काणकोण बस स्थानकाची स्थिती दयनीय

0
96
काणकोण कदंब बसस्थानक.

पैंगीण (प्रतिनिधी)
काणकोण कदंब बसस्थानकाचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते उद्घाटन १४ वर्षांपूर्वी करण्यात आले होते. आज या बसस्थानकाची अवस्था दयनीय झाली असल्याच्या प्रवासी वर्गाच्या तक्रारी आहेत. कदंब परिवहन महामंडळाने या बसस्थानकाचे त्वरित नूतनीकरण करण्याची मागणी काणकोणच्या नागरिकांनी केली आहे. विजय पै खोत यांच्या प्रयत्नाने काणकोणात गोवा राज्य पायाभूत विकास महामंडळातर्फे भव्य बसस्थानक बांधण्यात आले होते. २००४ साली या बसस्थानकाचे उद्घाटन झाल्यावर हे बसस्थानक कदंब परिवहन महामंडळाकडे हस्तांतरित करण्यात आले.
या बसस्थानकावर डझनभर दुकाने आहेत. या दुकानाचे भाडे कदंब महामंडळाला मिळत आहे. त्याचबरोबर खाजगी बसेसकडून ‘कर’ आकारला जात आहे. या बसस्थानकाच्या पहिल्या मजल्यावर वाहतूक खात्याचे कार्यालय आहे. अपुर्‍या जागेत ते कार्यालय चालविले जात आहे. काणकोण कदंब बसस्थानकाची देखरेख व्यवस्थितपणे होत नसल्याने या बसस्थानकाला अवकळा आली आहे. या बसस्थानकाच्या लोखंडी चॅनल्सना गंज चढला असून लोखंडी पत्रे उखडून गेले आहेत. काही ठिकाणी फायबरचे पत्रे असून त्यांना मोठमोठे छेद पडले आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी सर्वत्र साचून राहायला लागले आहे.
मोकाट गुरांचा उपद्रव
या बसस्थानकाच्या एका बाजूला मोटारसायकल पायलटना आसरा देण्यात आला आहे. त्या जागीही मोठ्या प्रमाणात पाणी साचू लागल्याने त्यांचीही गैरसोय होत असल्याचे एक मोटारसायकल पायलट मिलिंद नाईक गावकर यांनी सांगितले. फुटलेल्या पत्र्यामुळे पावसाचे पाणी बसस्थानकात शिरत असल्याने बसस्थानकावर असलेली दुकाने चालविणे कठीण झाले आहे. पावसाच्या दिवसात रात्रीच्या वेळी या बसस्थानकाचा आसरा मोकाट गुरे घेतात. दिवसातसुद्धा कधी कधी ही मोकाट गुरे फिरताना दिसतात. या बसस्थानकाची वेळोवेळी सफाई कामगार करतात. पण मोकाट गुरे बसस्थानकाचा परिसर अस्वच्छ करतात अशा तक्रारी आहेत. या बसस्थानकावर दोन सुरक्षा रक्षक आळीपाळीने काम करतात. मोकाट गुरांवर दिवसरात्र लक्ष ठेवण्याची पाळी त्यांच्यावर येते. या स्थानकाच्या देखभालीकडे कदंब महामंडळाकडून अजिबात लक्ष दिले जात नसल्याचा प्रवासीगवर्ग, बसचालक व व्यावसायिकांच्या तक्रारी आहेत. ज्या ठिकाणी वाहनांसाठी ‘पे’ पार्किंग व्यवस्था आहे त्या ठिकाणी निवारा शेड बांधण्याची मागणी पुढे येत आहे. बसस्थानक बांधल्यापासून बसस्थानकासमोरील गटारे साफ केली नसल्याने चारही बाजूच्या पाण्याच्या वाटा बंद झाल्यामुळे सर्वत्र पाणी साचत आहे. त्याचप्रमाणे सर्वत्र कचरा दिसत आहे.
प्रवासी गटारात पडण्याची भीती
या बसस्थानकावर ज्या जागी गाड्या थांबवल्या जातात, त्या ठिकाणी गटार असून गटारावर घातलेले लोखंडी ग्रिल्स मोडून गेल्याने या गटारात प्रवासी पडण्याची तसेच बसेसचे टायर जाण्याची शक्यता प्रवाशांनी व्यक्त केली आहे. या बसस्थानकाला घातलेले लोखंडी छप्पर गंजून खाली पडायला सुरूवात झाली आहे.