कादंबरीकार अरुण साधू

0
381

– डॉ. सोमनाथ कोमरपंत

अशा निर्मोही, निःस्पृह आणि निरहंकारी लेखकाचे या जगातून जाणे म्हणजे खरोखरच पोकळी निर्माण करणारे आहे. लेखक आणि ‘माणूस’ म्हणून मोठे असलेल्या अरुण साधू यांना विनम्र आदरांजली.

मराठीतील राजकीय कादंबरीलेखनाला नवी मिती प्राप्त करून देणारे समर्थ कादंबरीकार आणि इंग्रजी पत्रकारितेत आपल्या व्यक्तिमत्त्वाचा स्वतंत्र ठसा उमटविणारे नामवंत पत्रकार अरुण साधू यांचे मुंबईत वयाच्या ७६व्या वर्षी सोमवार दि. २५ सप्टेंबर रोजी पहाटे निधन झाले. हे वृत्त कळताच अतिशय दुःख झाले. त्यांचे वाङ्‌मयीन व्यक्तिमत्त्व बहुपेडी होते. कादंबरीलेखनाशिवाय त्यांनी उत्कृष्ट प्रकारचे कथालेखन केले. ‘पडघम’सारखे नाटक लिहिले. एकांकिका लिहिल्या. वैचारिक व ऐतिहासिक विषयांवर सातत्याने लेखन केले. काही अनुवाद केले. शैक्षणिक स्वरुपाचे ‘संज्ञापन क्रांती’ हे पुस्तक लिहिले. त्यांच्यासारखा समजमनस्क आणि समताधिष्ठित समाजनिर्मिती व्हावी म्हणून सतत ध्यास बाळगणारा साहित्यिक अवेळी जावा ही क्लेशदायी घटना आहे.
२००७ साली नागपूर येथे भरलेल्या ८०व्या अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. या संमेलनाला उपस्थित राहण्याचा योग आला होता. त्यांचे अभ्यासपूर्ण आणि राजकीय, सामाजिक, वाङ्‌मयीन व सांस्कृतिक जीवनावर भाष्य करणारे चिंतनशील भाषण ऐकून मी प्रभावित झालो. अंतर्मुख झालो.

महाविद्यालयीन अभ्यासाच्या दिवसांत ‘माणूस’ हे माझे आवडते साप्ताहिक होते. त्यातील सदरे जीवनाच्या विविध पैलूंना स्पर्श करणारी होती. त्यांतील ‘आणि ड्रॅगन जागा झाला’, ‘रातराणी’ (विजय तेंडुलकर), ‘पुरंदरच्या नौबती’ (बाबासाहेब पुरंदरे), ‘सोलकढी’ (अनंत भावे), दादुमियांचे राजकीय विषयांवर विश्‍लेषण करणारे लेखन इत्यादी लेखन आवडत असे. त्यामुळे हे अंक आजही जपून ठेवावेसे वाटतात.
थॉमस कार्लाईल यांनी ‘वृत्तपत्रीय लेखन म्हणजे गुडघाभर पाणी’ असे काहीशा उपहासाने म्हटले आहे. पण हे विधान खोटे ठरविणारे पत्रकार आहेत. त्यांत आचार्य अत्रे, ग. त्र्यं. माडखोलकर, वि. स. वाळिंबे आणि अरुण साधू यांचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.
ग. त्र्यं. माडखोलकर यांनी ‘मुक्तात्मा’सारखी राजकीय कादंबरी लिहून या प्रकारात नवी मळवाट तयार केली. अरुण साधू यांनी स्वातंत्र्योत्तर कालखंडातील गतिमान प्रवाहाचे प्रगल्भ आकलन करून समकालीन वास्तव आपल्या कादंबर्‍यांतून उभे केले. या कादंबर्‍यांना केवळ राजकीय स्वरुपाच्या कादंबर्‍या असे संबोधता येणार नाही. जीवनाचे व्यामिश्र आणि सम्यक दर्शन त्यांच्यामधून घडते. अरुण साधू हे सामाजिक भान आणि आत्मभान असलेले संवेदनशील साहित्यिक. परखड शैलीत लिहिणारे पत्रकार म्हणून ते नावाजलेले होते.

‘इंडियन एक्स्प्रेस’, ‘केसरी’, ‘माणूस’ साप्ताहिक, ‘टाइम्स ऑफ इंडिया’, ‘फ्री प्रेस जर्नल’ आणि ‘द स्टेट्‌समन’ या प्रतिष्ठित नियतकालिकांत व साप्ताहिकांत विशेष प्रतिनिधी म्हणून तसेच उपसंपादकपदावर त्यांनी कुशलतेने काम केले. मराठीबरोबरच इंग्रजी भाषेवर त्यांचे प्रभुत्व होते. तीस वर्षांहून अधिक काळ त्यांनी पत्रकारितेत व्यतित केला. काहीकाळ त्यांनी पत्रकारिता सोडून लेखनाकडे पूर्णपणे लक्ष केंद्रित केले. पुढे त्यांनी पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे प्रमुख म्हणून सहा वर्षे जबाबदारी सांभाळली.

