काळजी घ्या चेहर्‍याची?

0
313
  •  डॉ. सुरज स. पाटलेकर
    (अध्यापक, गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय)

आपल्या दैनंदिन आयुष्यात चेहरा व त्याची निगा राखणे खूपच महत्त्वाचे आहे. कारण चेहर्‍यावरुनच त्या मनुष्याची इतरांवर योग्य छाप तयार होते. जर चेहरा हसरा, प्रसन्न नसेल तर मग इतर सर्वच गोष्टी कठीण होऊन बसतात. आपण खरच काळजी घेतो का चेहर्‍याची? फक्त मेक-अप करणे म्हणजे काळजी घेणे नव्हेच!

‘ऍक्ने’ यालाच मराठीत पुरळ येणे, मुरमाचे फोड, युवानपिडका किंवा यौवनपीटिका (तारुण्यात जास्त प्रमाणात येत असल्याकारणाने), मुखदूषिका (मुखावरची दुष्टी करणारे असल्याने) अशा कित्येक नावांनी ओळखले जाते.

ऍक्ने’ यालाच ‘क्ने वल्गॅरिस’ असेही म्हणतात. ही एक जीर्ण अवस्था आहे ज्यामध्ये मृत झालेल्या त्वचेचा भाग आणि त्वचेतील तेलकट पदार्थ हे केसाच्या मुळामध्ये (रोमकूप) अवरोध निर्माण करतो. आयुर्वेदानुसार वातदोष, कफदोष, रक्त आणि मेद धातूंची दुष्टी या सर्वाला कारणीभूत असते.

ऍक्नेमध्ये ‘ब्लॅकहेड्स’ (हे त्वचेवरचे लहान उंचवटे आहेत ज्यांचे मुख किंवा जे वरून काळ्या रंगाचे दिसतात व आत काळा चिकट पदार्थ असतो); ‘व्हाईटहेड्स’ (सफेद रंगाचे मुख असलेले व आत सफेद चिकट पदार्थ असतो), ‘पिंपल्स’, तेलकट त्वचा यांसारख्या तक्रारी असतात.

प्रत्येक रोमकूपामध्ये एक केस व ‘सिबम’ नावाचे चिकट तेलकट पदार्थ तयार करणारे ‘सिबॅशियस ग्रंथी’ असतात. हे तेल त्वचेला मऊ व गुळगुळीत ठेवते. आणि हेच सिबम जर रोमकूपाच्या मुखामध्ये साठून, तेथे जर अवरोध उत्पन्न करेल तर त्याचे रूपांतर ऍक्नेमध्ये होते. मनुष्यांमध्ये सिबॅशियस ग्रंथी संपूर्ण त्वचेवर असतातच पण त्या जास्त प्रमाणात चेहरा (गाल, नाक, कपाळ), डोक्यावर, छाती व पाठीच्या वरील भागावर आढळतात (हाताचे व पायाचे तळवे सोडून).
सामान्यतः १२ ते २५ ह्या वयोगटामध्ये हा विकार जास्त प्रमाणात दिसून येतो. म्हणजेच यौवन अवस्था ज्यावेळी सुरुवात होते तेव्हापासून. शक्यतो ५ ते १० वर्षे हा त्रास तसाच राहू शकतो. ज्यांची त्वचा नेहमी तेलकट असते त्यांच्यामध्ये ह्या विकाराची लक्षणे अधिकच दिसून येतात. यात प्रभावित क्षेत्रात आरक्तवर्णता (लालसर), दाह (जळजळ), वेदना होणे व नंतर त्या ठिकाणी पू/पूय उत्पत्ती होऊन त्या फुटून व्रण होतो व त्यातून स्राव देखील येतो.
– सौम्य अवस्थेत मुखदूषिकेच्या आत सफेद किंवा काळ्या रंगाचे सिबम याचा अवरोध होऊन ब्लॅकहेड्स व व्हाईटहेड्स तयार होतात.
– मध्यम अवस्थेत पिंपल्स तयार होतात (जे बारीक मुगाच्या आकाराच्या पुळ्या असतात).
– तीव्र अवस्थेमध्ये याचे रूपांतर मोठे फोड ज्यात पू तयार होतो आणि ते घट्ट होतात.
आनुवंशिकता हे ८०% रुग्णांमध्ये प्रमुख कारण आहे. तसेच यौवनावस्था ज्यावेळी सुरू होते, त्यावेळी स्त्री व पुरुष दोघांमध्येही त्यांच्या शरीरामधील ‘ऍन्ड्रोजन’ नावाचे संप्रेरक हे सिबॅशियस ग्रंथींना उत्तेजित करून मर्यादेपेक्षा जास्त, अति प्रमाणात सिबम तयार करण्यास भाग पाडते आणि हेच मुखदूषिकेला कारणीभूत ठरते.(हे प्रमाण त्याअगोदरच्या बाल्यावस्थेत दिसून येत नाही हे विशेष). तरुण वयात मुखदूषिका होणे यामुळे चेहरा नेहमीच त्रस्त, चिंतित असणे, आत्मविश्वास कमी होणे/गमावणे आणि तीव्र, जुनाट प्रकारात औदासिन्यता (डिप्रेशन) आणि त्यामुळे आत्महत्येचे विचार मनात येतात.
हीच अवस्था मासिक पाळी ज्यावेळी पहिल्यांदा चालू होते (मेनार्क) व त्यानंतर प्रत्येक मासिक पाळीच्या वेळेस(मेन्स्ट्रूअल सायकल) सुद्धा होते. टेस्टोस्टेरॉन, डायहायड्रो-टेस्टोस्टेरॉन (डीएचटी), डीहायड्रोएपीऍन्ड्रोस्टेरॉन (डीएचईए) हे ऍन्ड्रोजन होर्मोनचेच प्रकार आहेत जे मुखदूषिकेमध्ये समाविष्ट असतात. ग्रोथ होर्मोंस (जे शरीराची वाढ घडवितात व पुनरुत्पादनासाठी उपयुक्त ठरतात) व इन्सुलिन हेदेखील तेवढेच कारणीभूत ठरतात. कारण संशोधनात हेही आढळून आले आहे की या सर्व होर्मोंसची जर शरीरामध्ये कमतरता असेल तर मुखदूषिका हे वरील उल्लेखीत अवस्थेत कमीच होते किंवा होतच नाही.

