काय होणार महाराष्ट्रात?

0
155

– गंगाराम म्हांबरे

‘अरे कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?’असा प्रश्‍न विचारत सुरू झालेला वृत्तवाहिन्यांवरील अनेक प्रकारचा प्रचार अख्ख्या मराठी भाषकांनी अनुभवला. ‘मी शिवसैनिक, यावेळी पुन्हा कॉंग्रेसच किंवा विकास केला राष्ट्रवादीने अथवा विकास आराखडा माझ्याकडे तयार आहे ना!’ अशा विविध नार्‍यांनी महाराष्ट्र ढवळून निघाला होता. एक दिवस पूर्णपणे शांत डोक्याने विचार करून मतदारराजांनी बटन दाबले! काय असेल या मतदानयंत्रांमध्ये? कोणाला कौल दिला असेल मतदारांनी? अर्थात कोणीही कितीही दावे केले तरी या प्रश्‍नांची उत्तरे देणे कुणालाच शक्य नाही! त्यासाठी रविवारचीच प्रतीक्षा करावी लागेल. एक मात्र खरे की, एकाही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार नाही असा राजकीय निरीक्षकांचा अंदाज आहे.यावेळच्या निवडणुकीची काही वैशिष्ट्ये मात्र लक्षात राहाण्यासारखी आहेत. प्रत्येक पक्ष ‘स्वबळा’वर लढला. एकाच दिवशी, नव्हे काही तासांच्या कालावधीत युती आणि आघाडीमध्ये फूट पडली. कदाचित एकमेकांची वाट पाहातच ही फारकत झाली! दोन्हींकडे अखेरपर्यंत जागांच्या संख्येवरून ओढाताण सुरू होती हे आणखी एक साम्य. सर्व पक्षांचे सर्वोच्च नेते प्रचारात उतरल्याने निर्माण झालेली चुरस तर प्रथमच दिसली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपले सारे कौशल्य पणाला लावले. दुसर्‍या फळीतील नेतेही मागे नव्हतेच. आता प्रत्येक पक्ष स्वतःचे महाराष्ट्रात आपले काय स्थान आहे, हे पडताळू शकेल.
पंतप्रधानांच्या सर्वच भागांत प्रचारसभा झाल्या. त्यांचा लोकसभा निवडणुकीतील झंझावात आणि प्रभाव कायम असल्याचा प्रत्यय येत होता. त्यांच्या सार्‍याच सभा प्रचंड म्हणता येतील अशा झाल्या. पंतप्रधानपदाचे वलय आणि परदेशी दौर्‍याची पार्श्‍वभूमी अशा दुहेरी प्रभावाचा जनमानसावरील परिणाम स्पष्टपणे जाणवत होता. महाराष्ट्राच्या निवडणुकीत पंतप्रधानांचे काय काम, हा बालीश प्रश्‍न जनतेच्या दृष्टीने नगण्य होता.
महाराष्ट्राचा विकास कसा करता येईल, याबद्दल बोलताना उद्योग आणि पर्यटनांवर मोदी यांनी सतत भर दिला. मागची पंधरा वर्षे वाया घालवलीत, त्याची पुनरावृत्ती पुन्हा नको असे ते मतदारांना सांगत होते. ज्याला विद्यमान सत्ताधार्‍यांबद्दलचा रोष म्हणता येईल, अशा जनतेमधील भावनांना त्यांनी नेमके हेरले होते. त्यांच्या भाषणांना प्रत्युत्तर देताना सार्‍याच पक्षांचे नेते पातळी सोडताना दिसले.
युती तुटली याबद्दल शिवसेनेमध्ये दिसणारा राग अखेरच्या दिवसांत त्रागा असल्याचे भासू लागले. मराठी अस्मितेवर भर देणे किंवा अफझलखानाचा उल्लेख करणे हे आणखी काय वेगळे होते? कॉंग्रेस व राष्ट्रवादीमधील संबंध तुटले आणि त्यांनी परस्परांवर टीका केली, तरी त्या दोन्ही पक्षांत आघाडी तुटल्याबद्दल एकमेकांना दुषणे देण्याचा प्रकार घडला नाही. एकदा विभक्त झालोच, आता एकमेकांशी लढू अशी परिपक्वता या पक्षांनी दाखवली. निकाल काही का लागेना, राजकीय पक्ष कसे वागले, यावरही मतदारांचे लक्ष असतेच.