महत्त्वाच्या वर्तमानपत्रांत कार्यरत असताना राजकीय सत्ताकेंद्राकडील माणसे गुंतागुंतीच्या राजकीय प्रसंगी आणि जीवनव्यवहारात कशी वागतात याचे सूक्ष्म निरीक्षण अरुण साधू यांनी केले होते. महाराष्ट्रात, देशात आणि आंतरराष्ट्रीय क्षेत्रात कोणत्या राजकीय घडामोडी होत आहेत याचा अभ्यास आणि निरीक्षण त्यांनी केले होते. त्यांतील व्यामिश्रता ओळखली होती. पत्रकारितेतील त्यांचा अनुभव दांडगा होता. ही अनुभवसंपन्नता त्यांनी मनात मुरवून घेतली. या साधनसामग्रीच्या बळावर त्यांनी कादंबर्‍या लिहिल्या. त्यांना अभिप्रेत असलेला जीवनाशय व्यक्त करायला हा आकृतिबंध अपरिहार्य वाटला. यातूनच ‘मुंबई दिनांक’ आणि ‘सिंहासन’ या साहित्यकृतींचा जन्म झाला. कादंबरीकार म्हणून त्यांचे यश निश्‍चित झाले. अरुण साधू यांच्या कादंबरीलेखनाचा कल समकालीन घटनाक्रमांचा मागोवा घेण्याकडे होता. पण त्याचा परिणाम केवळ तात्कालिक स्वरुपाचा राहिला नाही. राजकीय वास्तव आणि सामाजिक दस्तावेज या दोन्ही दृष्टींनी हे लेखन लक्षणीय स्वरुपाचे आहे. त्याचा रोख राजकारणातील व्यक्तींना केवळ लक्ष्य न बनविता स्वातंत्र्योत्तर भारतातील राजकारणाला आतून कशी कीड लागलेली आहे हे दाखवण्याकडे आहे. जो विकास आपल्याला दिसतो तो विकास नसून फोपशेपणा आहे, हे त्यांना अधोरेखित करायचे आहे. महानगरीय जीवनातील व्यस्तता, अस्वस्थता आणि व्यामिश्रता प्रवाही आणि संवेदनगर्भ शैलीत अरुण साधू यांनी ‘मुंबई दिनांक’ या कादंबरीत रंगविली आहे. वैयक्तिक जीवनात माणसांची होणारी ससेहोलपटही दाखवून दिलेली आहे. समर्थ आशय अभिव्यक्तीच्या अंगाने फुलविताना व्यक्तिरेखांच्या अंगाने काही प्रयोगही केले आहेत. उदा. अय्यर, किशोर वझे, पानिटकर, डी-कास्टा आणि जिवाजीराव शिंदे इत्यादी. शिवाय मुंबई महानगर, त्याचा वेगवान प्रवाह याला स्वतंत्र व्यक्तिमत्त्व आहे. तीही एक व्यक्तिरेखा झाली आहे. ही मुंबई कशी आहे? ः
‘तीस वर्षांतली मुंबईची वाढ त्याने आपली वृत्तपत्रीय ताकद वापरून असा काही खोडा घातला आहे की, त्या होऊच शकल्या नाहीत. अय्यरला आपल्या ताकदीचा अभिमान होता आणि मुंबईविषयी आपलेपणा होता. मुद्रासविषयी, बंगलोरविषयी त्याला आता काडीचंही प्रेम नव्हतं. पण अलीकडे मात्र त्याच्या मनात अस्वस्थता साचत चालली होती. मुंबई आपल्या हातून चालल्यासारखं वाटत होतं. ताकद अपुरी पडत असल्याचं जाणवत होतं. या कादंबरीतील किशोर वझेची व्यक्तिरेखा प्रातिनिधिक स्वरुपाची आहे. त्याची मानसिक आंदोलने ही मध्यमवर्गीय तरुणाच्या नाकर्तेपणावर प्रकाश टाकणारी आहेत. डी-कास्टा हा कामगार नेता. त्याच्या वृत्तिप्रवृत्तीतील विसंगती लेखकाने दाखवून दिलेली आहे ः
‘‘पण कामगार चळवळीत आठ वर्षे स्वतंत्रपणे काढल्यावरही एक गोष्ट मात्र कास्टाच्या ध्यानात येत नव्हती किंवा कळूनही उमगत नव्हती. पक्षातल्या पुढार्‍यांना, युनियनच्या लोकांना ज्यासाठी तो पूर्वी शिव्या देत होता तेच सारं आता तो स्वतः करू लागला होता. भायखळ्याचा त्याचा ब्लॉक जरी अगदी अद्ययावत नसला तरी चांगलाच भपकेबाज होता. उंची हॉटेलांमध्ये जेवण्याची सवय त्याला लागली होती.’’ या राजकीय आणि सामाजिक पर्यावरणात जिवाजीराव शिंदे यांची केंद्रवर्ती व्यक्तिरेखा अनेक कंगोर्‍यांसह अरुण साधू यांनी रंगविली आहे.