गरोदरपणामधील पहिल्या किंवा दुसर्‍या त्रैमासिक (फर्स्ट आणि सेकंड ट्रायमीस्टर)मध्येसुद्धा ह्याच ऍन्ड्रोजनच्या अतिउत्तेजनामुळे मुखदूषिका होण्याचे प्रमाण वाढते.
पॉलीसिस्टीक ओव्हॅरीयन सिंड्रोम(पीसीओएस) ह्या स्त्रियांमध्ये होणार्‍या व्याधीमध्ये अंडाशय हे अतिमात्रेत ऍन्ड्रोजन(टेस्टोस्टरोन) तयार करते. सगळ्याच होर्मोनल ऍक्ने असणार्‍या व्यक्तींमध्ये, ऍन्ड्रोजन वाढलेलेच असणार असेही नाही.

ह्याव्यतिरिक्त आपल्या ज्या चुकीच्या सवयी आहेत… ज्यामुळे मुखदूषिका होतात त्या बदलणे खूप गरजेच्या आहेत. आपण उशी (पिल्लो कव्हर्स), चादर, घोंगडी (ब्लँकेट), आच्छादनासारखे इतर ज्या झोपण्यासाठी वापरतो त्या मळलेल्या जर असतील तर त्यामुळे सुद्धा मुखदूषिका होऊ शकतात. याचे कारण म्हणजे त्वचेवरील तेल, कोंडा व केश हे त्या गोष्टींवर लागून उरते (विशेषतः उशीवर) आणि हेच जर त्वचेच्या संपर्कात आल्यास त्वचेवर दाब पडून तेथे अवरोध होतो व मुखदूषिका उत्पन्न होतात. त्याव्यतिरिक्त इन्फेक्शनसुद्धा त्वचेमध्ये पसरते. तेथे बारीक/सूक्ष्म जिवाणू (मायक्रोब्स) देखील असू शकतात. म्हणूनच उशी इत्यादी स्वच्छ ठेवावीत, बदलावीत व मळल्यास लगेच धुवायला टाकावीत. जर रोज वापरात असतील तर प्रत्येक आठवड्याला किमान १ ते २ वेळा धुवावीत.

