुण अधिक कट्टर आहे. हे चित्र धोकादायक असून एक प्रकारे ही धोक्याची घंटा आहे.

आता प्रश्‍न निर्माण होतो तो हा सर्व प्रकार २०१५ नंतर का वाढला? या सर्वांची कारणमीमांसा करणे आवश्यक आहे. ढोबळ मानाने याची चार कारणे पुढे येतात. २००३ मध्ये केलेल्या शस्त्रसंधी कराराचे उल्लंघन पाकिस्तान सातत्याने करत आहे. हे उल्लंघन अशा ठिकाणी होता आहे ज्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानातून दहशतवाद्यांची घुसखोरी होते आहे. याचा अर्थ सीमापार गोळीबार हा दहशतवाद्यांची ढाल आहे. घुसखोरांचा भारतातील प्रवास सुकर व्हावा यासाठी तो केला जात आहे. दहशतवाद्यांच्या प्रवेशासाठी सीमाभागातील सैन्याचे लक्ष गोळीबार करून विचलित करायचे अशी यामागची रणनीती आहे.

दुसरे कारण म्हणजे साधारणपणे सीमेवरील ज्या मार्गाने हे दहशतवादी आत घुसतात ते मार्ग बर्ङ्गवृष्टी मुळे बंद होतात. त्यामुळे आत शिरणे अशक्य होते. यंदा काश्मिरमध्ये तुलनात्मक दृष्ट्या बर्ङ्गवृष्टी कमी झाली आहे. त्यामुळेही घुसखोरांचे प्रमाण वाढलेले दिसते. तिसरे कारण म्हणजे २०१५ पासून पाकिस्तानने आपल्या पश्‍चिम सीमेवर तालिबान, हक्कानी समूहांच्या विरोधात झर्ब ए अज्ब नावाची लष्करी मोहिम उघडली आहे. यासाठी जवळपास ४० हजार पाकिस्तानी सैन्य नॉर्थ वेस्टर्न प्रोव्हिन्समध्ये ठेवण्यात आले आहे. पाश्‍चिमात्य राष्ट्रांकडून पाकिस्तानवर पश्‍चिम सीमेवर कारवाई करण्यासाठी नेहमीच दबाव आणला जातो. आताही अमेरिकेकडून असा दबाव आणला जाता आहे. अमेरिकेने पाकिस्तानची आर्थिक मदत बंद करण्याची धमकी दिली आहे. पश्‍चिम सीमेवर आणि अङ्गगाणिस्तान सीमेवर असा दबाव वाढतो त्या वेळेला जगाचे लक्ष पश्‍चिमेकडून पूर्वेकडे विचलित करण्यासाठी पाकिस्तान भारताबरोबरचा संघर्ष तीव्र करण्याचा प्रयत्न करतो. या माध्यमातून पाकिस्तानला अमेरिकेशी सौदेबाजी कऱण्याची संधी मिळते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते आणि अमेरिका त्यात मध्यस्थी करते.

