कापशेत शेकडो खनिजवाहू ट्रक अडविल्याने तणाव

0
80

कापशे येथील खनिज मालाच्या जेटीवर माल उतरविण्यास जाणारे किर्लपाल पंचायतक्षेत्रातील सुमारे ५०० ट्रक काल सावर्डेतील संतप्त ट्रक मालकांनी अडविल्याने तणाव निर्माण झाला. सावर्डेतील ट्रकमालकांना खनिज वाहतुकीचे योग्य प्रमाणात काम मिळत नसल्याने हे ट्रकमालक संतप्त झाले आहेत. किर्लपालमधील ३०० ट्रकांना हे काम देण्यात आल्याने सावर्डेतील ट्रकमालक नाराज बनले आहेत. यावेळी सुमारे पाचशे ट्रक जेटीवर होते. त्यानंतर कुडचडे पोलीस निरीक्षक रविंद्र देसाई व शिरोडाचे पोलीस यांनी तोडगा काढण्यासाठी धारबांदोडा उपजिल्हाधिकार्‍यांशी चर्चा करण्याचे ठरवले. त्यानुसार आज (बुधवारी) दोन्ही बाजू ऐकण्यासाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्याचे ठरले आहे.

प्राप्त माहितीनुसार कापशे जेटीवर मालक उतरवण्यासाठी सावर्डे पंचायतीतीलच ट्रक आजपर्यंत जात होते पण या जेटीवर माल उतरवण्यासाठी किर्लपाल पंचायतीतील तीनशे ट्रक उतरवण्यात आले आहेत. आधीच सावर्डे येथील ट्रकमालाना फक्त तीन ट्रीप मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो. त्यात या ट्रकांची भर घालण्यात आल्याने दिवसाकाठी आता एक सुद्धा ट्रीप मिळणे येथील ट्रकमालकांना दुरापास्त बनले आहे. त्यामुळे या तीनशे ट्रकांना येथे सामावून घेता येणार नाही असे येथील ट्रकमालकांनी स्पष्ट केले होते. पण या ट्रकांचा व्यवसाय चालूच आहे. त्यातच रात्री उशिरापर्यंत ट्रक वाहतूक चालू असल्याप्रकरणी कुडचडे पोलिसांनी काही ट्रक ताब्यातही घेतले होते. असे असूनही आणि येथील ट्रक मालकांची समस्या जाणू घेऊनही कंपनीने या ट्रकाना मालवाहतूक करण्यास देऊन सावर्डे ट्रकमालकावर अन्याय केला असल्याचा सावर्डेतील ट्रकमालकांचा दावा आहे.