कार्तिक गोपालला ‘ब’ विभाग जेतेपद

0
128

>> २री गोवा आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धा

आंध्रप्रदेशच्या कार्तिक गोपाल जी. याने २र्‍या गोवा आंतरराष्ट्रीय ग्रँडमास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेत ‘ब’ विभागाचे जेतेपद प्राप्त केलसे. गोवा बुद्धिबळ संघटनेतर्फे अखिल भारत बुद्धिबळ महासंघाच्या सहकार्याने ताळगाव पठारावरील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इंडोअर स्टेडियमवर ही स्पर्धा खेळविली जात आहे.

महत्त्वपूर्ण व शेवटच्या फेरीत कार्तिकने कार्तिकेयनला पराभूत करीत ९ गुणांसह जेतेपद प्राप्त केले. जेतेपदाबद्दल त्याला रु. २ लाख व चषक प्राप्त झाला. तामिळनाडूच्या सरण्या व्हाय हिने ८.५ गुणांसह उपविजेतेपद मिळविले. तिला रु. १ लाख ५० हजार व चषक प्राप्त झाला. कार्तिकेयन जे. याला ८ गुणांसह तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले. त्याला रु. १ लाख २५ हजारचे बक्षीस मिळाले. सेल्वामुरुगन आणि हर्षिप पवार यांना अनुक्रमे चौथे व पाचवे स्थान मिळाले.
गोव्याच्या आयुष पेडणेकरला ६.६ गुणांसह ६६वे तर पार्थ साळवीला ६ गुणांसह ९२वे स्थान मिळाले. साईराज वेर्णेकर, तन्वी हडकोणकर, सचिन गावडे, इथान वाझ आणि प्रदीप मंदार यांनी प्रत्येकी ६ गुण तर महिला चेस मास्टर गुंजल चोपडेकरने ५.५ गुण मिळवित अव्वल १५० खेळाडूंत स्थान मिळविले.

बक्षीस वितरण सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष तथा वीजमंत्री निलेश काब्राल, स्पर्धा संचालक तथा अखिल भारत बुद्धिबळ महासंघाचे खजिनदार किशोर बांदेकर, नेस्लेचे कॉर्पोरेट हेड संजय भंडारी, आयुषचे उपसंचालक डॉ. दत्ता भट, चीफ आर्बिटर आशेष केणी, अरविंद म्हामल, संजय बेलुरकर, सुभाषचंद्र गावस, आणि डॉ. रुपा बेलुरकर यांची उपस्थिती होती.

अन्य बक्षिसे पुढील प्रमाणे ः वयोगटवार उत्कृष्ट गोमंतकीय खेळाडू ः अंडर ७ – साईराज नार्वेकर व श्रेयसी फळदेसाई, अंडर ९ – वेदांत आंगले व जेनिका सिक्वेरा, अंडर ११ – जॉय काकोडकर व नेत्रा सावईकर, अंडर १३ – प्रदीप नाईक व सयुरी नाईक, अंडर १५ – साईराज वेर्णेकर व तन्वी हडकोणकर.
खुला विभाग ः अंडर ७ – सिद्धान्त भाटी व दिया सावळ, अंडर ९ – इथान वाझ व साईजा देसाई, अंडर ११ – निर्णय गर्ग व राजन्या दत्ता, अंडर १३ – अर्जुन आदिरेड्डी व म्रितिका मळीक, अंडर १५ – आदित्य रामपाल व भाग्यश्री पाटील.
उत्कृष्ट रेटिंग विभागा ः ११०० खालील – हर्षद हगवाणी, १२०० खालील – सिआरुरा नागवेकर, १४०० खालील – विश्रुत पारेख, १६०० खालील – मृत्युंजय महादेवन, १८०० खालील – नील फ्रँकलीन, उत्कृष्ट अमानांकित खेळाडू – पॉल चिन्नाप्पन, उत्कृष्ट गोमंतकीय खेळाडू – आयुष पेडणेकर.