कारगिल ः युद्ध आणि प्रश्न

0
138
  • कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)

कारगिल विजय दिनाचा १९ वा वर्धापन दिन येत्या २६ जुलै रोजी साजरा केला जाईल. या युद्धात भारताचे ४७४ सैनिक धारातीर्थी पडले आणि ११०९ गंभीर जखमी झालेत. पाकिस्तानची हानी यापेक्षा कितीतरी जास्त होती. तथापि, या युद्धादरम्यान निर्माण झालेले काही प्रश्‍न आजही अनुत्तरितच राहिले आहेत. पाकिस्तानला योग्य धडा शिकवून काश्मीर प्रश्‍नाचे आपल्याला हवे असलेले उत्तर शोधण्याची हाती आलेली संधी भारताने का दवडली?

१९ वर्षांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान श्री अटलबिहारी वाजपेयी यांनी भारत व पाकिस्तानमध्येे शांती स्थापनेसाठी नवाझ शरीफ यांच्याबरोबर वार्तालापासाठी उचललेल्या अभूतपूर्व पावलांमुळे बावचळलेल्या पाकिस्तान लष्कराने अतिशय गुप्त कारवाई करत, झोझीला खिंडीपासून लडाखकडे जाणार्‍या मार्गाला आर्टिलरी आणि मॉर्टर फायरद्वारे प्रभावित करण्यासाठी, कारगिल क्षेत्रातील उंच पर्वतराजीवर ठाण मांडले. भारतीय सेनेनी अतिशय बहादुरीने इंच इंच जमिनीसाठी लढा देत जवळपास अडीच महिने चाललेल्या या युद्धात पाकिस्तानी घुसखोरांना सीमापार घालवले. या युद्धातील संकुचित रणभूमीमुळे भारतावर सीमापार करून युद्ध करण्याबाबत स्वघोषित एकतर्फी बंधने घालण्यात आली होती. पाकिस्तानवर ती नव्हती. १९९९ च्या कारगिल युद्धाबद्दल आजपर्यंत बरेच काही लिहिले गेले आहे. आणि यापुढेही लिहिले जाईल. आपल्या परीने एकमेवाद्वितीय असलेल्या जगातील सर्वात ऊंच रणभूमीवर लढल्या गेलेल्या कारगिल युद्धाला भारताने ‘ऑपरेशन विजय’ आणि पाकिस्तानने ‘ऑपरेशन कोह पाईमा’ ही सांकेतिक नावे दिली होती.

कुठल्याही युद्धाच्या यशापयशाबद्दल दोन्ही बाजूंच्या विचार/मतांची मीमांसा होणे आवश्यक असते. अशा तुलनात्मक मीमांसेनंतरच युद्धाची खरी कल्पना करता येते. ङ्ग्रॉम सरप्राझ टू व्हिक्टरी (जनरल व्ही. पी.मलिक),ए रिज टू फार (कॅप्टन अमरेन्द्र सिंग),कारगिल : टर्निंग द टाईड (मेजर जनरल मोहिन्दर पुरी), कारगिल वॉर (प्रवीण स्वामी),कारगिल : द हाईटस् ऑफ ब्रेव्हरी (आझाद सिंग राठोर),डेटलाईन कारगिल (गौरव सावंत),द कारगिल वॉर १९९९ (ब्रिगेडियर बी एस जोशी) इत्यादी पुस्तकांच्या माध्यमातून कारगिल युद्धाचा भारतीय दृष्टिकोन वाचकांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे, पण त्याच युद्धाबद्दल पाकिस्तानी लोकांचा दृष्टिकोन काय आहे याबद्दल बहुतांश वाचक अनभिज्ञ आहेत. कारगिल विजय दिवसाच्या १९ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने भारत व पाकिस्तान या दोघांच्या दृष्टिकोनातून हा आढावा घेणे योग्य ठरेल.

