काळवीट शिकार प्रकरणी सलमान दोषी

0
151

>> पाच वर्षांची शिक्षा, सहकार्‍यांची निर्दोष सुटका

>> जामीन अर्जावर आज न्यायालयात सुनावणी

दोन दशकांपूर्वीच्या काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानसाठी धक्कादायक निकाल आला असून जोधपूर न्यायालयाने या प्रकरणी दोषी ठरवत ५ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच १० हजार रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे. जोधपूर ग्रामीण जिल्हा मुख्य न्यायदंडाधिकारी देवकुमार खत्री यांनी हा निकाल दिला. सलमानला याप्रकरणात पाच वर्ष तुरुंगात जावेच लागले तर त्याला एक हजार कोटींपेक्षा अधिक नुकसान सोसावे लागणार असून बॉलिवूडला ४०० ते ६०० कोटींचा फटका बसणार आहे. दरम्यान, ही शिक्षा ३ वर्षांपेक्षा अधिक कालावधीची असल्याने सलमानला जामीन देण्यास दिवाणी न्यायालयाने नकार दिला आहे. आज सकाळी साडेदहा वाजता त्याच्या जामिनावर सुनावणी होणार आहे. त्यामुळे बॉलिवूड ‘टायगर’ला जोधपूर मध्यवर्ती कारागृहात रात्र काढावी लागणार आहे.

काळवीट शिकार प्रकरणी सलमानसोबत आरोपी असलेले सैफ अली खान, नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे या चार सिनेकलाकारांची न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे. त्यांना संशयाचा फायदा देत न्यायालयाने निर्दोष सोडले आहे. सलमानला कमीत कमी शिक्षा व्हावी यासाठी त्याचे वकील प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. पण सकाळी दोषी ठरवल्यानंतर न्यायालयाने त्याला ५ वर्षांची शिक्षा सुनावली.
सकाळी सुनावणी सुरू होताच सर्वप्रथम सलमान खानला त्याच्यावर ठेवण्यात आलेले आरोप मान्य आहेत का, असे विचारण्यात आले. पण त्याने सर्व आरोप फेटाळले. सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे, नीलम या कलाकारांनीही त्यांच्यावरील आरोप फेटाळले होते. मात्र, सलमानला या प्रकरणी दोषी ठरवण्यात आले, तर सलमानला शिकारीसाठी प्रोत्साहन दिल्याचा आरोप असलेल्या अन्य कलाकारांना दोषमुक्त करण्यात आले.

केव्हा झाली होती शिकार
१९९८ मध्ये ‘हम साथ साथ हैं’ या चित्रपटाचे जोधपूरमध्ये चित्रीकरण झाले होते. त्यावेळी आरोपी सलमान खान आणि इतर आरोपी घोडा फार्म हाऊस येथे थांबले होते. भवाद गावात २७-२८ सप्टेंबरच्या रात्री त्यांनी काळविटांची शिकार केली होती. यानंतर कांकणी गावात १ ऑक्टोबर रोजी आणखी २ काळविटांची शिकार केल्याचा आरोप झाला होता. शिकार झाली तेव्हा सलमानच्या गाडीत अभिनेत्री नीलम, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि अभिनेता सैफ अली खानही होता.

…आणि बहिणींना रडू कोसळले!
काळवीट शिकार प्रकरणी काल अंतिम सुनावणी होती. सकाळी कोर्टात दाखल झाल्यापासूनच सलमानच्या चेहर्‍यावर तणाव स्पष्ट दिसत होता. न्यायमूर्ती कोर्टरूमध्ये येताच तो खुर्चीवरून उठून भिंतीला टेकून उभा राहिला. दोन्ही बहिणी सलमानसोबत होत्या. न्या. खत्री यांनी सलमानला ५ वर्षे कैद आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. शिक्षा वाचली जात असतानाच सलमानचे डोळे भरून आले. त्याला पाच वर्षांची कोठडी सुनावल्यावर त्याच्या बहिणी त्याच्या गळ्यात पडून रडू लागल्या. निर्णयाची माहिती मिळताच बिष्णोई समाजाने घोषणाबाजी केली आणि निर्दोष सुटलेल्यांविरोधात वरिष्ठ न्यायालयात अपील करणार असल्याचे सांगितले.

सलमान कैदी नं. १०६
काळवीट शिकारप्रकरणी सलमानला न्यायालयाने जामीन नाकारल्याने पोलिसांनी त्याला अटक केले. कालची रात्र त्याला जोधपूर मध्यवर्ती कारागृहात काढावी लागली. सलमानने तुरुंगातील जेवण नाकारले. त्याला कैदी नंबर १०६ देण्यात आला असून तुरुंगातला पोशाख आज देण्यात येणार आहे. त्याच्या जामीन अर्जावर आज सकाळी साडेदहा वाजता सुनावणी होणार आहे. सलमानला कारागृहातील ज्या बराकीत ठेवण्यात येणार आहे त्याच बराकीत बलात्कार प्रकरणात आरोपी असलेले आसाराम बापूही आहेत. सलमानला धमकी देणारा गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई देखील त्याच तुरुंगात आहे.