‘सिंहासन’ ही बहुचर्चित कादंबरी. आपण समर्थ लेखक असूनही अरुण साधू यांनी ‘मुंबई दिनांक’ आणि ‘सिंहासन’ या साहित्यकृती एकत्रित करून चित्रपट करण्याची योजना तयार केली, तेव्हा पटकथालेखनासाठी विजय तेंडुलकर यांचे नाव सुचविले. ‘सिंहासन’ या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणून डॉ. जब्बार पटेल यांनी जबाबदारी स्वीकारली. ‘सिंहासन’ या कादंबरीत अनेक पात्रे आहेत. ही सर्व राजकीय क्षेत्रातील आहेत. मुख्यमंत्री, त्यांचे मंत्रिमंडळातील सहकारी, आमदार, शुगरकिंग असलेले आमदार, मुख्यमंत्र्यांचा अधिकारीवर्ग, पत्रकार. ‘सत्ताकेंद्र’ हा या कादंबरीचा केंद्रबिंदू आहे. यासंदर्भात या कादंबरीतील लेखकाची चिंतनशीलता अधोरेखित करावीशी वाटते ः
‘‘प्रत्येक व्यक्ती महत्त्वाकांक्षा घेऊनच जन्माला येते असे नाही. किंबहुना महत्त्वाकांक्षा जन्मजात नसतेच, कुवतीनुसार ती वाढत असते आणि अंगी कुवत असणार्‍या बुद्धिमान लोकांनाच महत्त्वाकांक्षा धरण्याचा अधिकार आहे, असं थोडंच आहे? ज्याला इच्छा आहे, अनुकूल परिस्थिती आहे, कधी काही मिळण्याची शक्यता आहे, अशा कोणीही अंगी कुवत असो-नसो, महत्त्वाकांक्षा आणि स्वप्नं उराशी बाळगण्यास काय हरकत आहे? आणि महत्त्वाकांक्षा ही परिस्थितीतूनच निर्माण होते. हाती काही नसता केवळ असामान्य बुद्धीच्या आणि अपार इच्छाशक्तीच्या जोरावर स्वतंत्रपणे झेप घेणारे लोक विरळाच. सामान्य माणसाच्या साध्या गरजेतून इच्छा निर्माण होते. ती इच्छा पूर्ण झाली की त्याची तोवर गरज वाढलेली असते. मग आणखी गरज वाढत जाते, आकांक्षा फुलत जातात आणि अशाच हळूहळू महत्त्वाकांक्षा वाढत जातात.’’ या चिंतनाच्या पार्श्‍वभूमीवर राजकीय पटावरील अनेक वृत्तिप्रवृत्तींच्या व्यक्तिरेखा ‘सिंहासन’मध्ये रेखाटल्या आहेत. जीवनराव वाघमारे ही अशीच एक व्यक्तिरेखा आहे. लेखकाने आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत उभी केली आहे ः

‘‘सर्व तरुण आमदारांमध्ये जीवनराव आघाडीवर होते. त्यांचा स्वभाव उमदा आणि सगळ्यांमध्ये मिळून वागण्याचा होता. पुढच्या पहिल्या खेपेतच त्यांना कॅबिनेटमध्ये जाण्याचा चान्स मिळणार, हे आता जवळ जवळ निश्‍चितच ठरत आलं होतं. तीनचार वर्षांत ते सीनियर होताहेत, तोवर ते सीनियर होताहेत, तोवर इतर सगळी बडी धेंडं साठीच्या कितीतरी वर जाणार होती. मग नव्या माणसांमध्ये कोण? ते स्वतः अजून तिशीत होते. दहा-बारा वर्षं त्यांनी जर कसून प्रयत्न केले, तर हे सगळं काही असाध्य नव्हतं.’’
अत्यंत गुंतागुंतीचे राजकारण ‘सिंहासन’मध्ये साकार करण्यात लेखक यशस्वी झाला आहे.