सामरिक विश्‍लेषक के. सुब्रमण्यनच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीने तत्कालीन भारत सरकारला कारगिल युद्धावर हजारो पानांचा अहवाल सादर केला असला तरी त्याला युद्ध इतिहास म्हणून अधिकृत मान्यता नाही. त्या अहवालातील एका टिप्पणीनुसार तत्कालीन वायुसेनाध्यक्ष एयर चीफ मार्शल ए. वाय. टिपणीस यांनी पाकिस्तानी हद्दीत जाऊन बॉम्बहल्ले करू देण्याची मागणी केली होती, पण असे केल्यास परिस्थिती हाताबाहेर जाईल असे वाटल्याने पंतप्रधानांनी अशी परवानगी देण्यास नकार दिला. जागतिक महाशक्तींनी पाकिस्तानला युद्धबंदीसाठी बाध्य करून त्याचे सैनिक माघारी घेण्यास उद्युक्त केल्यामुळे हा निर्णय किती संतुलित होता हे युद्धानंतरच्या सिंहावलोकनात स्पष्ट होते. नवाझ शरीफशी युद्धबंदी अथवा शांती वार्तालाप करण्यासाठी अमेरिकी राष्ट्रपती बिल क्लिटंन यांनी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींना वॉशिंग्टनला येण्यासाठी आणि अमेरिकेची मध्यस्थी स्वीकारण्यासाठी केलेले आवाहन पंतप्रधानांनी धुडकावले. कारगिलमध्येे पाकिस्तानी सेनेचे कंबरडे मोडले होते आणि भारतीय स्थलसेना पाकव्याप्त काश्मीरमध्येे स्कार्डूच्या दिशेने प्रवेश करत पळ काढणारे मुजाहिदीन व पाकिस्तानी सेनेचा पाठलाग करण्याच्या अवस्थेत असताना देखील भारताने पाकिस्तानी सैनिकांना सुखरूप माघारी का जाऊ दिले हा एक यक्षप्रश्‍न आहे.

पंतप्रधान अटलबिहारी बाजपायींनी त्यांची राजकीय परिपक्वता व प्रशासकीय चातुर्याचा वापर करत संरक्षण दलांना लाइन ऑफ कंट्रोल पार करण्यास मज्जाव केला. पाकिस्तानवर दयामाया न दाखवता त्याला कठोर शासन करावे अशी त्यांच्या बहुसंख्य मंत्र्यांची आणि देशाचीही इच्छा होती. या युद्धात भारताचे ४७४ सैनिक धारातीर्थी पडले आणि ११०९ गंभीर जखमी झाले. पाकिस्तानची हानी यापेक्षा कितीतरी जास्त होती. त्यामुळे पाकिस्तानला योग्य तो धडा शिकवून काश्मीर प्रश्‍नाचे आपल्याला हवे असलेले उत्तर शोधण्याची हाती आलेली संधी भारताने का दवडली? त्याचप्रमाणे पाकिस्तानने त्याचा आण्विक पत्ता केव्हा, कसा व कुठल्या पद्धतीने वापरला आणि भारताने तो खुला का केला नाही हा सामरिक इतिहासाच्या अभ्यासकांना पडलेला दुसरा प्रश्‍नही वाजवी आहे. आण्विक युद्धाच्या भीतीमुळे भारत सर्वंकष युद्धास तयार होणार नाही याची जवळपास खात्री असल्यामुळे पाकिस्तानचे धाडस वृद्धिगंत झाले, असे मत नरेश चंद्रांच्या ‘कारगिल रिव्हयु कमिटी’ने नोंदवले आहे. जागतिक संरक्षणतज्ज्ञांच्या मते, भारत संकुचित रणभूमीवर त्याला पाहिजे त्या पद्धतीने युद्ध करून अशा प्रकारे जिंकेल याची थोडीही कल्पना पाकिस्तानला नव्हती.
असे असले तरी सर्वकष युद्धासाठी भारत व पाकिस्तानची कितपत तयारी होती आणि त्यासाठी संबंधित सरकारांनी काय उपाययोजना केल्या होत्या याबद्दल आजही दोन्हीकडे अधिकृत सरकारी माहिती उपलब्ध नाही.