बाकीच्या गोष्टी आहेतच महत्त्वाच्या पण आपल्या दैनंदिन आयुष्यात चेहरा व त्याची निगा राखणे खूपच महत्त्वाचे आहे. कारण चेहर्‍यावरुनच त्या मनुष्याची इतरांवर योग्य छाप तयार होते. जर चेहरा हसरा, प्रसन्न नसेल तर मग इतर सर्वच गोष्टी कठीण होऊन बसतात. आपण खरच काळजी घेतो का चेहर्‍याची? फक्त मेक-अप करणे म्हणजे काळजी करणे होत नाही. घाम आल्यावर चेहरा लगेच धुवावा व पुसावा. खास करून घरीकाम करणार्‍या महिलांनी योग्य काळजी घ्यावी कारण त्या सतत चूल, शेगडी, आगीच्या संपर्कात असतात आणि यामुळे सतत घाम येणे हे साहजिकच असते. चेहरा स्वच्छ धुवावा. चेहरा हा भरपूर नाजूक असतो.

आंघोळ करीत असतानासुद्धा अगोदर केश व मुख (चेहरा) स्वच्छ करावेत व नंतरच इतर शरीर स्वच्छ करावे. मग ते साबणाने असेल किंवा बॉडी-वॉश ने. याचे कारण असे की अगोदर जर शरीर स्वच्छ केले आणि चेहरा नंतर केला तर तेथील जिवाणू व इतर दुष्टी ही चेहर्‍याला लागेल आणि मुखदूषिका होण्याची संभावना वाढेल. अन्य शरीर स्वच्छ करीत असताना ते हात चेहर्‍याला व केसाना लावू नयेत.
चांगले दिसण्यासाठी जो मेक-अप केला जातो त्याचे पण कित्येक दुष्परिणाम दिसून येतात. त्वचेला अनेक सूक्ष्म छिद्र असतात ज्यामधून त्वचा श्वासोश्वास करत असते. पण आजकाल सौंदर्य वाढवण्याच्या नादात अशी अनेक सौंदर्यप्रसाधने वापरली जातात जेणेकरून ही छिद्रे बंद केली जातात- जशी की प्रायमर, फाउण्डेशन, कन्सीलर इत्यादी. काळाची गरज असते- हे सुद्धा मान्य. ह्या गोष्टी वापरल्याने त्वचेचा रंग निखरतो पण अत्याधिक प्रमाणात ज्यावेळी वापरतो त्यावेळी आपण यासोबतच त्वचेच्या प्राकृत कर्माला आळा घालतो आणि तेथील घाम बाहेर न येता आतच साठवून राहतो. हेच मुखदूषिकेला कारण होऊ शकते. तसेच चुकीचे, नकली सौंदर्य प्रसाधने वापरल्याने त्यांची ऍलर्जी होऊन मुखदूषिका होऊ शकते.
औषधांची ऍलर्जी, एखाद्या खाण्याच्या जिन्नसाची – अन्नपदार्थाची ऍलर्जी
जसे मच्छी-खेकडे, झिंगे, इतर शेलफिश इत्यादी… हे लेगीत मुखदूषिकेला कारणीभुत ठरू शकते. चेहर्‍यावरची मुरुमे/पिंपल्स नेहमी हाताने/नखाने फोडत बसू नये. इन्फेक्शन तर होईलच त्याशिवाय व्रण होऊन काळे डागही पडतील व राहतील. त्यामुळे त्वचा काळपट होईल.
आयुर्वेदानुसार दोष व धातूंची दुष्टी (तसे करणार्‍या आहार सेवनाने व विहार घडल्याने) मुखदूषिका होतात. त्रास जर अधिकच होत असतील तर योग्यवेळी तज्ञ वैद्यांचा सल्ला घेणे आवश्यक. आभ्यंतर औषधांव्यतिरिक्त काही विशिष्ट औषधी द्रव्यांचे लेप फायदेशीर ठरतात. कडू, तिखट, खारट चवीचे पदार्थ, जळजळ करणारे पदार्थ खाणे टाळावेत. मुखाला सकाळची तोंडातील पहिली लाळ लावणे सारखे ग्रामीण उपचार करू नयेत.