कार्यवाहू डीजीपीपदी कोणाही अधिकार्‍याची नियुक्ती नको

0
169

>> सर्वोच्च न्यायालयाचे राज्यांना निर्देश

देशातील सर्व राज्यांना सर्वोच्च न्यायालयाने काल आदेश जारी करून कोणाही पोलिस अधिकार्‍याची कार्यवाहू पोलीस महासंचालक (डीजीपी) म्हणून नियुक्ती न करण्याचे निर्देश दिले. देशाचे सरन्यायधीश दीपक मिश्रा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने हा आदेश जारी केला.

सर्व राज्ये व संघ प्रदेशांच्या प्रशासनांनी केंद्रीय सार्वजनिक सेवा आयोगाला (युपीएससी) संभाव्य पोलीस महासंचालक किंवा पोलीस आयुक्तपदासाठी उमेदवार म्हणून वरीष्ठ पोलिस अधिकार्‍यांची नावे पाठविण्याचे निर्देश खंडपीठाने दिले आहेत. त्यानुसार सदर नावांमधून युपीएससी योग्य अशा तीन उमेदवारांची यादी तयार करेल आणि त्याआधारे संबंधित राज्ये किंवा संघ प्रदेश आपल्या पोलीस प्रमुखाची नियुक्ती करू शकेल. तसेच निवडल्या जाणार्‍या अधिकार्‍याच्या सेवेचा उर्वरीत कार्यकाल योग्य प्रमाणात असेल हेही संबंधित राज्यांनी पहावे लागेल. न्यायालयाने असेही स्पष्ट केले आहे की या विषयाशी निगडीत राज्याचा एखादा नियम किंवा कायदा असल्यास तो जैसे थे स्थितीत ठेवावा लागेल. पोलीस सुधारप्रकरणी प्रकाश सिंग खटल्याच्या निवाड्यात केंद्र सरकारने दुरुस्तीसाठी याचिका सादर केली असता त्यावर न्यायालयाने हे निर्देेश दिले आहेत.