‘जगातील कोणताही देश युद्धाची पूर्णत: खरी हकीकत सांगत नाही, कारण अधिकृत माहिती दिल्यास सामरिक सज्जतेशी तडजोड होऊ शकते’ या भीतीमुळे सर्वच संरक्षणदल युद्धातील डावपेचांबद्दल खरी माहिती देण्याची टाळाटाळ करतात. भारतीय संरक्षणदलांच्या याच सर्वमान्य मानसिकतेमुळे स्वतंत्र भारताने केलेल्या अथवा सहभाग असलेल्या युद्धांचा वा सैनिकी कारवायांचा अधिकृत सामरिक इतिहास लिहिला जाऊ शकला नाही असा १९६२,१९६५ व १९७१च्या युद्धांचा आणि इतर सामरिक कारवायांचा इतिहास मुद्रित करणार्‍यांचा अनुभव आहे. १९६२ च्या भारत-चीन युद्धासंबंधीचा ‘हंडर्सन ब्रुक भगत रिपोर्ट’ याच कारणांमुळे अजूनही गोपनीयच ठेवण्यात आला आहे. प्रत्येक संरक्षणमंत्री विरोधी पक्षात असताना तो रिपोर्ट खुला करण्याची मागणी करत असला तरी सरकारमध्येे आल्यावर तो त्याबद्दल ‘ब्र’ सुद्धा काढत नाही. कारगिल प्रकरणातदेखील या पेक्षा फारसे वेगळ होण्याची शक्यता नाही. भारत सरकारतर्फे सामरिक इतिहासकार श्रीनाथ राघवन यांना कारगिल युद्धाचा अधिकृत इतिहास लिहायची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यासाठी सेना,नौसेना व वायुसेना मुख्यालय आणि वरिष्ठ सैनिकी अधिकार्‍यांनी आपल्या सामरिक डावपेचांची प्रांजळ माहिती देणे अपेक्षित असले तरी ते कितपत प्रत्यक्षात येईल याचा अंदाज बांधणेे कठीण आहे. कारगिल युद्धाचे काही संवेदनशील अंश नेहमीच गोपनीय राहातील हे सत्य स्विकारले तर या युद्धाचा श्रीनाथ राघवन लिखीत इतिहास, एक महत्वाचा,अधिकृत, ऐतिहासिक – सामरिक दस्तावेज असेल यात शंकाच नाही.

आर्य चाणक्य, चीनी सैनिकी तज्ञ सन त्झू आणि प्रुशियन संरक्षणतज्ञ कार्ल व्हॉन क्लॉत्झविझनुसार, युद्ध कोण जिंकेल हे चार प्रकारांनी ठरवले जाते. आक्रमणकर्त्या शत्रूची प्रचंड जीव हानी व वित्त हानी करून त्याचे कंबरडे मोडणे आणि त्याला नामोहरम करणे हा पहिला प्रकार असून, दुसर्‍या महायुद्धात जर्मनीनी आक्रमण केल्यावर रशियानी हेच केले होते. आक्रमणकर्त्या शत्रूने जिंकलेला भूभाग परत घेतांना शत्रू सेनेला मोठी क्षती पोचवून त्याची नाचक्की करत त्याला सीमापार हुसकावून लावणे हा दुसरा प्रकार आपण पाकिस्तान विरोधात कारगिलमध्येे केला. शत्रूवर आक्रमण करुन त्याचा भूभाग बळकावल्यानंतर त्याच्या सेनेचा विनाश करुन सैनिकांना बंदी बनवणे या तिसर्‍या प्रकाराचा अवलंब भारतीय सेनेनी बांगलादेशमध्येे केला. सीमा पार न करता शत्रूची संसाधनशक्ती पूर्णत: उद्ध्वस्त करून त्याच्या सेनेची प्रचंड बरबादी करत त्याचे मनोधैर्य खच्ची करणे हा चौथा प्रकार पाकिस्तान काश्मिरमध्येे करू पाहात आहे. या निकषांवर भारताने कारगिल युद्ध निर्विवाद जिंकले असे म्हणणे अवाजवी नाही. कारगिलमध्येे मार खाऊनही, ‘आम्हीच कारगिल युद्ध जिंकले’ या पाकिस्तानी ढिंढोर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर तेथील सरकारी प्रतिपादना व्यतिरिक्त आम जनता, विचारवंत, निवृत्त लष्करी अधिकारी व संरक्षणतज्ज्ञ कारगिल युद्धाची काय व कशी मीमांसा करतात आणि त्यांचे याबद्दल काय मत आहे हे पाहिले पाहिजे.

