कार्यशाळा, शिबिरे लाभदायी

0
337

– प्रा. रामदास केळकर

विविध कार्यक्रम, शिबिरे, कार्यशाळा ह्यातून आपल्याला असे खाद्य मिळत असते त्यातून जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन आपल्याला गवसतो. पुस्तकांचे वाचन असो, एखादा चित्रपट असो त्यातून प्रेरणा घेत असताना कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायला विसरू नका. आपल्या मनाची मरगळ दूर करण्यासाठी असे कार्यक्रम म्हणजे मनाला मिळणारे टॉनिक!

मुंबई पुण्याप्रमाणे आता गोव्यातही विविध विषयावरील शिबिरे, कार्यशाळा, व्याख्याने होत आहेत ही आशादायक गोष्ट आहे. ह्या कार्यकर्मांचा लाभ अधिकाधिक विद्यार्थ्यांनी घेतल्यास आपापल्या व्यक्तिमत्वाला पोषक अशा गोष्टी त्यातून घडत जातील. ह्या कार्यक्रमांचे विषय विविध असतात. आपल्याला आवडणार्‍या विषयाच्या कार्यक्रमात आपण सहभागी व्हावे. ह्यामध्ये दोन प्रकार तुम्हाला आढळतील एक म्हणजे ठराविक रक्कम भरून सहभागी होणे आणि दुसरी मोफत. रक्कम भरून आपल्या आवडीच्या कार्यक्रमात सहभागी झाल्यास तिथे जास्त लाभ मिळण्याची शक्यता. आपल्या अभ्यासक्रमात साचेबंध गोष्टींचा अंतर्भाव केल्याने आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी आपल्याला शाळाबाह्य उपक्रमांवर जास्त भर द्यावा लागतो. हे उपक्रम विद्यार्थी, उद्योजक, पालक आदींना निश्चितच लाभदायी ठरणारे असतात.
आरंभी मिळेल त्या कार्यक्रमांना जाण्याची सवय लावावी. त्यानंतर तुमची आवड काय आहे हे तुम्हाला लक्षात येईल.. हा पोक्तपणा आला की नंतर त्या विषयानुरूप कार्यक्रमाला जाण्याचे स्वातंत्र्य घ्यावे. पण वक्तृत्व, कथाकथन, सूत्रसंचालन यांसारख्या विषयात आवड नसली तरी जरूर जावे, कारण इथे कसे बोलावे… सभाधीटपणा… आवाजाची पट्टी कशी राखावी… भावना व्यक्त करताना संवादाचा बाज कसा राखावा…आदींचे निदान मार्गदर्शन तरी मिळते. ह्याशिवाय विविध विषय कानांवर पडतात.
शिक्षकी पेशात असलेल्यांना तर असे कार्यक्रम म्हणजे पर्वणीच. व्यक्तिमत्व विकासावर गोव्यात ठिकठिकाणी कार्यशाळा, शिबिरे आयोजित केली जातात. त्यात वयोगटाचे बंधन नसेल तर खुशाल त्यात सहभागी व्हावे. त्यात सूत्रधार तुमच्याकडून विविध खेळ घेत असतो, नवीन नवीन कोडी तुम्हाला सोडवायची संधी मिळते. एकूण काय तर जीवनाकडे व्यापक दृष्टीने बघण्याची संधी ह्यातून मिळत जाते. ह्या कार्यशाळा विद्यार्थी वयोगटात खूपच आवश्यक असतात. आजकाल समस्यांना आपणाला सामोरे जावे लागते. अशांवर उत्तरं शोधण्याचा प्रयत्न फार थोडे करू पाहतात. आपल्याकडे रस्ता प्रथम त्यानंतर त्यामुळे आलेल्या समस्यांचा विचार करण्याची विचित्र पद्धती आहे. ह्यातून वेळ फुकट जातोच शिवाय पैशांची नासाडी होते ती वेगळीच. त्याऐवजी कार्यशाळा आयोजित करून समस्या आणि त्यावर उपाय ह्यावर साधक बाधक चर्चा घडवून आणल्यास कितीतरी प्रश्न निर्माण होण्यापूर्वीच नाहीसे होतील.