सामाजिक शोषणप्रक्रियेवर भाष्य करणारी आणि समताधिष्ठित समाजरचनेची धारणा मनाशी बाळगणारी ‘बहिष्कृत’ ही कादंबरी अरुण साधू यांनी लिहिली आहे. ‘विप्लवा’ आणि ‘स्फोट’ या केवळ विज्ञानकादंबर्‍या नाहीत. यंत्राधिष्ठित आणि विद्ध्वंसकतेच्या उंबरठ्यावर असलेल्या जगताचे दर्शन घडविणार्‍या या कादंबर्‍या आहेत. मानवी मूल्यांचे सर्वत्र अधःपतन चाललेले आहे याची खंत कादंबरीकाराला आहे. या सर्वंकष संहारपर्वाचे चित्रण त्याने द्रष्टेपणाने केले आहे. लेखक संयमी आहे. मात्र अन्यायावर आघात करताना तो कठोर वृत्ती धारण करतो. ‘विप्लवा’ या कादंबरीत त्याने परग्रहावरून पृथ्वीवर आलेली प्रवाशांची गोष्ट सांगितलेली आहे. आत्मभान, समाजभान यांबरोबरच त्याला विश्‍वभानही होते. आपली सर्व मांडणी तर्कनिष्ठपणे करायची असा त्याचा निश्‍चय असायचा. स्त्रियांच्या समस्यांबाबत त्याचा दृष्टिकोन नेहमीच सहानुभूतीपूर्ण राहिला. ‘शोधयात्रा’ आणि ‘मुखवटा’ या कादंबर्‍यांतूनही त्यांच्या प्रगल्भ जीवनजाणिवांचे दर्शन घडते.
लेखनाव्यतिरिक्त अरुण साधू समाजकारणात आघाडीवर राहिले. समाजातील दलित आणि शोषित वर्गाबद्दल त्यांना सहानुभूती वाटत होती. मराठीतील ग्रंथव्यवहाराविषयी त्यांना अत्यंत आस्था वाटत होती.

इंग्रजी पत्रकारितेत वावरणारी मंडळी- काही सन्मान्य वगळता- फटकून राहते. पण अरुण साधू यांनी मराठी संस्कृतीशी असलेली नाळ कधी तोडली नाही. मराठीची प्रतिष्ठा वाढविणार्‍या आणि समाजातील सर्व स्तरांवरील लेखनाविषयी स्वागतशील असलेल्या ‘ग्रंथाली’ या ग्रंथचळवळीशी ते निगडित होते. ती क्रियाशील बनविण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण वाटा उचलला.

‘माणूस’ म्हणून अरुण साधू खूप मोठे होते. ते मितभाषी होते. पण समानधर्मी व्यक्तींशी संवाद साधण्यात त्यांना आनंद व्हायचा. त्यांच्या भाषणातून अभिरुचिसंपन्नता आणि वाङ्‌मयीन गुण प्रकट व्हायचे. ते सर्वमित्र होते. पत्रकारिता आणि साहित्य या दोन्ही क्षेत्रांत मार्गदर्शन करण्यात ते नेहमीच आघाडीवर राहिले. ‘वज्रादपि कठोराणि मृदुनि कुसुमादपि….’ असाच त्यांचा बाणा होता. त्यांनी आपल्या व्यक्तित्त्वाचा कणा नेहमी ताठ ठेवला. राष्ट्रपतींच्या उपस्थितीमुळे संमेलनाध्यक्षांनी आपले भाषण दहा मिनिटांत संपवावे या ‘साहित्य महामंडळा’च्या सूचनेला स्पष्टपणे विरोध करताना ते म्हणाले होते, ‘‘शब्दालाच जेथे महत्त्व नाही, तेथे उपस्थित राहण्याची गरज नाही.’’

मराठी भाषा ही ज्ञानभाषा व्हावी म्हणून अरुण साधू नेहमीच झटले. साहित्य हा त्यांचा ध्यासाचा आणि अभ्यासाचा विषय होता. पण आपले लेखकपण चारचौघांत त्यांनी मिरवले नाही. अभिनिवेश बाळगला नाही. मृत्यूनंतर देहदान करण्याची इच्छा त्यांनी प्रकट केली होती. त्यांच्या इच्छेनुसार तसे करण्यात आले.

नाशिक येथील ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’चा ‘जनस्थान पुरस्कार’ त्यांना प्राप्त झाला होता. याशिवाय ‘महाराष्ट्र फाऊंडेशन’चा जीवनगौरव पुरस्कार आणि राष्ट्रीय पातळीवरचा ‘रचना’ पुरस्कार प्राप्त झाला होता.
अशा निर्मोही, निःस्पृह आणि निरहंकारी लेखकाचे या जगातून जाणे म्हणजे खरोखरच पोकळी निर्माण करणारे आहे. लेखक आणि ‘माणूस’ म्हणून मोठे असलेल्या अरुण साधू यांना विनम्र आदरांजली.