नसीम जेहराच्या पुस्तकातील पाकिस्तानी पराजयाची सामरिक व राजकीय मीमांसा आणि त्यातले माजी लष्करी अधिकार्‍यांचे परखड प्रतिपादन त्याचप्रमाणे द डॉनसारखे वृत्तपत्र/इतर वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांनी व्यक्त केलेल्या विविध मतांमुळे, पाकिस्तानच्या तत्कालीन राजकीय व सामरिक परिस्थितीबद्दल काही बोचरे प्रश्‍न निर्माण होतात. ऑपरेशन केपी सुरू करण्याआधी या लोकांनी हाईंड साईटमध्येे वर्तवलेल्या किंवा उद्धृत केलेल्या मूलभूत बाबी जम्मू-काश्मीरमधल्या कोणाच्याच लक्षात का आणि कशा आल्या नाहीत? लक्षात आल्या असतील तर त्यावर चर्चा झाली होती का? चर्चा झाली असल्यास, त्या बाबींकडेे जाणुनबुजून दुर्लक्ष करण्यात आल का आणि ते का करण्यात आले? झाली नसल्यास, पाकिस्तानात सेनेत, प्रचलित आणि प्रस्थापित मतांविरोधात आपले मत मांडायची परवानगी नाही का? पाकिस्तानच्या संरक्षणदलांमध्येे समन्वयाचा अभाव आहे का? जर असे काहीच नसेल तर ऑपरेशन कोह पाईमा हे फक्त मुशर्रफचेच ‘ब्रेन चाईल्ड’ आणि ‘इगो अल्टार’ होते का? आणि सरतेशेवटी फासा उलटा पडला अथवा पराजय झाला तरी पाक सेना त्या संबंधातील आपले मत आणि आपलीच बाजू खरी आहे हे मिथ्य, नेहमी जनतेच्या गळी कस उतरवू शकते?. यापैकी कोणत्याही प्रश्‍नाचे उत्तर पाकिस्तानमध्येे कोणीच देत नाही. मात्र एका बाबतीत सर्वांचे एकमत आहे ते म्हणजे ‘पाकिस्तान कॅन नॉट अफोर्ड अनदर कारगिल ऑर अनदर मुशर्रफ’.

जनरल मुशर्रफना कारगिल युद्ध आणि त्यामधील पराजयासाठी जबाबदार मानले जात असले तरी आपले रुबाबदार व्यक्तिमत्व, वागण्यातील सभ्यता, आब आणि मधुर बोलणे यामुळे पाकिस्तानी जनता आणि जगभरातील प्रसारमध्यमांना त्यांनी सहज आपल्या बाजूला वळवले आणि जरी पाकिस्तानला कारगिलमध्येे हार पत्करावी लागली तरी भारत सरकारवर जागतिक दडपण आणून त्याला द्विपक्षीय वार्तालाप तसेच नव्या ‘कॉन्ङ्गिडन्स बिल्डिंग मेझर्स’ सुरू करवण्यास त्यांनी बाध्य केले. याची परिणिती २००२ मध्येे मुशर्रफनी जयपूरच्या क्रिकेट मॅचला हजेरी लावण्यात आणि पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींनी योजलेल्या आग्रा समीटमध्येे सहभागी होण्यात झाली. रेस्ट इज हिस्ट्री.