कानाचे आरोग्य व संरक्षण

0
1538
  •  डॉ. सुरज पाटलेकर
    (अध्यापक, गोवा आयुर्वेद महाविद्यालय)

कानांचे दुखणे हे डोके दुखणे, दात किडणे/दात दुखणे यामुळेसुद्धा होऊ शकते. फटाक्यांचा आवाजसुद्धा कारणीभूत ठरतो. जसे वय होत जाईल तसे ऐकू येण्यावर पण फरक पडत जातो. ज्यांना कमी ऐकू येते ती व्यक्ति उच्च स्वरात/आवाजात बोलते हे स्वाभाविक असते.

कान(श्रोत्रेंद्रिय/श्रवणेंद्रिय) हे ५ ज्ञानेन्द्रियांपैकी एक. ज्ञानेंद्रिय म्हणजे ज्या इंद्रियांमुळे आपणास एखाद्या गोष्टीचे ज्ञान होते. डोळयांनी (चक्षुरेंद्रिय) आपणास रूप दिसते, जीभेमुळे (रसनेंद्रिय) चव कळते, नासा/नाकामुळे (घ्राणेंद्रिय) गंध/वास घेऊ शकतो, त्वचेमुळे (स्पर्शेंद्रिय) स्पर्श कळतो व कानांमुळे (श्रवणेंद्रिय) शब्द/आवाज ऐकू येतो. म्हणूनच असाधारण महत्त्व आहे कानांचे. जशी आपण डोळ्यांची किंवा इतर गोष्टींची काळजी घेतो तशी कानांचीसुद्धा काळजी घेतली पाहिजे. समजा कानच नाहीत किंवा ऐकूच व्यवस्थित येत नसेल तर काय परिस्थिती उद्भवेल ह्याची कल्पनासुद्धा करवत नाही. आपण कित्येकवेळी ह्या महत्वपूर्ण गोष्टींकडे त्यांना क्षुल्लक समजून दुर्लक्ष करतो.

तर काय काळजी घेणे अपेक्षित आहे? …
कानाचा कुठलाही त्रास होत असल्यास सर्वप्रथम तज्ञ वैद्यांना दाखवून वेळेत उपचार घेणे महत्वाचे. ह्यासाठी जे घरगुती उपचार किंवा आजीबाईच्या बट्‌व्यामधून औषधे दिली जातात, ती अगोदर बंद करावीत. ज्या गोष्टीबद्दल आपल्याला ज्ञान नाही, त्याची आपल्या पद्धतीने चिकित्सा करत बसू नये. ते काही प्रमाणात बरोबर असतीलही, पण कोणास ठाऊक की त्यामुळे एखादा चुकीचा/विरूद्ध/उलट परिणाम पण होऊ शकतो. प्रत्येक घरगुती उपचार हा आयुर्वेदाच्या नावावर नाही खपवू शकत ह्याचे नक्कीच भान ठेवावे. योग्य उपचार करण्यासाठी तज्ञ वैद्य आहेतच. लोक तर कान दुखतोय/कानातून विचित्र आवाज येतात ह्या तक्रारींसाठी कानात केरोसिन/एकदम गरम तैल वगैरे घालतात. हे असे करणे साफ चुकिचे आहे. मान्य आहे की हे सर्व उपचार पुर्वजांपासुन चालू आहेत. पण तरीही ते करु नयेत. कानांचे पडदे हे खुपच पातळ व संवेदनशील भागांपैकी एक. कानात एकदम गरम तैल घातल्याने या सारख्या इतर गोष्टींमुळे कानाचा पडदा फाटू शकतो किंवा त्याला भोक पडू शकते. कानात घालायला जे एखादे औषधी तैल वापरतो ते कोमटच असले पहिजे. व ते सुद्धा वैद्यांच्या सल्ल्यानेच करावे. खुप थंड वा गरम तैल वापरल्याने, आभ्यंतर/आतील कानातील कॉकलियामधील लेबीरिन्थ हे उत्तेजित होते व त्यामुळे चक्कर येते. हे सर्व लक्षात घेता, कोणाच्या थोबाडीत/कानाखाली मारणे, त्या व्यक्तिला किती त्रासदायक ठरू शकते ह्या गोष्टीचा विचार करणे अनिवार्य आहे. ती व्यक्ति पुढील आयुष्य ऐकू न येण्यामुळे कायमची अपंग होऊ शकते.