एका कार्यशाळेत कावळ्याचे मडक्यातील पाणी पिण्याचे जुने तंत्र चित्रातून दाखविले गेले. आता कावळा आधुनिक झालेला आहे तो आपल्या समस्येकडे नव्या दृष्टीतून कसा पाहतो? हे दाखविण्यासाठी दुसरे चित्र दाखविले गेले. त्यात कावळा चक्क स्ट्रॉच्या मदतीने पाणी पीत असल्याचे दाखविले होते. ह्यानंतर कार्यशाळेत समस्यांकडे कसे पाहता येते? .. ह्यावर सुंदर विवेचन केले गेले. शाळकरी विद्यार्थ्यापासून ते गृहस्थाश्रमी माणसापर्यंत समस्या पाचवीला पुजलेल्या. त्या दूर करण्यासाठी काहीवेळा आपल्याला इतरांची मदत घ्यावी लागते, सल्ला घ्यावा लागतो तर काहीवेळा आपल्याआपण अनुभवाच्या जोरावर म्हणा की स्वत:ला सुचलेल्या उपायाने त्या दूर करतो. काहीवेळा चक्क दुर्लक्षित करून काळावर सोडून देतो. काहीही असो समस्या ही असतेच. शाळेत जाणार्‍यांची खात्रीची समस्या असते अभ्यास लक्षात राहत नाही, एकाग्रता जमत नाही, एखाद्या विषयाची भीती वाटते, इत्यादी, पण सरावाने ह्या गोष्टी सहज शक्य आहे हे आपल्या लक्षात येते.
कार्यशाळेत जे शिकविले गेले त्यानुसार आपण आपली समस्या कोणती आहे, हे प्रथम लिहून घ्या. त्यावर तुम्ही शोधलेला उपाय कोणता? जर त्याने काही होत नसेल तर अनुभवी माणसाकडून सुचविलेला उपाय पडताळून घ्या. उदा. एखाद्याचा पहाटेला अभ्यास होत नसेल त्याने आपली अभ्यासाची वेळ बदलावी. घरी गोंगाट असेल, शेजारी पाजारी गडबड असेल तर अन्यत्र जाऊन अभ्यास करावा. एकूण काय तर उजळणीचे तंत्र बदलून त्यावर उपाय शोधावा. ही पद्धत कुठल्याही पदावरील व्यक्तीला उपयुक्त ठरेल. समस्येला सामोरे गेल्याशिवाय तुमच्यातील क्षमता, कौशल्ये तुम्हाला कशी कळतील… हा त्यामागचा प्रमुख उद्देश. ह्यावेळी सहभागी मंडळीनी गटवार एखादी समस्या शोधायची व त्यावर चर्चा करून उपायही सुचवावेत. आमच्या गटाला मी एक समस्या सुचविली. एका लहान मुलाचा प्लॅस्टिकचा चेंडू रित्या बेरलमध्ये पडलेला आहे तो त्याला काढायचा आहे. बेरल आडवा करण्याइतपत मुलाची शक्ती नाही तो घरी एकटाच आहे. एक उपाय होता तो म्हणजे शेजारी जाऊन कुणाची तरी मदत घेणे पण शेजारी कुणी नसेल तर?… मग एकाने पर्याय सांगितला. त्याने नळाच्या तोटीला पाईप लावून पाणी बेरल मध्ये भरावे. जसजसे पाणी भरेल तसतसा त्याचा चेंडू वरती येईल.
सूत्रधाराने प्रत्येक गटाच्या समस्या व त्यावरचे उपाय ह्यावर साधकबाधक चर्चा करून समस्या सोडविण्याचे तंत्र सांगितले.
१) प्रयत्न करणे ः समस्या असणारच पण त्यावर उपायही असतोच. त्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे. ‘शोधा म्हणजे सापडेल’ हे सूत्र ह्यामध्ये महत्वाचे. एखाद्या इमारतीच्या खोलींच्या अनेक चाव्या असतात. त्या एकसारख्या असतात. तो पटकन शोधण्यासाठी आपण नाही का त्यावर क्रमांक चिटकवत! बाजारातून अनेक वस्तू आणायच्या वेळी आपण आठवणीसाठी सामानाची यादी बरोबर नेत नाही का? कोळीष्टक करणार्‍या कोळ्याने पराभूत होत असलेल्या राजाला आपल्या सातत्याने करत असलेल्या प्रयत्नाने प्रेरणा दिली व तो राजा लढाई जिंकला!
