काले येथे मित्राचा ठेचून खून

0
92

>> संशयित आरोपीला अटक

खुटकरवाडा, काले येथे दारूच्या नशेत दोघा मित्रांमध्ये झालेल्या भांडणावेळी निखिल कोलू (४०, मूळ झारखंड) याचा दंडुक्याने ठेचून खून करण्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी विनोद विठोबा खुटकर (४२) रा. खुटकरवाडा, काले याला संशयावरून कुडचडे पोलिसांनी अटक केली आहे.
कुडचडे पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक रवींद्र देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आरोपी विनोद व मयत निखिल हे दोघे विनोद याच्या घरात एकत्र राहत होते. रोजंदारीचे काम करून रात्री दारू पिणे हा दोघांचा दिनक्रम होता. काल रात्रीही दोघे दारू पिण्यास बसले होते. त्यानंतर दोघांमध्ये वाद होऊन त्याचे पर्यावसान मध्यरात्री खूनात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. काल सकाळी ८.२० वा. आरोपी खुटकर याच्या घरासमोर निखिल याचा मृतदेह नग्नावस्थेत असल्याची माहिती कुडचडे पोलिसांना दूरध्वनीवरून मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता कोलू नग्नावस्थेत होता. तसेच त्याने संडासही केला असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याच्या अंगावर अनेक जखमा होत्या. त्याच्यावर दंडुक्याने वार केल्याचे स्पष्ट झाले आहे. शेजार्‍यांनी या दोघांमध्ये भांडण झाले होते असे सांगितल्याने संशयावरून आरोपीला अटक करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयात सादर केल्यानंतर त्याला रिमांड देण्यात आला. त्यानंतर त्याला वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात आले.