‘कामधेनू’च्या उल्लंघनप्रकरणी शेतकर्‍यांना वसुलीसाठी नोटीसा

0
230

पशुसंवर्धन आणि पशुवैद्यकीय खात्याच्या कामधेनू योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणार्‍या शेतकर्‍यांकडून खात्याने अनुदान वसुलीच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. आत्तापर्यंत सोळा शेतकर्‍यांना अनुदान वसुलीसाठी नोटीस पाठविण्यात आली असून आणखी शंभरच्या आसपास शेतकर्‍यांना नोटीस पाठविली जाणार आहे, अशी माहिती खात्याच्या सूत्रांनी दिली.

सरकारकडून राज्यातील दुधाच्या उत्पादनात वाढ करण्याच्या उद्देशाने कामधेनू योजना राबविण्यात येत आहे. या योजनेखाली शेतकर्‍यांना भरघोस अनुदान दिले जात आहे. या योजनेचा लाभ घेतलेल्या काही शेतकर्‍यांनी योजनेखाली खरेदी केलेली जनावरे विकल्याचे आढळून आले आहे. या प्रकारांना आळा घालण्यासाठी कडक पाऊल उचलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कामधेनू योजनेखाली जनावरे खरेदी केलेल्या काही शेतकर्‍यांकडून मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे. सरकारी योजनेखाली खरेदी करण्यात येणार्‍या जनावरांची साडे तीन वर्षापर्यंत विक्री केली जाऊ शकत नाही.

माफीची काही शेतकर्‍यांची मागणी
दरम्यान, कामधेनू योजनेखालील मिळालेले ४५ हजार रुपयांचे अनुदान भरण्याची नोटीस मिळाली होती. घरच्या कठीण आर्थिक परिस्थितीमुळे ही रक्कम भरू शकत नाही. सरकारने ही रक्कम माफ करावी, अशी मागणी साकोर्डा येथील दूध उत्पादक शेतकरी सागर कृष्णा सावंत याने पत्रकारांशी बोलताना काल केली.
सरकारच्या कामधेनू योजनेखाली पाच म्हैस खरेदी केलेल्या आहेत. त्यातील एक म्हैस ऑक्टोबर २०१७ मध्ये रगाडा नदीला अचानक आलेल्या पुरामध्ये वाहून गेली. यासंबंधी सरकारी यंत्रणेकडे तक्रार दाखल केली आहे. आपण म्हैसची विक्री केलेली नाही. घरच्या कठीण आर्थिक परिस्थितीमुळे अनुदानाची रक्कम भरू शकत नाही.