२) निरीक्षण करणे : एखाद्या समस्येचे उत्तर केवळ निरीक्षणातून होऊ शकते. शास्त्रज्ञांनी अनेक प्रयोग केले आहेत व त्यावर आधारित निष्कर्ष मांडले आहेत. कोव्हर नावाच्या एका मानस शास्त्रज्ञाने सुलतान नावाच्या माकडावर एक प्रयोग केला. एका पिंजर्‍यात त्याला बंदिस्त करून मध्यभागी पिंजर्‍याच्या छतावर केळी टांगली. सुलतानला केळी प्रिय. ती तो खाण्यासाठी हात वर करायचा पण केळी काही हाती गवसत नव्हती. त्या पिंजर्‍यात बाजूलाच खोकी ठेवलेली होती. त्याने ती खोकी एकावर एक रचून केळ्यावर यथेच्च ताव मारला. माणूस असता तर तो अन्य पर्यायांचाही निरीक्षण करून केळी मिळविण्यासाठी वापर केला असता. पूर, भूकंपासारख्या संकटात केवळ निरीक्षणाने अनेकांनी आपले तसेच इतरांचे प्राण, मालमत्ता वाचविलेली आहे.
३) आधुनिक तंत्राची मदत घेणे : एटीएममधून रोख रक्कम काढण्याची नामी सोय उपलब्ध झाली आहे. आता बँकेच्या वेळेसाठी सुट्टी आहे म्हणून प्रतीक्षा करत राहायची गरजच राहिले नाही. पण चोरट्यांनी ह्यावरही डल्ला मारायचा सोडला नाही. त्यातून सीसीटीवि कॅमेरा लावण्याचे तंत्र विकसित झाले. खोट्या नोटा ओळखण्यासाठी यंत्र आली. गुन्हेगारांना शोधण्यासाठी पोलिसांना अशी आधुनिक यंत्रेच उपयोगी पडतात. मोबाइल हरविल्यास विशिष्ट सॉफ्टवेअरच्या मदतीने त्याचे ठिकाण शोधता येते. तसेच निनावी फोनचाही मोबाइलवरून शोध काढता येतो. क्लिष्ट, धोकादायक समस्या दूर करण्यासाठी आता रोबोट तयार करण्यात आले आहेत. हा आधुनिक तंत्राचा आविष्कार समस्या सोडविण्याचा आधुनिक मार्गच नव्हे का?
४) इतरांची मदत घेणे : हा एक पारंपारिक पर्याय समस्या सोडविण्यासाठी वापरला जातो. एखादी वस्तू, वाहन हरवले किंवा व्यक्ती हरवली तर आपण आसपासच्या, त्या ठिकाणच्या लोकांकडे चौकशी करतो, त्याचे वर्णन करतो. ह्यातून काहीतरी सुगावा लागण्याची शक्यता असते. अपघाताच्या वेळी तर अशा चौकशा खूपच लाभदायी ठरतात. चौकशी योग्य पद्धतीने होत गेल्यास मागोवा घेणे कठीण होत नाही.
