काणकोणात मिनी बस उलटून २७ प्रवासी जखमी

0
121

>> दुमाणे-आगोंदा येथील दुर्घटना

>> १५ प्रवासी गंभीर

>> आल्टो कारला धडक

काणकोणहून आगोंदा मार्गावर वाहतूक करणार्‍या सोनम या जीए ०८ – टी – ०००९ क्रमांकाच्या प्रवासी मिनी बसला दुमाणे – आगोंदा मार्गावरील एका जीवघेण्या वळणावर समोरून येणार्‍या जीए – ०३ – पी – २१०८ आल्टो कारला बाजू देताना झालेल्या भीषण अपघातात प्रवासी मिनी बस उलटून बसमधील २७ प्रवासी जखमी झाले असून त्यातील १५ प्रवाशांना गंभीर अवस्थेत मडगावच्या हॉस्पिसिओ इस्पितळात दाखल करण्यात आले आहेत. हा अपघात काल संध्याकाळी ७च्या दरम्यान घडला.

या मिनी बसमधून प्रवास करणारे सर्व प्रवासी आगोंदा येथील आहेत. जखमी व्यक्तींमध्ये हर्षा गावकर (२३, आगोंदा), ऍस्टन मिरांडा (२५, आगोंदा), ज्युईली फर्नांडिस (५०, कोळंब), दिव्या वेळीप (२०, खोला), वॅसिल्डा मिरांडा (७, आगोंदा), प्रीती कोमरपंत (३४, आगोंदा), संगीता गावकर (२५, माटवेमळ), विशाखा पागी (३९, पाळोळे), प्रेमावती वेळीप (५०, आगोंदा), मुकेश पागी (३, तारीर), देवराय पागी (१७, आगोंदा), महेंद्र कुमार (२१, आगोंदा), रेशन पागी (२७, तारीर), ऍलिस्टन फर्नांडिस (१२, काजुमळ), ओंकार खोलकर (१२, खोला), वालेन फर्नांडिस (१५, आगोंदा), सिद्धू वेळीप (५, वागोण), आब्रु फर्नांडिस (११, पाळोळे), सरदार फळदेसाई (५०, मुडकूड), पूजा वेळीप (२०, खोला), अनिषा पागी (२५, आगोंदा), अक्षय नाईक (२१, ओल्ड गोवा), रोशमन फर्नांडिस (२१, आगोंदा), शानी आल्फान्सो (१३, आगोंदा), महेंद्र पाटील (३२, आगोंदा) या प्रवाशांना काणकोणच्या सामाजिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी आणण्यात आले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले. त्यातील हर्षा गावकर, महेश पागी, वेलीना फर्नांडिस, देवराज पागी, दिनेश कुमार, नमिता शिंक्रे, सारीका देविदास, आलिक्सन फर्नांडिस, संगीता बोरकर, वर्षा पागी, वेलन फर्नांडिस, विशाखा पागी, ओंकार खोलकर यांना काणकोणच्या सामाजिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर मडगावच्या हॉस्पिसिओ इस्पितळात पाठविण्यात आले आहे. यावेळी काणकोणच्या सामाजिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर तसेच परिचारिकांनी उत्तम सेवा केल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

दरम्यान, या अपघाताची खबर समजताच काणकोणचे आमदार इजिदोर फर्नांडिस, माजी आमदार विजय पै खोत, संजू पागी, प्रमोद फळदेसाई आणि अन्य सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बसखाली चिरडलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यापासून त्यांना सामाजिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यासाठी मदत केली. बस अकस्मात उलटल्यामुळे बसमधील प्रवाशांच्या किंकाळ्यांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. या ठिकाणी एखाद्या जत्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. अशा प्रकारचा अनुभव काणकोणचे प्रवासी पहिल्यांदाच अनुभवत होते. काणकोणचे पोलीस त्याचप्रमाणे अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे काम केले. मात्र, अपघाताच्यावेळी जखमी प्रवाशांना इस्पितळात नेण्यासाठी आलेल्या रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याने गैरसोय झाली.