कारवारातील धबधब्यावर गोव्यातील ६ जण बुडाले

0
156

कारवार येथील नागरमाडी (चेंडिया) धबधब्यावर साहसी पर्यटनासाठी गेलेल्या गोव्यातील पर्यटकांपैकी ६ जण अचानक आलेल्या पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जाण्याची दुर्घटना घडली काल दुपारी २.३०च्या दरम्यान घडली. बेपत्ता व्यक्तीमधील प्रिन्सिला पिरीस (२१) व फियोना पाशेको (२८) या दोघांचे मृतदेह मिळाले असून इतरांचा अजून थांगपत्ता लागलेला नाही. दुर्घटनेत बुडालेले व बेपत्ता असलेले राय – मडगाव व वास्को येथील असून सर्वजण २० ते ३० वयोगटातील आहेत.

या दुर्घटनेत वाहून गेल्याने बेपत्ता असलेल्या व्यक्तींची नावे रेणुका च्यारी, सिध्देश च्यारी, मार्सेलिना मेक्सिका व समीर गावडे अशी असल्याची माहिती मिळाली आहे. कारवारपासून १५ कि. मी. दूर असलेल्या नागरमाडी धबधब्यावर गोव्यातील सुमारे ५५ पर्यटकांचा गट गेला होता. त्यात पुरुष, महिला तसेच मुलांचा समावेश होता. धबधब्याच्या ठिकाणी पाण्यात उतरून स्नान करीत असताना अचानक आलेल्या पावसाच्या जोरदार प्रवाहाबरोबर सहाजण वाहून गेल्याने सगळ्यांनी एकच आरडाओरड केली. मात्र, जोरदार प्रवाहामुळे वाहून जाणार्‍यांना वाचवणे शक्य झाले नाही. धबधब्यावर पर्यटनासाठी आलेले पर्यटक वाहून गेल्याची माहिती मिळताच स्थानिक चेंडिया येथील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन तातडीने शोधकार्य सुरू केले.
कारवार भागात गेले दोन दिवस मुसळधार पाऊस पडत असून सदर धबधब्याचा अकस्मात वेग वाढल्यामुळे ही दुर्घटना घडली. ज्या ठिकाणी ही घटना घडली ती जागा अत्यंत धोक्याची असून यापूर्वी देखील अशा घटना या ठिकाणी घडल्या असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. दुर्घटनेत सापडलेल्या व्यक्ती मडगाव आणि वास्को येथील असल्यामुळे गोव्यात या घटनेमुळे सर्वत्र शोकाकूल वातावरण आहे. माजी मंत्री जुझे फिलीप डिसोझा यांनी या प्रकरणी लक्ष घालण्याची मागणी केली आहे. बेपत्ता असलेल्या व्यक्तींचे शोधकार्य अत्यंत जोमाने चालू असून कारवार तसेच गोव्यातील शोध पथके या कामात गुंतली आहेत.कारवारपासून जवळ असलेल्या नागरमाडी धबधब्याची मजा लुटण्यासाठी गोव्यातून दरवर्षी शेकडो युवक, युवती जात असतात. मात्र अशा प्रकारची दुर्घटना पहिल्यांदाच घडली असल्याची माहिती कारवारचे चैतन्य जोशी यांनी दिली. धबधब्याजवळचा भाग खडकांनी व्यापलेला असून एखाद्या खडकाच्या दरीमध्ये बेपत्ता व्यक्तींचा मृत देह अडकला असण्याची किंवा पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

मुसळधार पावसाच्या पाण्याने केला घात!
नागरमाडी धबधब्याने पर्यटकांचे बळी घेण्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे. गेल्या दोन दिवसांपासून कारवार भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. धबधब्याच्या ठिकाणी पाण्याचा प्रवाह धोकादायक नव्हता. त्यामुळे गोव्यातील पर्यटक मुक्तपणे पाण्यात उतरून आनंद लुटत होते. ते स्नान करत असताना पावसामुळे जोरदार पाण्याचा लोट आला आणि क्षणार्धात पाण्यात असलेल्या सहा पर्यटकांना घेऊन गेला. पाणी अचानक कसे आले हे कळण्यापूर्वीच ते पाण्याच्या जोरदार लाटेमुळे बुडाले!