ह्या सर्वासाठी नियोजन अतिशय महत्वाचे. आपल्या अभ्यासात असो की दैनंदिन कार्यक्रमात नियोजन असेल तर आपली कामे सुरळीत होऊन जातात. समस्या निवारणात म्हणूनच त्याला अग्रक्रम दिलेला आहे. समस्या कोणती? ती उद्भभवण्याचे नेमके कारण काय? त्यावेळची नेमकी परिस्थिती काय होती? ह्या प्रश्नांची उत्तरे शोधत शोधत आपण त्या समस्येच्या मुळापर्यंत जाऊ शकतो. काही समस्या खरोखरच कठीण असतात, काही सहजपणे उलगडणार्‍या असतात. काही समस्यांना काळ हेच औषध ठरते. समस्येशिवाय मानव नाही. त्या असल्याशिवाय जीवनात मजाही नाही. आपण दुसर्‍यांची मदत घ्यावी, तसेच दुसर्‍यांना मदत करण्यासाठी तत्परतेने जावे हा समस्येच्या असण्यामागे नियतीचा डाव नसेल ना? आपल्याला दिलेल्या बुद्धीचा, शक्तीचा दोन हातांचा आपण समस्या, अडचणी दूर करण्यासाठी उपयोग करावा हेच त्यामागे सूचित होत नाही का? ऐन तारुण्यात, कोमल वयात एखादा युवक, युवती आत्महत्या करायला धजावते तेव्हा दु:ख होते. असली कसली न सुटण्यासारखी समस्या त्यांना भेडसावत असावी? ह्या मंडळीची पहिली समस्या असते प्रेम, जाती बाह्य संबध, घरून विरोध, ई. आजारपणामुळे कंटाळून जीव संपवून जाणारे. जगात एकही अशी समस्या नसेल ज्याला उत्तर नाही. जगात विविध समस्यांना लीलया पेलत अनेक थोर पुरुषांनी आपल्याला मार्ग दाखविला. किती नावे घ्यावी? त्यांचे कार्य सहजगत्या घडलेले नाही… पण हे आपल्याला केव्हा सुचेल.. जेव्हा प्रयत्न करू तेव्हाच ना! आपण आपले मन मरगळलेल्या अवस्थेत ठेवतो म्हणून अशी आपत्ती येते. रणांगणात झुंजणारा शूर सैनिक त्याला तर समस्यांना समोर ठेवूनच कालक्रमण करावे लागते. कधी कधी तर एकट्यालाच भिडावे लागते. शहीद होणे ह्यात तो धन्यता मानतो. त्यांचे आदर्श आपल्यासमोर असताना आपण समस्यांपासून दूर का पळायचे? गेह्लोर बिहारचा दशरथ मांझी आठवतो का? तो ज्या परिसरात राहायचा तो परिसर चहुबाजूनी खडकाळ डोंगरांनी वेढलेला. जवळच्या शहरात जाण्यासाठी चक्क ७० की मी अंतर कापावे लागे. ह्याच डोंगरावर काम करणार्‍या दशरथला जेवण घेऊन जाणारी त्याची प्रिय पत्नी फाल्गुनीदेवी एकदा आजारी पडते. तिला दूरवरच्या अंतरावरून नेताना वाटेतच तिचा प्राण जातो. जवळचा रस्ता असता तर..! कदाचित तिचे प्राण वाचले असते. आता तक्रार कोणाकडे करून काय फायदा. पण दशरथने आपल्या प्रिय पत्नीचे दु:ख बाजूला ठेऊन इतरांवर अशी परिस्थिती येऊ नये म्हणून डोंगरातून जवळचा रस्ता खोदायचा एकहाती निश्चय केला. गावकरी त्याच्या ह्या कल्पनेला हसायचे, त्याला वेड्यात काढायचे. पण ह्या पठ्‌ठ्याने कुणाच्या मदतीची, टीकेची पर्वा न करता २२ वर्षे लागून रस्ता पूर्ण करून गावाची समस्या कायमची दूर केली. एक प्रकारे आपल्या फाल्गुनीला तो समर्पित केला. त्याचा यथोचित सन्मानही झाला. ह्या वर्षी (१९१६) झालेल्या पॅरा ऑलिम्पिकमध्ये दीपा मलिक ह्या दिव्यांगनेने आपल्या आरोग्याशी झुंजत खेळात प्राविण्य मिळवून पदक मिळविले. अशी कैक उदाहरणे देता येतील.
विविध कार्यक्रम, शिबिरे, कार्यशाळा ह्यातून आपल्याला असे खाद्य मिळत असते त्यातून जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन आपल्याला गवसतो. पुस्तकांचे वाचन असो, एखादा चित्रपट असो त्यातून प्रेरणा घेत असताना कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायला विसरू नका. आपल्या मनाची मरगळ दूर करण्यासाठी असे कार्यक्रम म्हणजे मनाला मिळणारे टॉनिक! आयुष्याला पुरेल एवढी शिदोरी त्यातून मिळू शकते. जीवनाला उभारी देण्याचे काम ह्यातून घडते.