ज्यावेळी एखाद्या आजारामुळे कान वाहतो/कानातून स्राव येतो त्यावेळी अगोदर कान साफ करुन तो कोरडा/शुष्क करणे अपेक्षित असते व नंतरच योग्य ती चिकित्सा करावी. स्राव कानांच्या आत राहिल्यास त्रास पुन्हा होऊ शकतो. एंटीबायोटिक्सच्या ड्रोप्स/गोळ्या घेतल्याने ते इन्फेक्शन तसेच आत दाबून राहते. आता कानातून स्राव येणे बंददेखील होईल पण कधीतरी जेव्हा उचित कारण मिळेल (जसे की सर्दी किंवा इतर) व योग्य वेळ येईल तेव्हा ते पुन्हा सुरु होईल आणि हे चक्र चालूच राहील.

कानाचे त्रास जसे की कान गप्प झाल्यासारखे वाटणे, खाज येणे, कानात सतत काहीतरी घालून कान खाजवावा असे सारखे वाटणे, कानातून पाणी येणे/चिकट/घाण वास असलेला स्राव होणे, ऐकू कमी येणे/न येणे, कानातून विचित्र आवाज आल्यासारखे वाटणे, कानाला दडे बसणे, कान खुप दुखणे एवढा कि त्या कानाच्या बाजुने झोपणे सुद्धा अशक्य होणे/व्यवस्थित झोप न लागणे ह्यासारख्या तक्रारी असतात.

कानाचा त्रास नसेल तरीही ६ महिन्यातून किमान एकदा कानांची तपासणी करुन घेणे आवश्यक. कानात अतिप्रमाणात घाण(मळ) जमा झाल्यास ती काढून टाकणे/घेणे गरजेचे. व ते पण तज्ञांकडूनच. पण ह्यासाठी ईयरबडसारख्या गोष्टी कधीही वापरू नयेत. ईयरबड घातल्यामुळे कानाच्या कडेची मळ साफ होतही असेल पण त्याच्या (ईयरबडच्या) पुढच्या टोकासमोर असलेली मळ अजूनही पुढे ढकलली जाते व ती मळ/ईअर वॅक्स, कानाच्या पडद्याला(ईअर ड्रमला)लागून इजा पोहचवू शकते. पडद्याला सूज येणे, पडदा फाटणे यांसारखे विकार होऊ शकतात. हे आपल्या लक्षात येत नाही. तरीही थोड्या माणात कानामध्ये मळ असावी. ही काही विकृती नव्हे. कानातली मळ ही कानातील सेबेसीयस व सेरुमीनस ग्रंथींच्या प्राकृत स्रावांपासून बनत असते व त्यामुळेच कानाला एक प्रकारचे आतून संरक्षण मिळते. ही मळ कानाचे मोठा आवाज होणे, पाणी/कीडा/थंड हवा कानात आत जाणे यांसारख्या गोष्टींपासून बचाव करते. सुतार, शेतात वावरणार्‍या, सीमेंटमध्ये काम करणार्‍या किंवा धुळीशी ज्यांचा संपर्क होतो अश्या कामगारांमध्ये/व्यक्तिंमध्येही कानातील मळ अतिप्रमाणात आढळतो. रेल्वे/बस स्थानकांवर १० रुपयात कान साफ करुन देणारी लोक हमखास दिसतात. ह्यांच्याकडू न तर अजिबातच कान साफ करुन घेऊ नये. ते एकतर तज्ञ नसतात. त्यातून कान साफ करतेवेळी काहीतरी आघात झाला/इजा झाली तर त्याला कोण जवाबदार? एवढेच नव्हे तर ते सर्वांना एकच घाणेरडे नॉन-स्टेरीलाएस्ड यंत्र वापरतात. अश्याने एखाद्याचे इन्फेक्शन दुसर्‍याला लागू शकते.

पोहणे(कानात पाणी गेल्याने), कान पोखरणे (माचिसच्या, अगरबत्तीच्या काडीने इतर), एखादी घट्ट (वाटाण्यासारखे इतर) पदार्थ खाणे, कानात सतत हेडफोन्स/हँड्सफ्री घालून गाणी ऐकणे (मोठ्या आवाजाने कानाच्या पडद्याला मार बसतो; कंप/व्हायब्रेशनने कानातील मळ अजून आत ढकलला जातो), सर्दी झालेली असताना वेळेत व्यवस्थित काळजी व उपचार न घेतल्यास कान वाहू (स्राव/डिस्चार्ज) शकतो. जेव्हा कानातून स्राव येत असेल, तेव्हा पाण्यात पोहणे/ सतत डोक्यावरुन आंघोळ करणे टाळावे. (जर एखाद्या दिवशी नाइलाजास्तव करावी लागल्यास कानात कापूस घालूनच आंघोळ करावी.

