काम १२ तास, मात्र पगार ८ तासांचा ः मंत्र्यांकडे तक्रारी

0
103

 

राज्यातील औद्योगिक कंपनीमध्ये वाढविलेल्या ४ तासांच्या कामाचा कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना दुप्पट पगार दिला पाहिजे, असे स्पष्टीकरण कारखाना व बाष्पक मंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी काल दिली. मात्र, कंपनी व्यवस्थापनाकडून कामगारांकडून १२ तास काम करून घेतले जात आहे. कामगाराला पगार आठ तासांचा दिला जात आहे, अशा तोंडी तक्रारी आपल्याकडे येत आहेत. याबाबत अजूनपर्यंत लेखी स्वरूपात तक्रार आलेली नाही, असेही मंत्री कवळेकर यांनी सांगितले.

लॉकडाऊनमुळे कारखान्यांत कामगारांची कमतरता असल्याने कारखान्यांच्या कामकाजात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून कामाच्या वेळेत चार तासांनी वाढ करण्यात आली आहे. कामगारांना त्या वाढविलेल्या चार तासांचा दुप्पट पगार देण्याची गरज आहे, असेही मंत्री कवळेकर यांनी सांगितले.

जादा वेळेच्या कामाचा आदेश ३१ जुलैपर्यंत असून त्यानंतर कंपनीतील कामगारांच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे. कंपन्यांनी कामगारांना जादा वेळेचा दुप्पट पगार दिला नसल्याचे आढळून आल्यास त्या कामगारांना दुप्पट पगार देण्याची सूचना केली जाणार आहे, असेही मंत्री कवळेकर यांनी सांगितले.
राज्यातील भात कापणीचे काम येत्या आठ दिवसात पूर्ण होणार आहे. भात कापणीचे काम यंत्राच्या माध्यमातून केले जाते. लॉकडाऊनमुळे यंत्र हाताळणार्‍या कामगारांची कमतरता निर्माण झाल्याने भात कापणीच्या कामाला उशीर झाला आहे. कर्नाटकातून ऑपरेटर आणून भात कापणीचे काम हाती घेण्यात आले आहे, अशी माहिती मंत्री कवळेकर यांनी दिली.