भाजपला शंभरच्यावर जागा मिळतील, त्यानंतर कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी व मनसे अशी घसरण असेल असे मानले जाते. महाराष्ट्रातील जनतेला असेच वाटत असेल. यावेळी झालेली पक्षांतरे ‘आयाराम-गयाराम’ वृत्तीला मागे टाकणारी होती. एखादा नेता (इच्छुक उमेदवार) एका पक्षातून सुटला की तो कुठे जाऊन थांबेल, ते सांगता येत नव्हते. एक-दोन करीत तो तिसर्‍याच पक्षात दाखल व्हायचा आणि आश्‍चर्य म्हणजे त्याला उमेदवारीही मिळायची. त्या राज्यात अनेक भागांत असे प्रकार घडले. पश्‍चिम महाराष्ट्रात तर राष्ट्रवादीला याचा अधिक फटका बसला आहे. अनेक नेते सरळ चालते झाले!
जनता अशा नेत्यांना मग ते कुठल्याही पक्षातील बंडखोर अथवा पक्षबदलू असोत, निवडून देते काय हे पाहावे लागेल. निकालाकडे लक्ष असलेल्या जनतेच्या मनात काही समीकरणे तयार होऊ लागली आहेत. नेमके कोण दोन पक्ष एकत्र येतील याबद्दलही अंदाज व्यक्त होत आहेत.
भाजप-शिवसेना सध्या जरी एकमेकांविरुद्ध लढत असले तरी या दोन पक्षांना पुन्हा जुळवून घ्यावे लागेल, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. मोदींच्या लाटेमुळे भाजप आमदारांचा आकडा शंभरावर गेला, तरी त्या पक्षाला अन्य कुणाची तरी मदत घ्यावीच लागेल. कॉंग्रेसचा तर प्रश्‍नच नाही, पण ज्या पक्षाचे वर्णन ‘नॅचरल करप्शन पार्टी’ असे खुद्द मोदी यांनीच केले, त्या पक्षाचे सहकार्य घेणार का, असा प्रश्‍न भाजपसमोर असेल. त्यामुळे भाजप हा शिवसेनेला बरोबर घेऊनच सत्ता ग्रहण करू शकेल. मनसे आमदारांची संख्या १० ते १५ असेल असे मानले जाते. कॉंग्रेसला काही जागा कमी पडल्यास त्या पक्षाला राष्ट्रवादीची मदत घ्यावी लागेल. अर्थात मतदानाच्या आदल्या दिवशी ‘आपलेच’ काही माजी मुख्यमंत्री भ्रष्टाचारात अडकले होते, त्यांच्यावर कारवाई केली असती तर पक्षाचे अस्तित्त्वच धोक्यात आले असते, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटल्यामुळे राष्ट्रवादीवर त्यांच्या पक्षाने केलेल्या आरोपांतील हवाच निघून गेली आहे.
या उलट भाजवर कितीही टीका केली तरी आम्ही त्या पक्षाला शत्रू क्रमांक १ मानलेले नाही, ही शिवसेनेची भूमिका अधिक समंजसपणाची वाटते. शरद पवार यांच्या हाती सत्तेची चावी असेल असे म्हणणार्‍या राजकीय निरीक्षकांनी राष्ट्रवादीचे किमान ५० आमदार निवडून येतील आणि त्यांच्या मदतीशिवाय महाराष्ट्रात सरकार स्थापन होणे अशक्य असल्याचे अनुमान काढले आहे.
पवार कुठेही जाऊ शकतात, हे जरी खरे असले तरी अन्य पक्षांना हा ‘भ्रष्ट’ पक्ष चालेल का? या पक्षाच्या सर्वच (माजी) मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे अथवा गलथानपणाचे, निष्क्रियतेचे आरोप आहेत, मग ते खाते गृह असो किंवा जलसिंचन! अशा पक्षाला सोबत घेताना, प्रेम व राजकारणात सारेच क्षम्य असे सांगितले जाईल, पण मतदारांना कसे समजावयाचे, हा प्रश्‍न उरतोच. खरे सांगायचे तर अलीकडे निवडून आल्यावर कोणत्याही तडजोडी करून सत्ता मिळवण्याकडेच राजकीय पक्षांचा कल असतो. त्यामुळे महाराष्ट्रात नेमके काय होईल, हे सांगण्यासाठी निकालानंतर कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात, यावर सारे अवलंबून राहील.
पुन्हा युती-आघाडीचे राजकारण सुरू होण्याची अधिक शक्यता दिसते. लोकसभेवेळी सारेच अंदाज चुकले होते, तसे पुन्हा तर होणार नाही ना? या जर-तरपेक्षा रविवारची प्रतीक्षा करणेच अधिक श्रेयस्कर.