कर्णनाद व कर्नश्वेड ः हे असे रोग आहेत ज्यामध्ये त्या व्यक्तिला सतत काहीतरी आवाज़ ऐकू येत राहतो. मग तो आवाज़ घडयाळाचे काटे चालण्याचा, चीमण्यांचा चिवचिवाट, एखाद्या वाद्याचा (नगाड़ा, मृदंग, मुरली), शंख वाजल्याचा आवाज, मशीन सतत चालू असण्याचा आवाज़… इतर प्रकारचा असु शकतो. सतत त्या आवाजाच्या सान्निध्यात (जेथे हे आवाज़ येतात) काम करणे – ही कारणेही असु शकतात. अश्या समस्येमध्ये कान लवकरात लवकर वैद्यांकडून तपासुन घ्यावेत व उपचार चालू करावेत, नाहीतर ह्यांचे रूपांतरण मानसिक रोगामध्ये होऊ शकते.

जर पुन्हा पुन्हा कानामध्ये फोड/पुळ्या येत असतील तर डायबेटिस/मधुमेह/प्रमेह असु शकतो. वैद्यांना दाखवावे व त्यांच्या सल्ल्यानुसार रक्ततपासणी जर गरजेची असेल तर करावी.

हिवाळ्यात/थंडीच्या दिवसात एखादा कीटक (पाळीव प्राणी जसे की कुत्रा, मांजर इतर यांच्या अंगावर राहणारे गोचीड/टिक्स) अश्या गरम/उष्ण परिसर/ गरम रक्ताच्या प्राण्याच्या शोधात असतात जिथे जास्त हालचाल नसेल व त्यांना जास्त त्रास होणार नाही आणि अशीच एक निवांत जागा म्हणजे माणसाचा कान. ह्या कीटकाने कानाच्या पडद्याला चावा घेतल्यास वेदना अतिशय तीव्र स्वरूपाच्या असतात व आपण असहाय्य असतो अश्या वेळेस. म्हणूनच जे प्राणी पाळतात त्यांनी तर काळजी घेतलीच पाहिजे.

कानांचे दुखणे हे डोके दुखणे, दात किडणे/दात दुखणे यामुळे सुद्धा होऊ शकते. फटाक्यांचा आवाजसुद्धा कारणीभूत ठरतो. जसे वय होत जाईल तसे ऐकू येण्यावर पण फरक पडत जातो. ज्यांना कमी ऐकू येते ती व्यक्ति उच्च स्वरात/आवाजात बोलते हे स्वाभाविक असते. अपघाताने कानाच्या पडद्याला मार बसल्यानेसुद्धा बहिरेपणा येऊ शकतो. जन्मापासूनच कानाची एखादी विकृती जशी की कानाचा आकार व कानाचे छिद्र लहान असणे ह्यांचेसुद्धा परीक्षण महत्वाचे.

लहान अबोल बाळांमध्ये सुद्धा हे सर्व त्रास होतात. मग ते आपण ओळखायचे कसे? जर ते बाळ सतत कानाला हात लावत असेल किंवा कानाला हात लावुन रडत असेल तर समझावे की काहीतरी त्रास बाळाला होतोय. म्हणूनच लहान मुलांमध्ये सर्दी जर झाली तर त्यांना आपण वेळ न घालविता त्वरित तज्ञ वैद्यांना दाखवावे कारण त्यामध्ये नाक, डोळयांमधील व्याधि हे युस्टेचियन नलीकेतुन अतिशय जलद गतीने कानामध्ये जावुन कानाचे रोग उत्पन्न करतात (लहान बाळांमध्ये युस्टेचियन नलिका ही नाकाच्या समांतर पातळीला खाली असते ज्यामुळे रोग लवकर पसरतात जे तरुण किंवा वयस्कर व्यक्तिंमध्ये सुद्धा होते पण लहान मुलांपेक्षा कमी प्रमाणात).

‘नॅशनल प्रोग्राम फ़ॉर डेफनेस’द्वारे सरकार बहिरेपणाविषयी देशाच्या प्रत्येक कोपर्‍यात जागरुकता करते.

ऑडीओमेटी्र, रिनीस टेस्ट, वेबर्स टेस्टसारख्या डायाग्नोस्टीक टेस्ट खूप उपयोगी ठरतात. जर बहिरेपणा आला असेल तर औषधी उपचारांसोबत, टिमपेनोप्लास्टी, हियरिंग ऐड्‌स, कोक्लियर इम्प्लांट्ससारखे पर्यायपण उपलब्ध आहेत. पण तेसुद्धा बाधा झाल्यानंतरचे उपचार. जर आपण आताच आपल्या कानांची व्यवस्थित काळजी घेतली तर ह्या पर्यायांचा विचार तरी का करावा? म्हणूनच आपल्या अनमोल कानांची काळजी घ्या. कानाडोळा करू नका.