परिणामी, जगाचे लक्ष पश्‍चिम सीमेरेेषेवरून कमी होते. हे यातील सर्वात महत्त्वाचे कारण आहे. त्यामुळेच सध्या पाकिस्तान भारत सीमेवर गोळीबार करत आहे.
चौथे कारण म्हणजे पाकिस्तानचे गेल्या तीन दशकांचे धोरण. भारतासोबतच्या कोणत्याही प्रश्‍नाचे आंतरराष्ट्रीयीकरण करण्याचे धोरण पाकिस्तानने अवलंबले आहे. त्यासाठी तीन प्रकारच्या माध्यमांचा वापर पाकिस्तान करत आहे. हा प्रश्‍न आंतरराष्ट्रीय परिषदांमधून व्यासपीठांवर मांडणे, त्यातून काहीही हाताशी न लागल्यास सीमापार दहशतवादाला चालना देणे आणि सीमापार गोळीबार करणे. त्यातही जाणीवपूर्वक सीमाभागातील गावाखेड्यातील सामान्य नागरिकांवर हल्ला केला जातो. ज्यावेळी सामान्य नागरिक मरतात तेव्हा परिस्थिती अत्यंत स्ङ्गोटक होते. या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याबाबत भारतात अंतर्गत दबाव वाढतो. याच दबावातून २०१६ मध्ये भारताने सर्जिकल स्ट्राईक केला होता. त्यामुळे भारताचा राग वाढावा आणि भारताने प्रतिक्रिया द्यावी, ही पाकिस्तानची इच्छाच आहे. तसे झाल्यास परिस्थिती स्ङ्गोटक बनते आणि जगाचे लक्ष पुन्हा काश्मिर सीमेकडे वळते. एक प्रकारे काश्मिरच्या प्रश्‍नाचे आंतरराष्ट्रीयीकरण होते.

भारताने सामना कसा करायचा?
पाकिस्तानकडून होणारा सीमापार गोळीबार आणि दहशतवादी हल्ले यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहेत. सर्जिकल स्ट्राईक नंतर पाकिस्तान असे धाडस करणार नाही अशी अपेक्षा होती; परंतू तसे काहीच घडले नाही. उलटपक्षी हल्ले वाढतच चालले आहेत. या हल्ल्यांमध्ये लष्कराचे जवान, सामान्य नागरिक, सुरक्षा अधिकारी मारले जात आहेत. पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले जात आहे हे वास्तव आहे; मात्र हल्ला होत नाही तेव्हा आपण या परिस्थितीकडे दुर्लक्ष करतो आणि हल्ला होतो तेव्हा प्रतिहल्ल्याच्या गोष्टी केल्या जातात. आताही भारताच्या संरक्षण मंत्री सीतारामन यांनी पाकिस्तानला धडा शिकवू असे वक्तव्य केले. पण भारताने टीट ङ्गॉर टॅट हे धोरण बदलून दोन प्रकारे याचा सामना केला पाहिजे. एकतर आंतरराष्ट्रीय स्तरावर दहशतवादाच्या प्रश्‍नावर पाकिस्तानची कोंडी कशी होईल हे पाहणे गरजेचे आहे. त्यामध्ये पाकिस्तान हा दहशतवादाची निर्यात करणारी ङ्गॅक्टरी आहे हे जगाला ठामपणे पटवून दिले पाहिजे. भारत तसा प्रयत्न करत आहे आणि जगाला हळूहळू हे पटतही आहे. याचाच परिपाक म्हणजे अमेरिकेने पाकिस्तानची आर्थिक मदत बंद करण्याची घोषणा केली आहे. जगातील मोठे दहशतवादी पाकिस्तानच्या आश्रयाला आले आहेत हे देखील आता स्पष्ट झाले आहे. त्यातील अनेक जणांवर अमेरिका, संयुक्त राष्ट्र संघटनेने बंदी घातली आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर पाकिस्तानला अलिप्त करण्यासाठी भारताने प्रयत्न केले पाहिजेत जेणेकरुन पाकिस्तानवर दबाव वाढेल. दुसरा उपाय म्हणजे भारताची दहशतवाद विरोधी यंत्रणा बळकट करावी लागणार आहे. काऊंटर टेररिझम स्ट्रक्चर हे बळकट करावे लागणार आहे. पाकिस्तानात लोकनियुक्त सरकार सत्तेत असले तरी तेथे लष्कराचा दबदबा आहे. तिथे लोकशाही स्थिरावत नाही तोपर्यंत काश्मिरमध्ये अशा स्वरुपाची अशांतता निर्माण करणे हे प्रयत्न सुरुच राहाणार आहेत. त्यामुळे भारताने या दृष्टीने वेळी पावले उचलणे गरजेचे आहे. सजग राहणे गरजेचे आहे.